• Fri. Jun 9th, 2023

आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश : परिवर्तनाचे नवे क्रांतीसूत्र विशद करणारी समीक्षा

    भारतीय साहित्यातील आंबेडकरी साहित्य प्रवाह हा समाज परिवर्तनाचा सृजनात्मक आविष्कार आहे. या साहित्याने खऱ्या जीवनवादी व जडवादी विचाराला प्रज्वलित केले आहे . अंधकारमय सामाजिक विचारांच्या विरुद्ध मोठे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाच्या प्रभावातूनच आंबेडकरी साहित्य जनमानसाच्या मनाचा वेध घेत आहे. कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र या प्रांतात आपले नाव कोरले आहे. तसेच आज समीक्षेच्या प्रांतात नव्या आंबेडकरवादी समीक्षक मोठ्या ताकदीने पुढे येत आहेत त्यात यशवंत मनोहर ,युवराज सोनटक्के, दीपककुमार खोब्रागडे, सुनील रामटेके विद्याधर बनसोड, संदीप गायकवाड असे आंबेडकरवादी समीक्षक कलाकृतीचे वास्तवगर्भी विवेचन करत आहेत. त्यात प्रशांत ढोले या तरुण व उमद्या समीक्षकाने आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश हा समीक्षाग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. या समीक्षा ग्रंथासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

    समीक्षा ही कलाकृतीच्या एकंदर भावगर्भ चिंतनाचे पदर उलगडून दाखवते. कलाकृतीतील विविध कंगोरे यांना उजागर करतानाच त्या कलाकृतीच्या मर्यादा व उणिवा स्पष्टपणे मांडण्याचे काम करते. आपली कलाकृती फक्त समीक्षकच उत्तम जाणू शकतात असे नाही तर समीक्षकांपेक्षा ही वाचक वर्ग हाच आपल्या कलाकृतीची खरी ताकत असतो. कारण अनेक समीक्षक पूर्वग्रहदूषित विचाराने ग्रस्त असतात ते कलाकृतीला योग्य नाही देऊ शकत नाही. किंवा थातुरमातूर शब्दात तिचे समीक्षण केले जाते हे योग्य नाही पण हेच वास्तव आहे प्रशांत ढोले याना एक कलात्मक दृष्टी अवगत आहेच तसेच त्यांची सूक्ष्म नजर कलाकृतीच्या हृदयापर्यंत पोचण्याची आहे.

    त्यामुळे आंबेडकरी जाणिवांचा अक्षर प्रकाश हा ग्रंथ परिवर्तनाचे नवे क्षितीज रूदावणारा आहे. प्रस्तावनेत प्रा. डॉ अशोक पडवेकर म्हणतात की,” प्रशांत ढोले यांची समकालीन आंबेडकरी कवितेबाबत ची समज आणि काव्यविषयक संवेदनशीलता ही उत्तम दर्जाची आहे. याचा सहज प्रत्यय या ग्रंथातील आस्वादक चिकित्सकेतून येतो.हा आंबेडकरवादी विचारसुत्राचा खरा मापदंड आहे. डॉ.युवराज सोनटक्के आपले मत व्यक्त करताना लिहितात की,” प्रशांत ढोले यांचे हे काव्यविषयक अर्थ समृद्ध आणि जीवनदर्शी विवेचन आंबेडकरवादी उजेडलिपीतून निरुपित झालेली आहे.” हे मत सत्यस्वरूपाचे आहे.

    समीक्षा ही वेगवेगळ्या विचारांच्या दृष्टिकोनातून साकार झालेली असते. मराठी साहित्य मार्क्सवादी समीक्षा व आंबेडकरवादी समीक्षा नव्या मूल्यमापनाचा अविष्कार प्रधान करणा-या असतात .शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या आहेत .समीक्षक याची व्याख्या करताना ग्रहम म्हणतो की,”विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्त्वांच्या आधारे वाड्मयाचे विवेकपूर्ण विश्लेषण करण्याची शक्ती ही समीक्षा होय”. ही व्याख्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.T.S.Eliat,म्हणतात की,”Literature is an art of pursuation it is a kind of propaganda art.”

    कलाकृतीला योग्य न्याय देणे हेच समीक्षक समीक्षकाची भूमिका असायला हवी. आंबेडकरी जाणिवांचा अक्षय प्रकाश या समीक्षा ग्रंथात पंचवीस कवितासंग्रहातील समीक्षा पातळीवर व सौंदर्य पातळीवर समीक्षण केले आहे .यामधील काही कवितासंग्रह अत्यंत विद्रोहात्मक व परिवर्तनशील वाटांचा उजेड पेरणारे आहेत .पण काही कवितासंग्रहातील कविता ह्या फक्त कविता लेखन म्हणजेच कविता करणे या स्वरूपातील आहेत.

    माय इंडिया ,जळती मशाल ,अस्वस्थ काळ आणि माणूस ,वादळातील दीपस्तंभ ,अग्निध्वज क्रांतीची मुळाक्षरे ,अस्वस्थ वर्तमानाची संदर्भ, युद्ध शाळा या कविताचे अवलोकन अत्यंत महत्वपूर्ण आहे .कवीला शब्दात पकडण्याची किमया नक्कीच समीक्षकाला आली असली तरी कलाकृतीच्या अंगाने योग्य चिंतनात्मक भूमिका घेता आली असती तर या समीक्षाग्रंथाला उच्च दर्जा प्राप्त झाला असता .समीक्षा प्रांत समीक्षकाला नवा आहे तरी त्यांनी ज्या प्रमाणे कलाकृतीचे विवेकनिष्ठ पातळीवर विवेचन केले हे अत्यंत क्रांतीदर्शी आहे.

