मुंबई, : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणी झालेल्या व नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्वं बांधकाम मजुरांना येत्या 2 महिन्यात सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येईल. तसेच संच वाटपाची विभागामार्फत पडताळणी करण्यात येईल. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम मजुरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप करण्याबाबत प्रश्न सदस्य श्री प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना कामगार मंत्री श्री. खाडे बोलत होते.कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम अन्वये कामगारांची मंडळांमध्ये नोंदणी करताना मागील वर्षभरात किमान 90 दिवस बांधकामावर काम करणे अनिवार्य आहे. तसेच अधिनियमाच्या कलम 11 नुसार मंडळाअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेच्या लाभास पात्र आहे.
त्यानुसार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावशक संच वितरित करण्यात येतील. राज्यात 5 लाख 83 हजार 668 इतक्या संच वाटपास मान्यता देण्यात आली असल्याचेही कामगार मंत्री श्री खाडे यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, सचिन अहिर, प्रवीण दरेकर, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.