Monday, December 1

ती चिमणी… जी कधी विझली नाही!

"ती चिमणी मराठी कथा – विष्णू औटी IRS यांनी लिहिलेली भावनिक गोष्ट"

मागच्या आठवड्यात गावी एक शेजाऱ्यांचे लग्न होते. त्या लग्नासाठी एकटाच गावी गेलो होतो. लग्न संध्याकाळचे होते. दुपारी घरात उन्हाने फार उकडत असल्याने बाजूला चिंचेच्या झाडाच्या सावलीला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बाजेवर सहज पडलो होतो. मधूनच मोबाईल चाळत होतो. उन्हाने आळस येऊन डोळ्यांवर झापड येत असायची. तेवढ्यात मला कुणीतरी दाराजवळ बोलत असल्याचा आवाज आला.

                      “काय रं? कधी आला?” तिथे दिसत तर कुणी नव्हते. आणि मला ‘आरे-तुरे’ कोण म्हणत असावे? असा मला प्रश्न पडला. मी आपला इकडे-तिकडे बघत होतो. ‘इथे भुताटकी तर नाही ना?’ अशी शंका मनात येऊन गेली. कारण लहानपणी अनेकदा पिंपळाच्या, जुन्या वडाच्या, चिंचेच्या झाडांवर भुते असतात, हे अनेकदा ऐकलेले होते.

                      “नको इतका गडबडून जाऊ. मी इथेच आहे. अजून तुझी गडबडून जायची सवय गेली नाही,” असे कुणा मुलीचा बोलण्याचा आणि हसण्याचा मला आवाज आला. आवाज ओळखीचा असल्यासारखं वाटत असलं तरी काही अंदाज पण येत नव्हता. मी गोठ्याच्या दाराकडे बारीक नजरेने बघू लागलो. आणि मला ती भिंतीच्या कडेला माझ्याकडे चोरून बघताना दिसली. तिला बघताच क्षणभर तिच्यासोबतच्या अनेक आठवणींची पाने डोळ्यांपुढे भराऱ्या मारून गेली. एवढ्या उन्हातही विविध मोरपंखी आठवणी मनात थुई थुई नाचून गेल्या. आठवी ते दहावीच्या हुरळून जाण्याच्या दिवसांतील ती माझी मैत्रीण. आम्ही कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही. माझ्या सर्व सुख आणि दुःखाची ती साक्षीदार. अनेकदा जोराच्या वादळ-वाऱ्यात मला सोबत करताना तिचाही धीर सुटायचा. त्या रम्य दिवसांतील ‘ती गाण्याची वही, कितीदा तरी लिहिलेली पत्रे, चिठ्या-चपाट्या, मराठीचे आणि इतर विषयांचे निबंध, शाळेचीच काय तर इतर चोरून वाचलेली अवांतर पुस्तके’ अशा अनेक गोष्टींची तिला बघताच आठवण आली. या सर्वांची ती साक्षीदार.

                                   संध्याकाळी जेवण झाले की, घरात अभ्यासाला बसायला जागा नसायची. घराशेजारी जनावरांचा गोठा असायचा. तिथे आमचा मोती, अभ्यासाचे दप्तर आणि ती असे आम्ही तिघे असायचो. माझ्या बाजूला बसून ती माझा अभ्यास न्याहाळत बसायची. मी कविता म्हणायचो. ती आनंदाने डोलायची. मी काही पत्र, कविता, निबंध लिहित असेल तर ती पण त्यात डोकावून बघायची. गालातल्या गालात माझ्यासोबत ती पण हसायची.

                                                   “फूल हैं गुलाब का, चमेली का मत समझना,

                                                   जान हो तुम मेरी, मुझे बेजान मत समझना,”

                                                 असा काहीतरी शेर मी हसून लिहीत असताना ती सुद्धा गुदगुल्या झाल्यासारखी हसायची.

अभ्यासाच्या वेळी ती माझ्या सोबत असते, हे घरच्यांना माहीत होते. हा फक्त अभ्यास करतो ना? पुस्तके वाचतो ना? मग ठीक आहे. असं त्यांना वाटायचं. कुणी आमच्या या घनिष्ठ मैत्रीवर काही शंका घेतली नाही. रोज अभ्यास करताना आम्ही दोघे सोबत असणार, हे नक्की होतं. पण मी कधी तिला त्रास दिला नाही की तिने सुद्धा कधी माझ्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवली नाही.

