
काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव
काकड आरतीचं स्वरूप खुप प्राचिन आहे.या काकड आरतीला नुसते आध्यात्मिक महत्त्व नसून त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात प्राणवायू ओझोन भरपूर प्रमाणात असतो. म्हणून आपले ऋषीमुनी एवढंच नाही तर सम्पूर्ण प्राणीमात्र भल्या पहाटे उठतात.काकडा आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली विनवणी होय.या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भल्या पहाटे आंघोळ संडासंमार्जन, रांगोळया काढून सम्पूर्ण गावातून नामाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात येते ग्रामीण व शहरी भागातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.ही अनेक वर्षांपासूनची ही प्रथा, पंरपरा आजही जोपासली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. आरतीनंतर विविधभजने,अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. भक्तीमय वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत.आजही अनेक गागावातून ही पंरपरा व लोकसंस्कृती जोपासल्या जाते. कार्तिक महिन्यात ही काकडा आरती आवर्जून काढल्या जाते. काकड आरतीचा आनंद लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अवर्णनीय असतो. काही ठिकाणी समाप्तीला भजन कीर्तन व गोपाळकाल्याच्या किर्तनानेव महाप्रसादाने सांगता होते.
*एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम|आणिकाचे काम नाही आता
हा अवर्णनीय आनंद आम्ही लहान असतांना घेतला आहे. वरीजवक्याले ज्याला वरूड जऊळका म्हणतात. वरीजवका हा त्या नावाचा झालेला अपभ्रंश होय.अगदी आमच्या गावापासून दहा कोसावर असलेल्या व शिवराम महाराज पवार या थोर वारकरी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गावात कार्तिक सोहळा सप्ताह साजरा करतात.
*कार्तिकी सोहळा|चला जाऊ पाहू डोळा
रस्त्यानं दुतर्फा पायी जाणाऱ्या दिंडयाही दिंडया बघायला मिळतात.हे बघून खरोखरच हा सुखसोहळा बघण्यासाठी मन संतांच्या चरणी नतमस्तक होते.
*मनी पुरवावी ही आस|जन्मोजन्मी तुझाची दास
याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तेव्हा आमच्या गावातून दहापाच लोकं पायदळ दिंडी घेऊन वरूळ,जऊळका येथे जायचो.डोईफोडेच्या घरी आमच्या दिंडीचा मुक्काम असायचा. बरोबर संध्याकाळी आम्ही त्या गावात पोहचायचो. कार्तिक महिना म्हणजे थंडीचा महिना. नुकतीच दिवाळी सरलेली. गुलाबी थंडी पडलेली. “थंडी म्हणते मी”. बैलाईले कडबाकुटारापासून तर आंघोळीच्या गरम पाण्यापर्यंत तर संध्याकाळी जेऊ घालण्यापासून साजरी वारकऱ्यांची घरमालक बडदास्त राखायचा. जेवणं झाली म्हणजे आथरून अंगावर घेऊन आम्ही किर्तन ऐकायला तेवढ्याच थंडीत मंदिरात जायचो. शिवराम महाराज पवार हे मोठे सदभक्त त्यांच्या भल्या मोठ्या वाड्यात विठोबाचे मंदिर बांधलेलं.घरी दहा बैलांची दावण भरपूर शेतीवाडी आंगणात कडबाकुटार भरलेलं.एवढया गावोगावच्या मुक्कामी आलेल्या दिंडयांना राहण्याची व भोजनाची सुंदर व्यवस्था अगदी टापटीप, स्वच्छता सर्वत्र बघायला मिळायची.
* भाग्यवंता घरी भजन किर्तन| त्याची वाट पाहे नारायण
रात्री बारा वाजेपर्यंत किर्तनाचा मनमुराद आनंद लुटायचा. तिकडून परत आलो म्हणजे आंगावर ब्लॅकेट घेऊन मस्त कापसाच्या गंजीचा गर्मी येण्यासाठी आधार घेतल्या जायचा.परत दुसऱ्या दिवशी झाकटीत उठून शौच,मुखमार्जन व थंडगार पाण्याने स्नान करून परत काकडा, आरतीला जायचो. तेव्हा मनोरंजनाची साधने नसल्याने या किर्तन भारूडातूंन लोकांचं सुंदर समाजप्रबोधन व्हायचं.ही एक मनपरिवर्तन करण्याची सुंदर पर्वणीच असायची.आता माहिती नाही पण तेव्हा दुसऱ्या दिवशी झाकठीतच मंदिरातून शिदाआटा भेटायचा.विष्णू सहस्त्रनाम झाल्यावर गावातून दिंडया निघायच्या. स्वतः हातानं स्वयंपाक करून गोपाळकाल्याचा आनंद. किती सोनेरी दिवस होते आता हे चित्र पाहून असं वाटते,
*पंढरीच्या लोका नाही अभिमान| पाया पडे जन एकमेका
याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी.

-विजय जयसिंगपुरे
अमरावती.
भ्रमणध्वनी – ९८५०४४७६१९
विठ्ठल मंदिराच्या काकड आरतीला 150 वर्षांची परंपरा…