Monday, October 27

‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती

शिक्षक टीईटी परीक्षा देताना – मुख्याध्यापक आणि पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक

सोलापूर : शिक्षकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ‘टीईटी’ (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी या पदांवर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे टीईटी न उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची पदोन्नती सध्या थांबविण्यात आली आहे.

न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागांनी पदोन्नतीची कार्यवाही थांबविली आहे. यामुळे अनेक वरिष्ठ शिक्षकांची पदोन्नती प्रक्रियाच ठप्प झाली आहे.

केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे सरळसेवा आणि उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नतीद्वारे भरली जातात. विस्ताराधिकाऱ्यांचीही अशीच पद्धत आहे. मात्र, आता या दोन्ही प्रकारांमध्ये ‘टीईटी’ उत्तीर्ण अट अनिवार्य करण्यात आली आहे.

सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, “न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती प्रक्रियेसाठी ‘टीईटी’ उत्तीर्ण बंधनकारक आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना आल्यावरच पुढील कार्यवाही केली जाईल.”

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होण्याची मुदत दिली आहे. अन्यथा परीक्षा न देणारे किंवा अपयशी ठरणारे शिक्षक सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या कारवाईस पात्र ठरतील.

शासनाने अजून ठोस भूमिका घेतली नसली तरी ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांनाच भविष्यात पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही ‘टीईटी’साठी अर्ज करण्याची मुदत ९ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांनी तत्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.