
‘त्या सायकलच्या घंटीत दडलेलं प्रेम ; पोस्टमन काकांच्या आठवणींतून!’
आजच्या डिजिटल युगात एक क्लिक पुरेसं असतं संदेश पोहोचवण्यासाठी, फोटो शेअर करण्यासाठी, किंवा कोणाचं हसतंय का रुसलंय हे जाणून घेण्यासाठी. पण कधी विचार केला आहे का, त्या एका क्लिकमुळे आपण काय गमावलंय? आपण हरवलोय त्या सायकलच्या छोट्याशा घंटेचा आवाज, जो ऐकला की अंगावर रोमांच उभे राहायचे कारण तो आवाज असायचा पोस्टमन काकांचा!
तेच पोस्टमन काका… भर उन्हात, मुसळधार पावसात, वाऱ्याच्या झंझावातातही आपली जबाबदारी निभावणारे. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची एक रेष सुद्धा नसायची. हातात बॅग, खांद्यावर पत्रांची गाठडी आणि सायकलला लटकलेली लहानशी घंटी पण ती घंटी म्हणजे एखाद्या घरासाठी आनंदाची वर्दी!
त्या काळात पत्र म्हणजे फक्त एक कागद नव्हता. ती असायची भावना, प्रेम, आपुलकी आणि आठवणींचं मूर्त रूप. त्या कागदावर उमटलेले शाईचे ठिपके म्हणजे कोणाचं धडधडणारं हृदय. कुणाचं लग्न ठरल्याची बातमी, कुणाच्या परदेशी गेलेल्या मुलाचं पत्र, कुणाच्या अभ्यासाचं कौतुक प्रत्येक पत्र वेगळं आणि प्रत्येक भावनांनी ओथंबलेलं. पोस्टमन काका म्हणजे त्या भावनांचे वाहक. त्यांनी फक्त पत्र नाही दिली, त्यांनी नात्यांची भेट दिली. त्यांच्या हातात आलं की पत्राचं वजन जास्त वाटायचं कारण त्यात असायचं भावनांचं ओझं.
आमच्या लहानपणी पोस्टमन काकांची सायकल ही आमच्यासाठी एखाद्या देवदूताची सवारी वाटायची. गावात सायकलची घंटा वाजली की सगळं अंगण धावून जायचं. कधी आमचं पत्र असायचं, कधी शेजाऱ्याचं पण आनंद सारखाच असायचा. त्या सायकलच्या पेडलसोबत फिरायची अपेक्षा, त्या घंटीसोबत वाजायची आशा. आणि जेव्हा ते म्हणायचे “तुमचं पत्र आलंय!”, तेव्हा घरभर आनंदाचा गजर व्हायचा. त्या क्षणी घराचं वातावरण जणू उजळून निघायचं.
पावसाळ्यात कधी कधी पत्रं ओली व्हायची. पण काकांनी ती जपून ठेवलेली असायची. पिशवीत कपड्याने गुंडाळलेली, काही अक्षरं धूसर, पण भावना मात्र ताज्याच! ते म्हणायचे, “थोडं पाणी पडलंय, पण पत्र वाचता येईल.” तेवढं ऐकलं की मनाच्या कोपऱ्यात कुणीतरी हळवं होतं. कारण ती पत्रं फक्त शब्द नव्हती ती एखाद्या आईचं समाधान, एखाद्या वडिलांचा अभिमान, एखाद्या प्रियकराचं प्रेम, एखाद्या मुलाचं कौतुक होती.
आज आपण हजारो मेसेज पाठवतो. “हॅलो”, “कसं आहेस?”, “मिस यू” सगळं काही दोन सेकंदात पोहोचतं. पण त्यात ती उब, ती आत्मीयता, तो “मनापासून लिहिलेला भाव” हरवलाय. हाताने लिहिलेलं पत्र म्हणजे भावना ओघळणारी शाई होती. आणि आजचा मेसेज? तो म्हणजे फक्त अक्षरांचा संच. काळाच्या ओघात वेग वाढला, पण हृदयाचं अंतर वाढलं.
आज पोस्ट ऑफिसमध्ये बसून QR कोड, पार्सल, ईमेल यांची गर्दी दिसते. पण त्या गर्दीत कुठे हरवलेत ते आपले पोस्टमन काका? त्यांचा तो स्मितहास्य, ती न थकणारी सायकल, ती दार ठोठावण्याची सवय आता आठवणींतच उरलीय. ते फक्त कामगार नव्हते, ते प्रत्येक घराचे भावनिक दूत होते. तेवढं पत्र देऊन ते पुढच्या घराकडे निघून जायचे, पण मागे राहायची भावनांची लाट. त्यांच्या पावलांचा आवाज ओसरल्यावरही मनात घुमत राहायचा “किती साधं आयुष्य, पण किती मोठं योगदान!”
पूर्वी पत्र येणं म्हणजे उत्सव. आज ईमेल येणं म्हणजे सूचना. पूर्वी लोक एकमेकांच्या भावनांत जगायचे, आज लोक एकमेकांच्या स्टेटसमध्ये अडकलेत.पूर्वी “पत्र वाचलं का?” असा प्रश्न असायचा, आता “तू सीन केलंय का?” असा. पण तरीही मन कुठेतरी त्या जुन्या काळात अडकून राहतं. कारण त्या काळात संवाद हृदयाशी होता, आज तो डिव्हाइसशी आहे.
त्या सर्व पोस्टमन काकांना आज मनापासून सलाम, ज्यांनी पावसात भिजूनही पत्रं दिली, उन्हात होरपळूनही नाती जपली, आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक घरात आनंद पसरवला. त्यांच्या सायकलच्या प्रत्येक घंटीचा आवाज म्हणजे आपल्या बालपणाचा soundtrack आहे. आणि त्यांचं “तुमचं पत्र आलंय!” हे वाक्य म्हणजे आयुष्यभरासाठी मिळालेला एक भावनिक ठेवा.
काळ पुढे सरकला, साधनं बदलली, पण भावना तशाच राहिल्यात. आजही कुणाचं हाताने लिहिलेलं पत्र मिळालं, तर मनात लहर उठते. कारण त्यात असते प्रामाणिकता. त्या पोस्टमन काकांची सायकल जरी आता रस्त्यावर दिसत नसेल, तरी त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. त्यांनी आम्हाला शिकवलं “संवाद फक्त शब्दांनी नव्हे, भावनांनीही होतो.”
त्या पत्रांच्या ओळींत आजही ओल आहे…त्या सायकलच्या घंटीत आजही हसू दडलंय…आणि त्या पोस्टमन काकांच्या स्मितात आजही जगायचं कारण सापडतंय…!

– बंडूकुमार धवणे