अमरावती : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या युवकांसाठी समाजकल्याण विभागातर्फे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून राबवलेल्या सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या बावीसाव्या बॅचसाठीचा निधी अप्राप्त होता. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने हा निधी तातडीने वितरीत करण्यास शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या युवकांसाठी विविध संस्थांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्यानुसार अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे प्रशिक्षण केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाच्या सूचनेनुसार 15 जून 2019 ते 15 सप्टेंबर 2019 या कालावधीत निवासी स्वरूपात प्रशिक्षण राबविण्यात आले. या बावीसाव्या बॅचच्या निधीत 13 लाख 43 हजार रुपये एवढी रक्कम थकबाकी राहिली होती. हा निधी अप्राप्त असल्याने तो मिळण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले व वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार 13 लाख 43 हजार 725 रूपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे पुढील कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
दुर्बल घटकांचा विकास करायचा असेल तर त्यातील मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या दृष्टीकोनातून सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचाण्यासाठीही योजना राबविण्यात येत आहेत. वंचित घटकातील युवकांमध्ये सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते सक्षम असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. त्यांना सैन्य व पोलीस भरतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षण संस्थेमार्फत तीन महिन्यांच्या कालावधीत उमेदवारांच्या धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, पुलअप्स, ऑप्टीकल्स, रस्सी चढणे आदी विषयांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींसाठी असलेल्या शैक्षणिक योजनेबरोबरच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीही राज्य शासनाकडून अनेकविध योजना राबविल्या जात आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.