कवयित्री शितल राऊत यांच्या कवितासंग्रहाचे नाव ‘पिवशी’ वाचून तो वाचायची उत्सुकता निर्माण होते. मी या शब्दाचा अर्थ शोधला. तो वैदर्भीय बोलीतील शब्द आहे. कवयित्री शीतल राऊत यांनी लिहिलेल्या मनोगतात त्याची उकल झाली-‘पिवशी’ म्हणजे पूर्वी म्हाताऱ्या बायका आपल्या अगदीच मौल्यवान वस्तू त्यामध्ये जपून ठेवायच्या आणि ती ‘पिवशी’ सतत त्यांच्या कमरेला खोचलेली असायची आणि गरजेनुसार तो खजिना बाहेर यायचा…!
‘पिवशी’ कवितासंग्रह वाचताना कवयित्री शीतल राऊत यांच्याकडेही ‘पिवशी’ आहे हे लक्षात येते पण त्यातला खजिना आहे तो मात्र अस्सल कवितांचा. खरोखरी जपून ठेवावा असा. आता त्यांनी तो रसिकांसमोर उघड केलेला आहे. ‘कंचोरी बिल्लोर’, ‘नम्रपणे झुकणारे क्षितिज’, माप- ताप- पाप ओलांडणारा सागर, अशा कितीतरी वेगळ्या प्रतिमा- प्रतीकं- कल्पना त्यांच्या कवितांमध्ये आढळतात. वाचनानंद देतात. ‘आपले सण’, ‘शेतकरी’, ‘आई’, ‘देशभक्ती’, ‘देवभक्ती’, ‘निसर्ग’, ‘प्रेम’, ‘शाळा’, ‘मराठी भाषा’, ‘कोरोना’ अशा विविध विषयांवर कवितांनी हा संग्रह समृद्ध झालेला आहे.
- उरी दाटणारा
- हुंदकाच व्हावा
- दुःखी मनानेच
- त्या आधार द्यावा…
- (कविता: माझीच मी)
या आणि अशा तऱ्हेने अनेक कवितांमध्ये शीतल राऊत यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या दिसून येतो. ‘जिंक फक्त तू स्वतःशी/ परक्यांची काय बिशाद आहे.’ (पृष्ट: 85) किंवा ‘मी आईच्या वळणावरती/ समर्पणाची वाट चालली’ (पृष्ठ 28) अनेक कथा- लेख यातूनही जे सांगता येत नाही ते या रचनेमधून किती सहज व्यक्त केले आहे शीतल यांनी! जगाला माणुसकीची शिकवण देणाऱ्या, कामाचे महत्त्व समवणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गाडगेबाबांवर असंख्य कविता लिहिल्या गेल्यात, तरीही प्रत्येकाला त्यांच्यावर काहीतरी लिहून प्रेम व्यक्त करावेसे वाटतेच!
- परखड वाणीतुनी
- प्रबोधन केले होते
- थोतांड अंधश्रद्धेला
- दूर हो सारले होते
- (कविता: गाडगेबाबा)
आपण कविता लिहू शकतोय याच्यामागे स्त्रीशिक्षणाचा पाया रचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे कष्ट आहेत याची जाणीव ठेवून-
- माझ्या सावित्रीच्या ओठी
- होती अमृताची गोडी
- तिच्यामुळेच आज…
- साक्षर झाल्या हो मुली
अशा शब्दात शीतल राऊत यांनी त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त केले आहे! मुक्तछंदाबरोबर काही रचना ‘अभंग’ प्रकारातील ही आहेत. भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी या रचनेचा खूपदा आधार घेतला जातो.
- अमृतासमान। संतांचे वचन।
- करून स्मरण। भगवंता॥
- (कविता :अभंग)
‘कशी लागली तंद्री’, ‘मिरुग’, ‘कास्तकारा’, ‘पिवशी’ ‘तीसकरात’ इत्यादी कविता वऱ्हाडी बोलीभाषेतील आहेत. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात. या कुठेतरी थांबाव्या असं आपणा सगळ्यांनाच वाटते. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मनाच्या कवयित्रीला त्या शेतकऱ्यांना आपल्या कवितेतून काही सांगावेसे वाटते-
- कास्तकारा तू गड्या
- असा हरून जाऊ नको
- काही झालं तरी राजा
- फाशी घेऊ नको
- (कविता: कास्तकारा)
अलीकडे नव्याने आलेल्या कवितासंग्रहात आपल्याला कोरोनाविषयीच्या कविता हमखास आढळतात. प्रत्येक माणसाचा कोरोना आणि लाॅकडाऊनकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, हे शीतल राऊत यांच्या कवितेच्या ओळींवरून जाणवते-
- कोरोनानं त्याले
- देल्ली भलतीच बत्ती
- आता थोडी तरी जिरण
- भाऊ माणसाची मस्ती
- (कविता: माणुसकीचा धरम)
पूर्वीच्या काही प्रथा- परंपरा- पद्धती खूप चांगल्या होत्या तसेच समाजातील दुष्ट प्रवृत्तींपासून दूर राहा हे सांगण्यासाठी शीतल राऊत यांनी काही रचना लिहिलेल्या आहेत त्यातीलच काहींचा फक्त उल्लेख करते- ‘पतंग’, ‘बाटलीच्या पायी’, ‘स्वार्थी’, ‘गुलाम’, ‘भिकारी’, ‘जात’, ‘खेळ मांडला’
कवयित्री शीतल राऊत यांच्या कविता वाचताना आपल्या लक्षात येते की कविता या निव्वळ माध्यम नाहीत व्यक्त होण्याचे, कविता हे माध्यम आहे खूप काही देण्याचेही! आपल्या मनातील सहज भाव व्यक्त करताना शीतल राऊत यांची दुःखे असोत वा समाजभान हे प्रातिनिधिक स्वरूपातील सर्वांचेच आहे हे, आपल्या लक्षात येते! सुरेश राठोड या कला शिक्षकांनी समर्पक असे मुखपृष्ठ यासाठी चितारले आहे. आपले आईवडील सासूसासरे आणि आजी आजोबा या आपल्या पूर्वजांना हा संग्रह समर्पित केलेला आहे!
जीवनाचा सार सांगणारी शीतलची कविता जगण्यावर सहज भाष्य करून जाते. कवयित्रीचे भावविश्व खूप समृद्ध आहे. शब्दभांडार मोठा आहे. भाषा शैली छान आहे. कविता वारंवार वाचत राहावी अशी आहे. अश्या कौतुकभरल्या शब्दांनी युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी सदिच्छासहित प्रस्तावना दिलेली आहे. त्यामुळे विविधांगी लेखन करणाऱ्या आणि अनेक कार्यक्रम देणाऱ्या शीतल राऊत यांचा हा कवितासंग्रह ‘पिवशी’ आपण वाचाल तेव्हा तुम्हाला याची प्रचिती निश्चितच येईल..!
- कवितासंग्रह: पिवशी
- कवयित्री: शीतल राऊत
- प्रकाशक: गौरव प्रकाशन, अमरावती
- पृष्ठे: 88, मूल्य: शंभर रुपये
- -प्रा. प्रतिभा सराफ
- 9892532795
pratibha.saraph@gmail.com