आम्ही अगदी खेटून बसायचो. ती जवळ असली की खूप छान वाटायचं. मी जोपर्यंत जागा असायचो, तोपर्यंत ती तिथे बसायची. कधी कंटाळा करायची नाही. कधी कधी थकून ती पेंगाळून जायची. जोरात वारं आले की, काळ्या धुरांच्या रेषांसारखे तिचे अंग झुलायचे. मी कधी अभ्यास करता-करता तिला न्याहाळत बसायचो. मध्येच तिला एकाद्या कागदाच्या तुकड्याने गुदगुल्या करायचो. अशावेळी गुदगुल्या झाल्याने तिचा गोरापान चेहरा आणखी उजळून निघायचा. मला पण मजा वाटायची. कधी भूक लागली की, ती मला तिथेच एकट्याला अंधारात सोडून खुशाल निघून जायची. नेहमी तिच्या सोबतीची सवय असल्याने अशावेळी अंधारात मोती सोबत असला तरी अगदी घाबरून जायला व्हायचं. त्यामुळे अभ्यासाला बसण्यापूर्वीच तिच्या जेवणाची चौकशी करावी लागायची. तिचं पोट भरलेलं असलं की, कसलं टेन्शन नसायचं.

                                  दिवसभर आम्ही आपापल्या कामात व्यस्त असायचो. संध्याकाळी मात्र जेवण झाले की न चुकता भेटायचो. ते दिवसच रम्य होते. हळव्या स्वप्नांचे होते. पुढं काय करायचं, यावर किती तरी वेळा नियोजन मी तिच्या सोबत करत असायचो आणि तिची त्याला मूकसंमती असायची. आम्ही जीवश्च कंठश्च मित्र मैत्रिण होतो.

                                   दिवसांमागून दिवस गेले. मी दहावी सुटलो आणि पुढील शिक्षणासाठी वस्तीगृहात राहू लागलो. रोज संध्याकाळी तिची आठवण यायचीच. सुट्टीत गावी गेल्यावर तिथे असेपर्यंत रोज संध्याकाळी तिची नित्य नियमाने भेट घ्यायचो. हळूहळू गावी जाणं कमी झाले. ती पण नंतर आजारी पडली. सगळे तिच्याकडे दुर्लक्ष करू लागले. जमेल तसे ती तिचं आयुष्य काढू लागली. माझी कायम आठवण करत असायची. कार्यबाहुल्यामुळे आताशा मी गावी गेल्यावर ती कुठे आहे आणि काय करतेय? याची पण आठवण यायची नाही. मी तर जवळपास तिला विसरलो होतो. पण आज ती दिसताच मला माझ्या स्वार्थीपणाची लाज वाटली. तिच्या सोबतीचा मी फायदा घेतला आणि आता तिला विसरलो होतो.

                                    मी तिथून उठलो. तिला जवळ घेतले. बिचारी तिच्या शरीराची अगदी दूर्दशा झाल्याने कोलमडून गेलेली दिसत होती. तिला धडपणे उभे सुद्धा राहता येत नव्हते. तिचा कान सुद्धा कुणीतरी अगदी वाईट पद्धतीने तोडला होता. मी तिला जवळ घेतले. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. अंगावर असलेली धूळ झटकली. तिचा चेहरा खुलला. आमची संगत सुटल्यानंतर तिला बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले, असे दिसत होते. तिची अवस्था बघून मला फार वाईट वाटले. माझ्या अडचणीच्या काळात तिने मला माझ्याकडून असलीही अपेक्षा न ठेवता, साथ दिली होती. आणि आता मला बरे दिवस आले तर मी सरळ तिला विसरलो. आता तिला मी माझ्या सोबत घेऊन यायचं ठरवलं. तिला आता मी जीवापाड जपणार आहे. पुन्हा अशी वाऱ्यावर सोडून देणार नाही. एवढीशी ती राॅकेलवर चालणारी आणि धूराने नाक काळं करणारी ती चिमणी आणि एवढासा तिचा प्रकाश होता. पण सर्व ठळक दिसायचे. आता घरभर ट्यूब लावले तरी स्पष्ट दिसत नाही.

Vishnu Auti IRS Sir

आयकर उपायुक्त औरंगाबाद

(नाना, मी साह्यब झालो.- पुस्तकाचे लेखक)

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.