Sunday, October 26

‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस…

आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक शोधाची गोष्ट सांगतोय.

IMG 20230904 151041

‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता.

अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं.

पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले. दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या. सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती. समस्या फार मोठी होती असं नव्हे, पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती. जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली की तिला जखम झालीच समजा.

टोमॅटो कापला लागला चाकू, दार बंद करायला गेली लागला खिळा, दुध गरम करायला गेली बसला चटका. जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती.

नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं.

प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिकय पण नसलो तर? काय करावं बुवा? डिक्सन मोठ्या बुचकळ्यात पडला.

“वेंधळेपणा कमी होईल न होईल पण किमान जोसेफिनला तिला झालेल्या जखमेची काळजी घेणं यायला हवं” डिक्सनला प्रकर्षानं जाणवलं.

‘एवढं काय त्यात छोट्यामोठ्या जखमा तर होत असतात एवढं काय सिरियस त्यात?’ असे विचार आपल्या किंचित निगरगट्ट भारतीय मानसिकतेमुळं येऊ शकतात पण इथं दोन मुद्दे येतात.

पहिला मु्द्दा म्हणजे पाश्चात्य देशात ढोबळ प्रेम-हक्क या पलिकडे वैयक्तिक पातळीवर एकमेकांची ‘परस्पर जबाबदारी’ म्हणून काळजी घेतात. नाहीच जमलं तर एकवेळ नात्याला तिलांजली देतात पण नुसतीच चौकट पाळण्याच्या अट्टाहासात मेलेली नाती ओढत नाहीत.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा औषधांची उपलब्धता मर्यादित होती. प्रतिजैविकांचा फारसा विकास झालेला नव्हता त्यामुळं जखमा लांबायच्या-सेप्टिक व्हायच्या-अनेकदा मृत्यूही व्हायचे.

शेवटी डिक्सननं चौकोनी कापडाचे तुकडे, त्यांच्यावर एक चिकटपट्टी अन् वरनं क्रिनोलिन लावत जोसेफिनसाठी थोडी रेडिमेड तयारी करून दिली. जुगाड यशस्वी झाला. आता डिक्सन घरी नसला तरी जोसेफिन एकटी लिलया जखमेची देखभाल करू लागली.

डिक्सन काम करत असलेल्या कंपनीत त्याच्या या घरगुती उद्योगाची चर्चा झाली. अश्या प्रकारचं काॅम्बिनेशन असलेली कापडी पट्टी जखम विक्रमी वेळेत बरी करते हे ऐकून खुद्द कंपनीचा मालक नुसता चकित झाला नाही तर येडा व्हायचा बाकी राहिला.

या भन्नाट जुगाडची कल्पना सगळ्यांनाच जाम आवडली.. कंपनीनं याच पट्टीच्या धर्तीवर ‘बॅंड एड’ या नावानं बल्क प्राॅडक्शन करण्याचा निर्णय घेतला. कल्पना नवी असल्यानं पहिली बॅच थोडी सावकाश पण विकली गेली.

हातानं बनवण्यात वाया जाणारा वेळ आणि घरोघरी असणारी मागणी यांचं व्यस्त समीकरण बघता कंपनीनं यासाठी मास प्राॅडक्शन व्हावं म्हणून यथोचित यंत्रसामग्री बसवली आणि बस्सऽऽ

‘बॅंड एड’ म्हणून तयार झालेल्या डिक्सनच्या या ब्रॅंडनं नंतर बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला. कंपनीनं डिक्सनला थेट व्हाॅईस प्रेसिंडेटपदी नेऊन बसवलं.

जोसेफिनच्या स्वयंपाकघरात सुरू झालेला हा ‘बॅंड एड’ चा प्रवास आज आख्ख्या जगभर पसरलाय. क्वचित अशी व्यक्ती असेल ज्यानं कधी आयुष्यात बॅंड एड बघितलं किंवा वापरलेलं नाही. दोनेक रुपयाला मिळणाऱ्या बॅंड एडची आज मिलियन डाॅलर्संची उलाढाल होते.

वेंधळ्या बायकोच्या काळजीपोटी का होईना संपूर्ण मानव समुहासाठी छोट्या-मोठ्या जखमांमुळं होणाऱ्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या ‘अर्ल डिक्सन’ चा आज जन्मदिवस.

अनेक ब्रॅंड्स आले-गेले पण आजही लोकं दुसऱ्या ब्रॅंडचं बॅंडेज मागतांनाही ‘अमुकतमुक बॅंड एड’ द्या असं म्हणतात हेच या प्राॅडक्टचं यश.

हॅट्स ऑफ डिक्सन, बायकोवरच्या प्रेमासाठी आणि कल्पक संशोधनासाठीही….

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.