
कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा
कुंभारी तांडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) प्रतिनिधी : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी संघटनेतर्फे कुंभारी तांड्यावर सामाजिक भान, प्रेरणा आणि एकतेचा अनोखा मेळ साधणारा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गावातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा, नवीन शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा, तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तांड्याचे नायक श्री. सुधाकर राठोड यांनी भूषविले, तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव राठोड यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (सहसचिव, अखिल भारतीय तांडा सुधार समिती) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, एमपीएससी, पोलीस भरती आणि उच्च शिक्षणाच्या संधींवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन श्री. दत्ताराव पवार (विज्ञान शिक्षक, स्व. प्रकाशभाऊ उमाठे विद्यालय, नागपूर) यांनी प्रभावी, भावनिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले. मागील सात वर्षांपासून “बॅक टू सोसायटी” या संकल्पनेवर कार्यरत असलेल्या पवार सरांनी कर्मचारी व विद्यार्थ्यांना एकत्र आणून गावात शिक्षणप्रेम आणि सामाजिक एकतेचा दीप प्रज्वलित ठेवला आहे.
सोहळ्यात उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. तुषार पवार, डॉ. मधुकर जाधव, RFO नितीन जाधव, फायर ऑफिसर वसंत पवार, श्री. डी. बी. पवार, श्री. के. एम. पवार, श्री. रमेश जाधव (सहायक महसूल अधिकारी) यांचा विशेष समावेश होता. तसेच गावातील तंटामुक्ती समिती, शाळा सुधार समिती, मंदिर समिती यांचे पदाधिकारीही उपस्थित होते. सेवानिवृत्त पोलीस पाटील मारोतराव मस्के यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमात अनुभव व समाजभावनेचा सूर गुंजला. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, मीडिया अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधल्याचे गौरवाने सांगण्यात आले.

आपल्या भाषणात श्री. दत्ताराव पवार म्हणाले, “आपला तांडा अजूनही रस्ता, पाणी, वीज आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आज देश सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपण विकासाच्या स्पर्धेत मागे राहिलो आहोत. आपला समाज बदलणार असेल, तर तो बाहेरच्यांच्या मदतीने नव्हे, तर आपल्या एकतेने आणि जागृतीनेच बदलू शकतो.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये आत्मपरीक्षणाची लहर निर्माण झाली. गावातील महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याची जाणीव पुन्हा दृढ केली.
कार्यक्रमादरम्यान काही प्रवृत्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला असला, तरी गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि संघटनेच्या एकजुटीमुळे हा सोहळा यशस्वी ठरला. शेवटी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. हा सत्कार सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो “तांड्याच्या प्रगतीचा घोष” होता
“एकता, शिक्षण आणि आत्मविश्वास हाच तांड्याचा विकासमार्ग!”
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र