- “हर घर तिरंगा” अभियान राबविण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी घेतली चेंबर्स ऑफ कॉमर्स ची बैठक
>
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : देशवासियांना घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यास प्रवृत्त व्हावे आणि सर्वसामान्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी भारत सरकारतर्फे ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०२२ या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक १३ जुलै,२०२२ रोजी चेंबर्स ऑफ कॉमर्स ची बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपायुक्त सुरेश पाटील, उपायुक्त डॉ.सिमा नैताम, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, महानगर चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरेश जैन, उपाध्यक्ष माणिकचंद लुल्ला, सचिव घनश्याम राठी, रिटेल किराणा असोसिएशनचे अध्यक्ष आत्माराम पुरसवानी, प्रमोद भारतीया, सचिन जोशी, सुरेन्द्र पोपली, शरदपाल सिंग अरोरा, बकुल कक्कड, सारंग राऊत, अशोक राठी, अभिषेक नाहाट, आशुतोष रुईवाले, प्रकाश बोके, महेश पिंजानी उपस्थित होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना व्यावसायिकांना दिल्या.
वास्तविक, चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या व्यावसायिकांना “हर घर तिरंगा” अभियान राबवून ध्वजांच्या मागणीचे मूल्यांकन करून संपूर्ण शहरात पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सूचना देण्यात आल्या. शहरपातळीपर्यंत जनजागृती व लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यावसायिकांचे सहकार्य घेण्यास सांगितले आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी “हर घर तिरंगा” कार्यक्रमांतर्गत ‘शहरपातळीपर्यंत अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच शहरपातळीवर तिरंग्याचे वितरण व विक्रीसाठी ठिकाणेची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, ध्वजाची अधिकाधिक विक्री करणे, वितरण केंद्रे स्थापन करणे, शहर स्तरावर स्थानिक पातळीवर उत्पादित ध्वजांची जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करणे, चेंबर्स ऑफ कॉमर्स मार्फत वितरण आणि सार्वजनिक ठिकाणी भिंत चित्रे बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी “हर घर येथील तिरंगा” मोहिमेच्या कृती आराखड्याची सविस्तर माहिती दिली. या बैठकीत भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती, भारतीय ध्वज संहिता, केंद्र शासनाच्या सुचना, ध्वज पुरवठा करणा-या संस्था, वितरण व्यवस्था, ध्वज विषयक इतर बाबी बाबत माहिती जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकांच्या मनात राष्ट्रध्वजाविषयी प्रेम आदर निर्माण व्हावे, देशाभिमान, स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग, राष्ट्रप्रेम जागृत रहावे यासाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाविषयी आदर व्यक्त करावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते दि १७ ऑगस्ट २०२२ या दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. “हर मन तिरंगा, हर घर तिरंगा” या उपक्रमाचे परवलीचे वाक्य आहे. झोपड्या, फ्लट, बंगले, शासकीय कार्यालये, शासकीय/निमशासकीय इमारती, खाजगी इमारती व जी अशी ठिकाणे जेथे मनुष्याचे पूर्णत; किंवा अंशत: वास्तव्य आहे अशी ठिकाणे यावर राष्ट्रध्वज फडकविता येऊ शकेल. ध्वज संहितेचे पालन करून हा उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. प्रत्येक नागरिकाने तिरंगा विकत घ्यावा हे या अभियानात अभिप्रेत आहे. यासाठी पुरेसे राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावे यासाठीच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत चेंबर्स च्या सर्व पदाधिका-यांनी महानगरपालिकेला या अभियानात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमात शहरातील प्रत्येक आस्थापना धारक सहभाग घेईल यासाठी सर्व संघटना काम करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.