    ते युद्धशाळा या कवितेच्या समीक्षेत लिहितात की ,”कलावंत वास्तव जीवनात अप्रामाणिक असू शकतो. पण सुजनाशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे. कलावंत आणि कलाकृती मधल्या नात्यालाच प्रामाणिकपणा म्हणता येईल. ” हे शब्द समीक्षकाची ताकत विशद करणारी आहे. माय इंडिया या कवितासंग्रहाच्या समीक्षेत ते लिहितात की,” आंबेडकरवादी कवितेत विद्रोह वृत्ती ,नास्तिकता, परंपराभंजन वर्तमानासंबंधी आक्रोश आधी अनंत रूपे प्रकर्षाने जाणवतात. आजचे युग हे संघर्षाचे व अत्याधुनिक युग आहे असे समजून ती पुढे वाटचाल करते. तिचा मानवावर पूर्ण विश्वास आहे व मानवाला केंद्र मानून तिचे मनोवैज्ञानिक स्थितीला स्वीकारले आहे. हे मत आंबेडकरवादी काव्यप्रकाराचे वैचारिक शेंद्रियत्व विशद करते. अस्वस्थ काळ आणि माणूस या कवितासंग्रहाचे रसग्रहण करताना समीक्षक लिहितात की, “आंबेडकरी समाजात शिकल्या शिकलेली माणसं खूप दिसतील. त्यांच्याकडे भरपूर पदव्या आहेत पण खरे शिक्षण म्हणजे माणसे वाचणे होय. अडाणी लोक माणसं वाचतात अनुभववानं कसे आहेत ते सांगतात म्हणूनच माणसे वाचता आली पाहिजे.” हे शब्द नक्कीच आंबेडकरी जाणिवांचा अक्षर प्रकाश रेखांकित करणारे आहेत.

    वादळातील दीपस्तंभ या कवितासंग्रहाची समीक्षा करताना समीक्षकाची दृष्टी अत्यंत उच्च पातळीवर गेलेली दिसते चाकोरीबद्धतेचे सारे क्षेत्र तोडून अस्सल कवितेचे वास्तव चिंतन मांडले आहे ते लिहितात की ,”कविता ही घनघोर अंधाराच्या विरुद्ध एका चिमुकल्या दिव्यांच्या प्रकाशासारखी निरंतर अंधाराचा निषेध करते आणि उज्वल ज्योतीच्या साक्षीने मनुष्य त्याच्या अंतिम विजयाची घोषणा करीत जाते .कविता ही समाजाच्या आतील सत्यतेचा दस्तऐवज असते आणि ती खरी कविता असते. कवितेचे सौंदर्य शब्दाने नटून-थटून मनुष्याच्या श्वासोच्छवासाचे प्रतिबिंब बनत असते. श्रेष्ठ कविता ही उदात्त भावना, गंभीर चिंतन ,उत्तम कल्पना व प्राणमय व्यंजनाव्दारे अवार्भूत होत असते.” हे चिंतन अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहे.

    आंबेडकरी जाणिवांचा अक्षयप्रकाश या ग्रंथातील अनेक समीक्षा अत्यंत विवेकवादी विचारांची लेणी लेल्याला आहेत .कवीच्या काळजाला हात घालणा-या आहेत. पण या समीक्षा ग्रंथात अनेक उणिवा आहेत. समीक्षकाची दृष्टी ही विशाल स्वरूपाची असावी .लेखनातील चुका त्यांनी टाळाव्यात पान नंबर १२८ वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख १४ एप्रिल १८९७ झालेली आहे .पण खरी जन्मतारीख १४ एप्रिल १८९१ आहे. ही गंभीर व मोठी चूक आहे. तसेच पान नंबर १३३ वर वटवृक्ष हा शब्द अधोरेखित केला आहे.त्याऐवजी पिंपळवृक्ष असा शब्द लिहावयास हवा होता. आपण समीक्षकाच्या अंगाने कलाकृतीच्या गांभीर्यपूर्वक अभ्यास करताना शब्दाची निवड नक्कीच परिवर्तनवादी विचारांची कास धरणारे असावी असे मला वाटते. एकंदर हा ग्रंथ आंबेडकरी साहित्याच्या समीक्षा प्रांतात नव्या स्वरूपाची विचारवेधकता निर्माण करणार आहे.काही उणिवा व मर्यादा जरी असल्या तरी आंबेडकरवादी कवितेची समीक्षा करणे हे अवघड काम आहे पण प्रशांत ढोले यांनी ही किमया लिलियाने पेलली आहे. आंबेडकरी विचाराने ओतप्रोत भरलेला हा ग्रंथ आजच्या काळाच्या जीवनाचे विविध पदर उलगडून दाखवणारा आहे.आंबेडकरी विचारांची मशाल अधिक प्रचलित करणारी समीक्षा परिवर्तनाचे नवे क्रांतीसूत्र आहे. या क्रांतीसूत्राच्या माध्यमातून आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश सदोदित तेजोमय होत राहावा हीच अपेक्षा. समीक्षकाच्या पुढील लेखनकार्यास लाख-लाख मंगलकामना चिंतितो..!

    संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००
    ————————————-
    -आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश (समीक्षाग्रंथ)
    समीक्षक-प्रशांत नामदेवराव ढोले
    परिस पब्लिकेशन, पुणे
    भ्रमणध्वनी -९९२३३०८६३८
    मूल्य -३०० रूपये फक्त

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *