Thursday, November 13

युनीसेक्स किचन..!

“युनीसेक्स किचनमध्ये पुरुष आणि स्त्रिया मिळून स्वयंपाक करताना – समानतेचा नवा विचार”

युनीसेक्स किचन..

    काल संध्याकाळी एका कॅफेत कॉफी प्यायला फ्रेंड्स भेटलो होतो.. कोणाची तरी झोमॅटोची ऑर्डर होती.. तो डिलीव्हरी बॉय दिवसभर डिलीव्हरी करुन इतका थकलेला होता कि त्याने ते पार्सल त्या बॅगेत फेकलं आणि तिथून निघाला.. इतक्या सगळ्या दिवसभराच्या मेहनतीनंतर बिचाऱ्याला किती पैसे मिळत असतील ??.. हाही प्रश्न मनात येउन गेला.. तो तिथून निघून गेला आणि मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिले.. त्यावेळी त्याला भुकही लागली असेल.. घरी त्याचं कुटुंब वाट पहात असेल.. किवा कुटुंब असेल कि नाही माहीत नाही.. फुड तयार करणारा तो कुक त्याची मानसिक/ आर्थिक कंडीशन काय असेल ??.. या सगळ्या प्रश्नानी मन सैरभैर झालं.. आणि इतकं सगळं झाल्यावर रात्री ९ नंतर जेव्हा त्या व्यक्तीच्या पोटात ते अन्न जाईल तेव्हा त्याचं रूपांतर कशात झालेलं असेल ??.. त्या अन्नातून त्याच्या पोटात काय जाईल ??बापरे… मी हरिनाम घ्यायला सुरुवात केल्यावर कुठे शांत झाले..

     पण तो विषय तिथेच संपला नाही तर तिथून त्या विषयाला खरी सुरुवात झाली कारण माझे भाऊ , भाचे , बाबा , काका , मामा आणि नवरा सगळेच उत्तम कुकिंग करतात अगदी पोळ्यापासुन ते लाडु मोदकापर्यंत त्यामुळे आमच्या घरात कधीही झोमॅटोवाला येउच शकत नाही.. जेव्हा स्त्रीने कमावायची गरज आहे तेव्हा पुरुषांनी किचनमधे जायलाच हवं..  आईने शिकवलं नाही हि चुक आहेच पण त्याहीपेक्षा तो का शिकला नाही ? त्याने बेसिक किचनमधल्या गोष्टी केल्याच पाहिजेत.. जोपर्यंत किचन युनीसेक्स होत नाही तोपर्यंत झोमॅटो / स्वीगी बंद होणार नाही कारण बऱ्याचदा बायकांचाही नाइलाज असतो.. कधी आळस असतो.. कधी होटेलींग ही फॅशन म्हणुनअनेक गोष्टी आहेत.. जेव्हा हे सगळं बंद होवून उत्तम किचन सगळे मिळून सांभाळतील तेव्हा सगळ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहिल..

वाढत असलेली वजनं ही सगळ्यात मोठी समस्या यामुळेच आली आहे याचा सगळ्यानी पुन्हा नव्याने विचार करा.. पुरुष अधूनमधून किचनमधे आले कि मुलही यायला लागतील.. काही लहान डिशेश त्यांनाही जमु शकतील.. त्यांना भाज्यांची नावं समजतील.. त्यांचे गुणधर्म आणि चवी कळतील.. आणि लग्न झाल्यावर त्यांचं काहीही अडणार नाही..

      आम्ही अमेरिकेत ४ वर्षे राहिलो आहोत .. तिथे किचन ही कंसेप्ट जाऊन रेडीफुड कंसेप्ट आली तेव्हापासून एम वरुन फोरएक्सेलवर  कपड्यांचे साईज  गेले आणि आरोग्य धोक्यात यायला लागलं.. पुन्हा नव्याने विचार करा.. मॉडर्न असणं म्हणजे नक्की काय ? याचाही विचार करा.. काल त्या मुलाने अन्न नाही तर त्याचे विचार त्या घरात पोचवले होते .. ते खाऊन त्या माणसाला काय मिळालं असेल ? खरच अन्न हे पूर्णब्रह्म आहे का ? आणि असेल तर ते कसं असायला हवं ? म्हणुन भगवंत गीतेत  म्हणतात , मला अर्पण न करता जो खातो तो पाप खातो..

    तुम्हाला काय वाटतं युनीसेक्स किचन असावं का ? कशी वाटली कंसेप्ट ? आमच्या घरी पिढ्यानपिढ्या हे सुरु आहे.. आणि तुमच्याकडे ? विचार बदला.. देश बदलेल..

-सोनल गोडबोले

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.