शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह “धनुष्यबाण” यावरील मालकी हक्काच्या वादावर आज, मंगळवार (८ ऑक्टोबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू केला. मात्र, काही कारणांमुळे आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर न्यायालयाने ही सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले.
सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागणे आवश्यक आहे.” त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ देण्याची विनंती केली. तथापि, दुसऱ्या बाजूच्या वकिलांच्या वारंवार हस्तक्षेपामुळे काही वेळ वाया गेला, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.
सिब्बल यांच्या मांडणीनंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांना पुढील सुनावणीसाठी वेळ देत सांगितले की, या प्रकरणावर आता १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद पार पडेल. त्यानंतरच खरी शिवसेना कोणाची? यावरचा निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.
या घडामोडीनंतर ॲड. असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “कपिल सिब्बल यांनी कोर्टात फक्त ४५ मिनिटांचा वेळ मागितला. आम्ही कोर्टासमोर महापालिका निवडणुका जानेवारीत असल्याचे सांगितले. कोर्टाने हे लक्षात घेऊन आधी ठरवलेली १९ नोव्हेंबरची तारीख रद्द करून १२ नोव्हेंबर ठरवली आहे. यानुसार १२, १३ आणि १४ नोव्हेंबर या तीन दिवसांत अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.”
या सुनावणीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांचीही प्रतिष्ठा या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे १२ नोव्हेंबरला होणारी ही सुनावणी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणार आहे.