- * जिल्हा पणन अधिकारी, के.पी. धोपे यांची माहिती
अमरावती : आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत यंदाच्या हंगामात तुर, हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ई-पीक ॲक व्दारे पीकपेऱ्याची नोंद केलेला सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ई –पीक पेरा नोंदणी करता येणार आहे. ई- पीक ॲपव्दारे पीक पेऱ्याची नोंदणी करावी असे आवाहन पणन महासंघाचे जिल्हा पणन अधिकारी के. पी. धोपे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात, आधारभूत दरानुसार राज्य शासनाने पणन महासंघाची नोडल एजन्सी म्हणुन नियुक्ती केलेली आहे. हंगाम 2021-22 मध्ये नाफेड किंवा एफसीआय च्या वतीने तुर खरेदीसाठी 20 डिसेंबर 2021 पासून शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरेदी दि.28 डिसेंबर 2021 पासुन सुरू करण्यात आलेली आहे.
हंगाम 2021-22 पासून राज्य शासनाने शेतातील ई-पीक पेरा नोंदणी ही ऑनलाईन ॲपवर करण्याबाबत आदेशित केलेले आहे. परंतू काही कारणास्तव बऱ्याच शेतकरी बांधवाकडून पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतातील पीकपेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतातील पीकपेरा नोंदणी अइॉनलाईन ॲप वर करावी.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपव्दारे पीकपेऱ्याची नोंदणी केलेला चालु वर्षीचा सातबारा उतारा, आधारकार्ड, झेरॉक्स,लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स, (पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा. जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नयेत) सोबत आणुन खरेदीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्राच्या ठिकाणी तुर नोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी के. पी. धोपे. यांनी केले आहे.