
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
पुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आशा आहे,” असं म्हणत त्यांनी न्यायप्रणालीवर उपरोधिक टीका केली.
ते पुढे म्हणाले, “शेतकरी आत्महत्या करतोय, कारण तो प्रामाणिक आहे. उद्योगपती करोडो रुपये घेऊन परदेशात पळतात, त्यांचं कर्ज माफ होतं, पण शेतकऱ्यांच्या घरावर नोटीस लागली की तो जगण्यापेक्षा मरायला तयार होतो. सरकारने आता या सर्वसामान्यांचीही काळजी घ्यावी.”
महिलांच्या संदर्भात ठाकरे म्हणाले, “निवडणुकीच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा करून मत मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आता खरी गरज आहे. महाराष्ट्राच्या बहिणींना सध्या आधाराची गरज आहे. बिहारच्या निवडणुका जाहीरही झाल्या नाहीत, तरी मोदीजींनी तिथल्या ७५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी ₹१०,००० जमा केले. मग महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? की बिहारच्या मतांची गरज आहे म्हणून त्यांच्यावर प्रेम दाखवलं जातं?” असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “महिलांना दर महिन्याला ₹२१०० देणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं, पण अजून त्याचा काही पत्ता नाही. जे पैसे महिलांना दिले जातात ते उपकार नाहीत, तर त्यांचा हक्क आहे. या माझ्या बहिणी आहेत, तुमच्या पगारी मतदार नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचं योग्य हक्काचं मिळालंच पाहिजे.”
शिवसेनेच्या विचारधारेचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “आपले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे – ‘८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण.’ म्हणूनच आम्ही समाजासाठी आहोत. सत्ता असो वा नसो, न्याय आणि हक्कासाठी लढणं हेच शिवसेनेचं कार्य आहे.”
शेवटी त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं की, “या लाडक्या बहिणींच्या पाठिशी ठामपणे उभं राहा. त्यांना कधीही रडू द्यायचं नाही, त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवायचा. हेच आमचं कार्य आणि हेच आमचं कर्तव्य आहे.”
पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या…