लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन

गौरव प्रकाशन अमरावती | १6 जून २०२५

नाशिक येथे १५ जून २०२५२०२५ रोजी पार पडलेला आकाश गायगवळी (जळका, शहापूर – अमरावती) आणि मेनका वाघ (नाशिक) यांचा विवाह समाजातील पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देणारा ठरला. लग्नानंतर १६ जून रोजी शहापूर तालुक्यातील जळका गावात आयोजित स्वागत समारंभात डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी या विवाहाचे कौतुक करत स्पष्टपणे आवाहन केले – “लग्नातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करा!”

या विवाहात पारंपरिक ‘हळदी समारंभ’ घेण्यात आला नाही. विवाहपत्रिकेतच याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, वधू मेनका वाघ यांनी परंपरेतील काळे मणी नसलेले मंगळसूत्र परिधान करत सामाजिक संकेतांना आव्हान दिले.

डॉ. मुन्द्रे म्हणाले, “काळे मणी न घालता देखील मंगळसूत्र पूर्ण असू शकते, हे या दोघांनी दाखवून दिले. त्यांनी फक्त विवाह केला नाही, तर समाजातील अंधश्रद्धांना विचारपूर्वक नकार दिला आहे.”

आकाश गायगवळी हा गेली वीस वर्षे आंबेडकरी चळवळीत सक्रीय असून, आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुउद्देशीय संस्था, भीमनगर – अमरावती या संस्थेचा तो सक्रिय सदस्य आहे. बालसंस्कार वर्गांचे प्रशिक्षक म्हणून काम करताना त्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये आंबेडकरी विचारांची पेरणी केली. तो एक चांगला गायक आणि नाट्यकलाकार असून, महात्मा फुले यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर करतो.

स्वागत समारंभात डॉ. मुन्द्रे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “आपण बाबासाहेबांनी दिलेले मूल्याधिष्ठित, विचारशील जीवन जगत आहोत. लग्नासारखे कार्यक्रमही त्या विचारांतून पार पडले पाहिजेत. बाबासाहेब म्हणाले होते – ‘एकच दागिना घाला – तोही सोन्याचा.’ याच विचारांची प्रचिती या विवाहातून मिळते.”

या सोहळ्यास मदन गायकवाड, योगेश मोहोड, पंकज मनोहरे, मनोज वानखडे, गौतम बागडे, सचिन डहाट, तसेच गावातील मित्रमंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा विवाह केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नव्हता, तर एका नव्या समाजमनाचा आरंभ होता – अंधश्रद्धा बाजूला ठेवून विचारांना आणि समतेच्या मूल्यांना समर्पित एक आदर्श विवाह!