
भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!
भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे कारण ते ज्ञान आणि माहितीचे केंद्र आहेत.मराठी भाषेची समृद्धता आणि संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका फार मोलाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वाचनामुळे लेखन कौशल्य मुलांना अवगत होते. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते. ग्रंथालय चळवळ समृद्ध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.
भाषा संवर्धन आणि ग्रंथालये यांचा घनिष्ठ संबंध आहे, कारण ग्रंथालये भाषेचे जतन आणि विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रंथालये माहिती आणि साहित्याचा संग्रह करून भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात, तसेच भाषेच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवतात. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालये, शाळा-महाविद्यालयीन ग्रंथालये, आणि मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत संस्था यांचा समावेश होतो.
ग्रंथालयांमुळे लोकांमध्ये वाचनाची सवय वाढते, ज्यामुळे नवीन शब्द आणि संकल्पना समजून घेण्यास मदत होते, तसेच ते शिक्षणाचा आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ग्रंथालये ज्ञानाचे भांडार आहेत. नवीन ग्रंथालये उघडल्याने अधिक लोकांना मराठी साहित्य, इतिहास आणि आधुनिक विषयांची माहिती मिळेल. वाचनाची सवय आणि ग्रंथालयांमुळे वाचनाची आवड निर्माण होते. वाचनामुळे भाषेतील शब्दसंग्रह वाढतो आणि भाषेचा विकास होतो. मराठीत नवीन शब्द तयार होण्यासाठी हे आवश्यक आहे.
ग्रंथालये ही शिक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वाची साधने आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवता येते आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. ग्रंथालयामुळे
सांस्कृतिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होते.ग्रंथालये ही सामाजिक विकासाची ऊर्जा केंद्रे आहेत. ती लोकांना एकत्र आणतात, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि समाजाला ज्ञान व मनोरंजनाचे साधन पुरवतात.
ग्रंथालयांची संख्या वाढवण्यासाठी शासनाने आणि खाजगी संस्थांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. यात ग्रंथालय संचालनालयासारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनासाठी ग्रंथालयांची संख्या वाढवणे आणि त्यांना अधिक सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शासन आणि ग्रंथालय संचालनालयाने ग्रंथालयांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक अनुदान देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात. समाजातील लोकांनी ग्रंथालयांच्या विकासासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
मराठी भाषा समृद्ध होण्याकरता प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून मुलांमध्ये भाषा वृद्धिंगत होते. ग्रंथालयामध्ये मुलांमध्ये ‘वाचन ग्रुप’ स्थापन करून मुलांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून वाचनाची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे.
मराठी भाषेला जागतिक स्तरापर्यंत घेऊन जावयाचे असेल तर ग्रंथालयांची भूमिकादेखील तेवढीच महत्त्वाची असेल. ग्रंथालयामार्फत ‘वाचन चळवळ’ मोठी करून तसेच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून उदा. पुस्तक प्रदर्शन, वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा इ. माध्यमातून ही चळवळ पुढे घेऊन जाऊ शकतो व मराठी भाषा ही वृद्धिंगत होऊ शकते.
भाषा समृद्धीसाठी वाचन करणे महत्त्वाचे आहे. कारण ते शब्दसंग्रह वाढवते, वाक्यरचना सुधारते आणि आकलन क्षमता वाढवते. नियमित वाचनाने भाषेच्या विविध पैलूंची माहिती मिळते आणि भाषिक कौशल्ये विकसित होतात.
नियमित वाचनामुळे नवीन शब्द शिकायला मिळतात, ज्यामुळे तुमच्या बोलण्यात आणि लेखनात अधिक विविधता येते. वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये वाचून तुम्हाला भाषेच्या रचनेची आणि शैलीची चांगली समज येते वाचलेल्या मजकुराचा अर्थ लावण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो.
मूलभूत सुविधा अपुर्या असूनसुद्धा या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात वाचक येतात. तरी सरकारने या ग्रंथालयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज सरकार वाचन संस्कृती नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करणार्याचा आव आणतात. मात्र वास्तविकमध्ये जे ग्रंथालय अस्तित्वात आहेत. त्या ग्रंथालयांना आर्थिक मदत सरकारकडून वेळात मिळत नाही. सोबतच आज काही प्रसिद्ध ग्रंथालयांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सरकारने यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे.
एकेकाळी वाचकांची रांग लागणार्या ग्रंथालयाकडे मात्र आताच्या तरुण पिढीने पाठ फिरवली आहे. आता येणारा विद्यार्थी वर्ग हा मुख्यत: स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी येतो. त्याला अवांतर वाचनाची गोडी नाही. जे काही थोडे विद्यार्थी वाचतात ते मोबाइल किंवा आयपॅडवरच पुस्तके वाचणे पसंत करत आहेत.
आजकाल ग्रंथालये ई-ग्रंथालयांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत, ज्यामुळे ज्ञानाची उपलब्धता अधिक व्यापक होते. त्यामुळे ग्रंथालयांची संख्या वाढवून त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे. नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक मोलाचे ग्रंथ हे ग्रंथालयामधून वाचता येणे शक्य झाले आहे, इतकेच नाही तर कुणालाही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून हव्या त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्या दृष्टीने ग्रंथालये ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्याने ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होत आली आहे.
प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन