
मराठीची उंची मोठी करूया!
मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या उत्क्रांतीतून मराठी भाषेची चिन्हे दिसू लागली. या प्रवासात यादवकाळातील महानुभावांचे गद्य साहित्य (उदा. ‘लीळाचरित्र’) आणि संत ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या भक्तीकाव्याने (उदा. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अभंग’) साहित्याला नवी दिशा दिली. त्यानंतर पेठ आणि वारकरी संप्रदायाच्या साहित्यकृतींनी मराठी भाषा व संस्कृतीला समृद्ध केले.
मराठी भाषेचा उगम ‘प्राकृत’ या आर्यांची प्राचीन भाषा असलेल्या बोलीभाषेतून झाला, असे मानले जाते. आद्य ग्रंथ: मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा मराठीचा आद्यग्रंथ मानला जात असे, परंतु आता तो ‘ज्ञानेश्वरी’ नंतरचा असल्याचे मानले जाते. ‘लीळाचरित्र’ हा महानुभाव पंथाचा ‘आद्य ग्रंथ’ मानला जातो. महानुभाव पंथीयांनी ‘लीळाचरित्र’ आणि ‘स्मृतिस्थळ’ सारखे चरित्रग्रंथ तसेच काव्यग्रंथ निर्माण करून मराठी वाङ्मयाला गद्याची आणि भक्तीची समृद्ध परंपरा दिली. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ (भावार्थ दीपिका) या ग्रंथातून भगवद्गीतेचे सार सांगितले. यानंतर संत नामदेव आणि इतर संतांच्या भक्तीगीतांनी (अभंग) मराठी साहित्य समृद्ध केले. केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेचा पाया रचला आणि स्वच्छंद छंदातून कवितांची निर्मिती केली, ज्यामुळे त्यांना ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ मानले जाते. वि.स. खांडेकर यांच्या ‘ययाति’, वि.वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ आणि वि.ग. करंदीकर यांच्या ‘अष्टदर्शने’ यांसारख्या साहित्यकृतींनी आधुनिक गद्य व काव्य साहित्याला विशेष ओळख दिली.
या सर्व टप्प्यांमधून मराठी साहित्य, साहित्य प्रकार आणि भाषेचा विकास होत गेला, ज्यामुळे ते आज समृद्ध आणि वैविध्यपूर्ण बनले आहे.
आपण इंग्लंडमध्ये गेल्यावर शेक्सपियरचे घर पाहिल्याशिवाय येत नाही. मग किती जणांना कुसुमाग्रजांची जन्मस्थान, पु ल देशपांडे यांचे घर पाहावेसे वाटते? किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचली? आपल्याला स्वतःच्या भाषेचा साहित्याचा साहित्याचा अभिमान वाटला पाहिजे खरे तर भाषा ही वाद घालण्याची बाब नाही स्वतःच्या भाषेकडे पाहण्यासाठी इतरांच्या माना वळवण्याची गरज नाही. उलट मराठीची उंचीच इतकी मोठी करू या की इतरांना माना वर करून तिच्याकडे पाहावे लागेल.
दरवर्षी मराठी भाषा दिन आला की, सर्वांना ‘मराठी’ आपली ‘माय’ असल्याचा पुळका येतो. मग मराठी भाषेचा हा ‘कळवळा’ वर्तमानपत्रांच्या रकान्यातून भरभरून वाहतो तर कधी तो दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चर्चांमधून ओसंडताना दिसतो. पण हे केवळ तेवढ्या एका दिवसापूरतेच असते वर्षभर मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र केवळ प्रमाण भाषेचा विचार करून भागणार नाही तर त्या त्या ठिकाणाच्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी व जतनासाठी ही प्रयत्न होणे नितांत गरजेचे आहे.
आपल्या रोजच्या दैनिक जीवनात छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या तर मराठी भाषा समृद्ध व्हायला व मराठी भाषेची उंची वाढायला फारसा वेळ लागणार नाही आपली मातृभाषा टिकावी म्हणून आपण काही प्रयत्न करतो का ? किंवा करायला हवेत तर कोणते प्रयत्न करायला हवेत? याचा विचार करण्याची व प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात राहून आपल्याला मराठी भाषेची महत्त्व तितके जाणवत नाही. आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्हा परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळखी भाषा कानावर पडू लागते तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतो. चुकून आपली भाषा बोलणारी अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही आपली वाटतात. हे भाषेचे अदृश्य धागे हे आपण कधी समजून घेणार आहोत?
आपलेच संवेदन शून्य होत जाणार मन सध्या विसरत चालले आहे की आपली भाषा आपली मातृभाषा ही सुद्धा जागतिक भाषेच्या रेट्यासमोर प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. एकीकडे इंग्रजी सारख्या भाषेचा द्वेष तर करायचाच नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.
त्याचबरोबर आपली भाषा समृद्ध करायची तिचा वापर प्रसार करायचा आणि तिचे अस्तित्व अबाधित राखायचे हे सुद्धा मोठे आव्हान आहे. स्वतःची मूळ भाषा टिकवून किंवा वेळ प्रसंगी टाकून परभाषेच्या स्वीकार करण्याची प्रवृत्ती आज वाढत आहे. प्रत्येक भाषेकडे असणारी लवचिकता बोलणाऱ्यास उपयोगी पडते. या घटना वरकरणी सहज घडत असल्या तरी याचा परिणाम म्हणून काही भाषा क्वचितच सबल बनतात. खरे तर बहुतांशवेळी भाषा दुर्बल बनत जातात भाषेतील शब्द संख्या कमी होत जाते आणि भाषेचा परिणाम क्षीण होऊ लागतो कालपरत्वे अशा भाषा विस्मरणाच्या सीमारेषेवर पोचतात.
अनुभवाच्या निमित्ताने हे निरीक्षण अधिक स्पष्ट झाले. अनेक समाज घटकांनी घरात बोलायची एक भाषा आणि घराबाहेर पडल्यावर बाहेर बोलायची भाषा हे दोन स्वतंत्र कप्पे केले आहे मुख्य प्रवाहात येण्याची उर्मी, समाजातला वावर आणि आपली मूळ भाषा न बोलल्यामुळे फारसे न होणारे नुकसान यामुळे मूळ परंपरागत भाषांकडे दुर्लक्ष होत गेले मराठी भाषेला उंच करण्यासाठी आपण तिच्या वापराला प्रोत्साहन देऊ शकतो, तिच्या विकासासाठी प्रयत्न करू शकतो आणि तिच्या समृद्ध परंपरेचा आदर करू शकतो. मराठीला नुकताच ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाला आहे, ज्यातून भाषेला अधिक निधी आणि संसाधने उपलब्ध होतील, ज्यामुळे भाषेची प्रगती साधता येईल.

प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६