वर्धा : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वर्धा जिल्ह्य़ात काळीज हेलावणारी घटना घडली. वर्धा जिल्ह्य़ातील सेलसुराजवळून भरधाव जाणारी कार भदाडी नदीच्या पुलाखाली पडल्याने मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा पुत्र आविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.
या अपघातात नीरज चौहाण रा. गोरखपूर (उत्तरप्रदेश) एमबीबीएस प्रथम वर्ष, नितेश सिंग रा. ओडिशा इंटर्न एमबीबीएस, विवेक नंदन रा. गया (बिहार) एमबीबीएस अंत्य वर्ष भाग १, प्रत्यूष सिंग रा. गोरखपूर (उत्तरप्रदेश) एमबीबीबीएस अंत्य वर्ष भाग २, शुभम जयस्वाल रा. दीनदयाल उपाध्यायनगर (उत्तरप्रदेश) एमबीबीएस अंत्य वर्ष भाग २, पवन शक्ती एमबीबीएस अंत्य वर्ष भाग १ गया (बिहार) यांचा मत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाअंतर्गत जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे सात विद्यार्थी यवतमाळला गेले होते. हे सातही विद्यार्थी ओडी २३ बी १११७ क्रमांकाच्या कारने यवतमाळकडून वध्र्याकडे परत येत होते. दरम्यान, सेलसुराजवळ कार चालविणार्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या संरक्षित भिंतीला लागून नदीपात्राच्या कोरड्या भागात आदळली. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ वर्धा मार्गावर सेलसुरा येथील भदाडी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सातही जण सावंगी (मेघे) येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. जवळपास चार तास पोलिसांना लागल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात सातही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिसांनी नोंद केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. सावंगी (मेघे) पोलिसांना अपघात स्थळ शोधण्यास जवळपास काही वेळ लागल्याचे सांगण्यात आले.
सावंगी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. वाहन खाली कोसळल्याने सुरुवातीला दृष्टिपथास येत नव्हते. पुलाच्या खाली बघितले असता पोलिसांना पुलाखाली वाहन पडल्याचे दिसले. पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून वाहनात असलेल्या जखमींना बाहेर काढले. सातपैकी एका विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. तो साजरा करायला गेले होते. होस्टल प्रशासनाला लवकर येत असल्याचे सांगून ते बाहेर गेले होते. रात्री या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. यातील एक विद्यार्थी इंटर्नशिप करीत होता. पुढील काळजीच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल. बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांचे मृतदेह कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात येतील. त्याकरिता रुग्णालय प्रशासन सहकार्य करत असल्याचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले.
जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाजूला काढले
पोलिसांनी पोलिस पाटील, गावकरी यांना बोलावून जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाजूला काढण्यात आले. वळणावर वेग जास्त असल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींना शोक
महाराष्ट्रात वर्धा सेलुसरा येथे झालेल्या अपघातावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, महाराष्ट्र सेलसुरा जवळ झालेल्या मार्ग अपघातात मेडिकल विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूने दु:ख झाले. शोक-संतप्त परिवाराप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी नागरिक शीघ्र स्वस्थ होण्याची कामना करतो, असे राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. तर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, सेलुसरा येथे अपघातात झालेल्या जीवित हानीने दु:ख झाले. बाधित नागरिकांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त करीत असल्याचे त्यांनी शोक संदेशात नमूद केले.
पंतप्रधानांकडून मदत जाहीर
या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करीत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५0 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
वर्धा जिल्ह्यातील सेलसुराजवळ नदीत कार कोसळून झालेल्या अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट केली आहे. अशा होतकरू तरुणांचा मृत्यू दुर्दैवी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आघात असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहवेदनाही प्रकट केली आहे.
पालक म्हणून मन खिन्न झाले आहे – पालकमंत्री
सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे विद्यार्थ्यांच्या अपघाताची घटना ही मनाला चटका लावणारी आहे. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने ते देशाचे भविष्य होते. या अपघातामुळे ते पालक म्हणून माझे मन खिन्न झाले आहे. परमेश्वर विद्यार्थ्यांच्या पालकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दात वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.