
घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं.
पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी लागत होती. अशावेळेस साथीच्या रोगांचीही भीतीच असायची. साथीतील काही रोग हे संसर्गजन्य असायचे. ज्यात वस्तीतील लोकंही जास्त करुन यायचे नाहीत. तेव्हा अशीच वेळ आलीच तर आपल्याच घरातील जन्माला आलेली मुलं आपल्या घरचा हातभार व्हावीत. त्यांचा आपल्याला आधार मिळावा. हाही एक उद्देश होता, जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचा.
काळ बदलला व बदलत्या काळानुसार आजारावर औषधांचा शोध लागला. त्यातच काही काही संसर्गजन्य साथीचे आजार कायमस्वरुपानं निघून गेले. परंतु जसा काळ बदलला. तसा तंत्रज्ञानातही बदल झाला. ज्यातून स्मार्टफोन आला व आता माणसं तुटू लागली आहेत. आज एखाद्यावेळेस एखादा व्यक्ती जर मरण पावलाच तर त्यात तो आजार शिवण्याची भीती नाही. मग भीती कशाची आहे?
भीती तसं पाहिल्यास आज कशाचीच नाही. परंतु वेळ नाही आज कुणाजवळ. असं वाटतं. माणसं एवढी पैसे कमविण्याच्या नादात गुंतलेली आहेत की त्यातून पुरेसा वेळ काढणंही कठीणच आहे. एवढंच नाही तर आजची माणसं पैसा मिळो अगर न मिळो, मोबाईलच्या नादातच गुंतलेली आहेत. त्यातच एखाद्यावेळेस एखाद्या घरी कोणी मरण जरी पावलं तरी चार लोकं गोळा व्हायला पाहात नाहीत. त्यातच त्यात आणखी एक नवीन कारण जुळलं आहे. ते कारण म्हणजे विदेशी राजकारण. आम्ही आमच्या मुलांना शिकवतो व ती मुलं शिकली वा जास्त शिकली तर ती विदेशात जावून स्थिर होतात. अशावेळेस केवळ आईबाप घरी राहतात. असे मायबाप की जे म्हातारे असतात व घरातल्या घरात राहणे पसंत करतात. असे म्हातारे मायबाप शेजारीही संपर्क ठेवत नाहीत. त्यातच काही देशातच राहणारी काही मंडळी अशी आहे की जी शेजारीही संपर्क ठेवत नाही. बोलत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी. मग लोकं मयतीला कसे येतील? हा प्रश्न निर्माण होतो व त्या प्रश्नांतून काही ठिकाणी कॉन्टॅक्ट पद्धती निर्माण झालेली आहे व त्या पद्धतीत वाढ होणार की काय? अशी चिन्हं निर्माण झालेली आहेत.
कॉन्टॅक्ट…… मयतीचाही कॉन्टॅक्ट? होय, माझ्या एका मित्राशी चर्चा करीत असतांना त्यानं चर्चेत सांगीतलं की एका व्यक्तीनं मरणाचंही कॉन्टॅक्ट दिलेलं होतं. ते आठ हजारात दिलं होतं. ज्यात घरापासून तर स्मशानभुमीपर्यंत त्या प्रेताला नेण्याचं कॉन्टॅक्ट होतं. त्यातच राखड वैगेरेचाही विधी होता.
आजच्या मरणाच्या कॉन्टॅक्टची पद्धती तेवढी काही नवीन नाही. ती पुर्वीच आहे. फक्त त्यात बदलाव झालेला आहे. काल एखादा व्यक्ती मरण पावलाच तर प्रेताच्या ठिकाणी रडायला माणसं मिळत नव्हती. अन् आप्त दिसायचीही. परंतु ती रडत नव्हती. कारण प्रकृती स्वास्थ बिघडायचं. त्यासाठी काही श्रीमंत कुटुंबात वा जमीनदारांच्या घरी अशी रडणारी मंडळी खासकरुन बोलावली जायची. ज्यांना रुदाली म्हणत. ह्या रुदाली एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर कॉन्टॅक्ट पद्धतीनुसार जात व रडत असत. ज्यातून त्यांना पुरेसे पैसे मिळत असत. याचाच अर्थ असा की पुर्वीही काही ठिकाणी तसंच घडत असे.
आजही तसंच घडतं. मात्र आज अशा रडणाऱ्यांना कॉन्टॅक्ट दिलं छात नाही तर मृत्यूचं कॉन्टॅक्ट दिलं जातं. ज्यात त्या व्यक्तीचं मरण होताच पुर्णच मरण्यानंतरचे सोपस्कार एखाद्या संस्थेला दिले जातात. ज्यातून यजमानाला कोणत्याही गोष्टी करण्याची गरज उरत नाही. कारण आज माणसांची वानवा भासत आहे.
आजच्या काळानुसार चार लोकं जमायला हवीत मरणात. तीच चार माणसं ग्वाही देतात की मेलेल्या संबंधित व्यक्तीचा स्वभाव कसा काय होता? तो मिलनसार होता की नाही. जर अशी चार माणसं जुळत नसतील तर आपल्याजवळ एवढा पैसा असून काय उपयोग? हो, पैशानं सारं विकत घेता येतं. पैशानं कॉन्टॅक्ट देवून चार माणसंही बोलावता येतात. परंतु मयत आटोपल्यावर लोकं नावबोटं ठेवतात व म्हणतात की तो व्यक्ती काय, ज्याच्या मरणाचाही कॉन्टॅक्ट द्यावा लागला. तेच बोल वर्षानुवर्ष लांच्छन लावल्यागत चालत असतं.
महत्वपुर्ण बाब ही की आजच्या काळात लोकांनी विचार करावा. विचार करावा की आपलं मरण झाल्यावर चार माणसं गोळा व्हावीत. विचार करावा की चार माणसांनी आपली मयत करावी. आपलं मरणही थाटामाटात साजरं व्हावं. त्यासाठी त्याची जीवंत असतांनाच तयारी करुन घ्यावी. आपण जीवंत असतांनाच चार लोकांना जुळवून ठेवावीत. त्यांच्याशी संवाद साधत राहावा. जेणेकरुन आपल्या संवादातून लोकांना भुरळ पडेल व ती मंडळी आपल्या मरणानंतर हळहळतील. ज्यातून आपल्या मरणात ती माणसं गीळा होतील. लोकं दोष देणार नाहीत. अन् जर आपण असं केलं नाही तर उद्या मरणानंतर आपल्याला कुत्रही विचारणार नाही. पैसे देवूनही कुणी मरणाचं कॉन्टॅक्ट घेणार नाही. त्यातच आपलं मृत शरीर आपल्याच घरी कुजत सडत पडलेलं असेल यात शंका नाही. असं होवू नये म्हणून निदान आपल्या मरणानंतर चार माणसं नाही गोळा झाले तरी चालेल. परंतु कुणीतरी आपल्या मरणाचा कॉन्टॅक्ट घेऊन आपल्या प्रेताला निदान घरापासून तर स्मशानभुमीपर्यंत तरी न्यावं. अशीच व्यवस्था जुळून येण्यासाठी आजच आपण आपला हेका सोडून मिलनसार भुमिका बजवावी म्हणजे झालं. जेणेकरुन आपली अंत्ययात्रा कॉन्टॅक्ट पद्धतीनुसार का होईना, व्यवस्थीत आटोपविता येईल.
-अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!