आजकाल बऱ्याच राजांना, महाराजांना, सम्राटांना चक्रवर्ती म्हणण्याची प्रथा पडली आहे. मात्र, अशोका हा जगातील खरा खुरा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे आणि खरं चक्रवर्ती पद हे फक्त अशोकाच्याच चरणावर विराजमान होते हे अनेक देशी विदेशी लेखकांनी मान्य केलेल्या पुराव्यावरून सिध्द करता येते. मि. व्हिन्सेंट स्मिथ सारख्या पाश्चात्य इतिहासकार सुध्दा अशोका बद्दल लिहितात की, “His (Asoka’s) domination were far more extensive than British India of today, excluding Burma.” (Ref.V.Smith’s Asoka,3rd edition,Pg.81).अर्थात,आज ब्रिटीश भारत हे नाव ब्रम्हदेश वगळून जेवढ्या प्रदेशांना देण्यात येते, त्याहीपेक्षा जास्त विस्तृत प्रदेश अशोकाच्या सत्तेखाली होता.कारण अफगाणिस्तान व बलुचिस्तान हे ब्रिटीश भारतात मोडत नव्हते, पण अशोकाच्या वेळी ते अशोकाच्याच सार्वभौमत्वाखाली होते. त्यावेळी कॉल, पांड्य, योन, गांधार, पितनिक, आंध्र, कलिंग, भोज, पुलिंद, ताम्रपर्णी अशी अनेक लहानसहान राज्ये होती व तेथील राजे-महाराजे अशोकाचे मांडलिकत्व स्वीकारून राहत होते. एवढा विस्तीर्ण प्रदेश ऐतिहासिक काळात अशोका पुर्वी आणि अशोका नंतर आजपर्यंत कोणत्याही सम्राटाच्या आधीन नव्हता,त्यामुळे अशोका हाच जगातील सर्वात मोठ्या सम्राटांचा सम्राट चक्रवर्ती अशोक सम्राट होता हे मान्य करावे लागते.
अशोकच्या काळात प्रबुद्ध भारतात “सोने की चिडिया” उडत होती. ह्या चिडिया त्याच्या साम्राज्यामुळे उडत नव्हते तर त्याचेही कारण अजुनही वेगळं आहे. कारण अशोकापूर्वी आणि अशोकानंतर जगाच्या पाठीवर अनेक राजे-महाराजे होऊन गेले पण त्यांच्या राज्यात सुद्धा संपुर्ण जनता सूखी असल्याचे दुमदुमले नाही. सम्राट अशोका हा सर्वात कल्याणकारी राजा होता हे त्याच्या सम्राज्यावरून, प्रगाढ संपत्तीवरून किंवा युद्ध विजयावरून ठरत नसुन त्याच्या अंतःकरणातील प्रेम, दया, माणुसकी, ममता, धर्माशिलता, प्रजाहितदक्षतेत आणि अतुल त्यागबुद्धित दिसून येते. अज्ञानात प्रदूषित झालेल्या खऱ्या धर्मतत्वास पोरक्या झालेल्या आपल्या प्रजेसाठी, प्रजेच्या सुखासाठी अशोकाने आयुष्यभर संघर्ष केला. जात, धर्म असा कुठलाही भेद न ठेवता अशोकाने सर्वाँना एकाच छायेखाली सुख दिलं.
बऱ्याच लेखकांनी, इतिहासकारांनी अशोकासोबत जागतिक महान राजांची तुलना केली खरी पण अशोकासारखी महानता त्या राजांच्या अंगी उतरू शकली नाही. V.स्मिथ यांनीही अशोकाची तुलना रोमचा सुप्रसिद्ध बादशाह काँस्टन्टाईन याच्याशी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही दोघांची तुलना करता अशोका हाच श्रेष्ठ ठरला. रे. मॅकफेक यांनीही इंग्लंडचा सुप्रसिद्ध राजा आल्फ्रेड दी ग्रेट याच्याशी तुलना केली, पण साम्राज्याच्या बाबतीत अशोका वरचढच ठरला. प्रा. र्हिस डेविड्स यांनीही ऑलिव्हर क्रोमवेलची अशोकाशी तुलना केली, पण अनेक मुद्दे तपासता अशोका हाच श्रेष्ठ ठरला. त्याचप्रमाणे नेपोलियन, पिटर दी ग्रेट, अलेक्झांडर व सेंट पॉल इत्यादी अनेक प्रसिद्ध व्यक्तींची अशिकासोबत तुलना करायचा प्रयत्न केला जातो पण अशोकाच्या श्रेष्ठत्व ते गाठू शकले नाहीत. कारण नेपोलियन भलेही धाडसी, शुर, महत्त्वाकांक्षी असेल पण शेवटी त्याने आपला नाश करूनच घेतला. पिटर सुध्दा अशोकासारखा प्रजाहित दक्ष होताच, पण पिटर ने सुद्धा स्वतःच्या ऐहिक सुखाला प्रथम स्थान दिले. अलेक्झांडर ने सुद्धा बराच भूभाग जिंकला आणि अशोकाने बराच भूभाग जिंकला, पण सर्व जिंकून झाल्यावरही अलेक्झांडर सारखा आपल्याला जिंकायला आता काही राहिले नाही म्हणून लालसेपाई अशोका शोक करत बसला नाही. सेंट पॉल सुद्धा धर्मशिलतेत अशोकपेक्षा कनिष्ठ ठरला. अरबस्तानचा उमर खलिफा हा नामांकित राजा होऊन गेला, पण धर्माशिलतेत तो अशोकापेक्षा कनिष्ठच ठरला. मुघल बादशहा अकबर म्हणून महान बादशाह होऊन गेला, त्यानेही अशोकसारखी प्रजेची काळजी घेतली, पण धर्माविषयी त्याच्या स्वतःच्या मतांना कधीही स्थिरता आली नव्हती, त्यामुळे मुघल बादशाह अकबर पेक्षा अशोका नि:संशय श्रेष्ठ होता.
अशाप्रकारे जगातील कोणत्याही सम्राटाची तुलना, उंची अशोकपर्यंत गाठू शकली नाही. त्यामूळेच सम्राट अशोका हा जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्या सह, ममता, धर्मशीलता, दया, करुणा, शुद्धता, प्रजहीतदक्ष, कल्याणकारी असणारा “चक्रवर्ती सम्राट” निःसंशय ठरतो.
- (अधिक माहितीसाठी अशोक चारित्र्य अभ्यासावे).
- – संदिप आशा भिमराव
- (समता सैनिक दल मुंबई, विभागीय संयोजक)