Sunday, October 26

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!

पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केलेल्या पक्षकाराची घटना

पुणे : “तारीख पे तारीख…” गेली २७ वर्षे कोर्टात न्यायाची वाट पाहणाऱ्या पक्षकाराने शेवटी मृत्यूचीच निवड केली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेने न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव गेल्या २७ वर्षांपासून जमीन व्यवहाराशी संबंधित एका वादग्रस्त प्रकरणात न्याय मिळण्याची वाट पाहत होते. प्रत्येक सुनावणीला केवळ “तारीख” मिळत होती, निकाल नव्हता. या सततच्या विलंबामुळे ते नैराश्यात गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे.

या घटनेने न्यायालयीन व्यवस्थेतील प्रलंबित खटल्यांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. हजारो प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असून, न्याय मिळण्यात होणारा विलंब नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम करतोय.

दरम्यान, न्यायालयाच्या इमारतीतील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवण्याची मागणी आता होत आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.