नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

हा माझा विदर्भातला जिगरी दोस्त. वर्ध्याचा. हरीश इथापे ! लै भारी माणूस. आम्हा दोघांच्या दोस्तीचा एकच धागा – ‘नाटक’ ! हरीशला शेती, घरच्या जबाबदार्‍या सोडून लांब पुन्यामुंबैला जाऊन ‘नाटक’ करणं शक्य नव्हतं आनि गांवाकडं शेती करता-करता नाटकाचा ‘किडा’ स्वस्थ बसू देईना ! काय करायचं?

… मग त्यानं शेतातच शेतकरी मित्रांना सोबत घेऊन जगावेगळं ‘ॲग्रो-थिएटर’ सुरू केलं ! 

…हरीशचं टॅलेंट एवढं जबरदस्त की नादखुळ्या, भन्नाट ‘ॲग्रो थिएटर’ची ख्याती हळूहळू दूरवर पसरत गेली. आता महाराष्ट्रासहित आसपासच्या सहा-सात राज्यातून इथे नाटकाचे ग्रुप त्याच्या शेतात येतात. शेतात एक हाॅल बांधलाय. रहाण्या-जेवण्याची, रिहर्सलची सोय तिथंच आहे. पोरंपोरी महिना-महिना रहातात. नाटकाची वर्कशाॅप्स, लेखन, रिहर्सल्स करतात. बांधावर-विहीरीवर-तळ्याकाठी ‘मोनोलाॅग्ज’ पाठ करत बसतात… झाडांशी-पक्षांशी बोलायला शिकतात.. मग कलाकार बहरून यायला किती वेळ लागतोय भावांनो ! मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सहवासात समृद्ध झालेली पोरं नकळत भारतीय रंगभूमीच्या खजिन्यात मौल्यवान भर टाकतात. यातून तयार झालेल्या कितीतरी पोरापोरींनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये प्रवेश मिळवलाय !

हे सगळं करताना हरीशनं ‘सामाजिक भान’ सोडलेलं नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचं काम असो, जंगली प्राणी-सर्पमैत्रीविषयक काम असो किंवा शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या समस्या यासंबंधातलं काम असो.. प्रत्येक ठिकाणी हरीश तितक्याच तळमळीने काम करतो. अलिकडेच त्यानं विदर्भातल्या शेतकर्‍यांची वेदना ताकदीनं मांडणारा ‘तेरवं’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. मला एक तगडी भुमिकाही दिली,

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

…मी लिहीलेल्या ‘उलट सुलट’ नाटकाच्या लेखनानिमित्तानं विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मी हरीशकडं जाऊन राहिलो होतो. शेतात फिरलो, झाडाला लगडलेल्या पिकल्या फळांचा स्वाद घेतला, रानात चाळीस डिग्री तापमानात लसुण पेरणार्‍या बायकामाणसांच्यात बसून संवाद साधला.

…हरीशसारखे मित्र आयुष्यात असले ना भावांनो, की ‘समाधान’ मिळवण्यासाठी वेगळी धडपड करायची गरज नसते ! त्यांच्या संगतीत घालवलेलं दोन दिवसांचं रसरशीत जगणंही पुढच्या सगळ्या संघर्षासाठी भरभरून ऊर्जा देतं.

आज आमची मैत्री आमच्या पुढच्या पिढीमध्ये ‘पास’ झालीय. हरीशची मुलगी संहिता आणि माझी मुलगी ईशा यांच्यात आमच्याइतकंच घट्ट, समजुतदार आणि नितळ नातं निर्माण झालंय…

हरीश इथापे हा माझ्या मित्रांच्या खजिन्यातला एक अनमोल हिरा आहे. लब्यू हरीश.

वाढदिवसाच्या लै लै लै मनापास्नं शुभेच्छा.

– किरण माने

Leave a comment