• Wed. Jun 7th, 2023

५0 वर्षांपासून बाणगाव ग्रामपंचायत बिनविरोध

ByBlog

Jan 1, 2021

नाशिक : तालुक्यातील बाणगाव बुद्रुक व बाणगाव खुर्दचा गेल्या ५0 वर्षांपासून बिनविरोध निवडणूकीचा इतिहास असून यंदाही निवडणूक बिनविरोध करून या गावाने एक आदर्श राज्यासमोर ठेवला आहे. सरकारने अशा विनास्वार्थ बिनविरोध होणार्‍या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरव करण्याची इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून एकीकडे सरपंच व सदस्य निवडीसाठी लाखो नाहीतर कोट्यावधी रुपयांची बोली लावली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याऊलट मात्र नांदगांव तालुक्यातील बाणगाव बुद्रुकचा गेल्या ५0 वर्षांपासून तर विभक्त झाल्यानंतर बाणगाव खुर्दचा ३0 वर्षांपासून बिनविरोध निवडीचा इतिहास असून या दोन्ही गावांत कुठल्याही प्रकारची बोली न लावता जेवढ्या जागा तेवढेच सदस्य उभे करायचे आणि गावातील सर्वांना विश्‍वासात घेऊन निवडणूक बिनविरोध करायची परंपरा अविरत कायम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या निर्णयाच्या विरोधातही कोणी बोलत नाही. या परंपरेने सरकारचा खर्च तर वाचतोच मात्र उमेदवारांचाही अनावश्यक खर्च वाचतो. सध्या प्रत्येक ठिकाणी गावाच्या विकासाच्या नावाखाली बोली लाऊन सरपंच व सदस्यपद विकले जात आहेत. यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतीने या गावाचा आदर्श घ्यावा, असेही येथील ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *