- (महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २४ तारखेला मुंबई येथे मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे त्या निमित्ताने…)
शिक्षण हे मानवी जीवनातील अतिशय प्रेरक आणि पवित्र असे साधन मानले जाते. यातूनच मानवी जीवनात सुधारणा घडवून आणली जाते. मुलांमधून देशाचे आदर्श नागरिक आणि सुसंस्कृत अभेद्य खांब उभे करायचे असतील तर कालसापेक्ष शिक्षण प्रक्रिया राबवण्याची नितांत गरज आजच्या काळात नको तितके गरजेचे झाले आहे.शिक्षणातूनच परिवर्तनाची ज्योत पेटवली जाते. ही पवित्र ज्योत तेवत ठेवण्याचे पवित्र कार्य समाजाभिमुख शिक्षक करीत असतो. समाज आणि राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व असते. शिक्षक हा शैक्षणिक , सामाजिक पर्यावरणातला एक महत्वाचा घटक आहे.नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करत असतात . त्यामुळे शिक्षकांची भूमिका ही केवळ खडू – फळ्या पुरती मर्यादित नसतेच. त्यांनी आपल्या भूमिकेच्या कक्षा रुंदावल्याशिवाय सामाजिक बदलाच्या सुधारणांच्या कक्षा देखील रुंदावल्या जात नाही, हे तितकेच वास्तव. देशभरात आजही अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी आपल्या भूमिकेच्या कक्षा सामाजिक बांधिलकी ठेवून, समाजभान जागृत ठेवून समाजाप्रती संवेदना ठेवून आणि राष्ट्र विकासाच्या प्रेरक भावनेतून रुंदावलेली आहेत. याच श्रृखंलेतील आणि शिक्षणाची ज्योत मनी मानसी घेऊन निघालेला एक शिक्षक,शिक्षण यात्री ज्यांनी सृजनशिलतेची ज्योत थेट दुर्गम भागातील तांडा,वाड्या वस्त्या पर्यंतच नाही तर थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याची कल्पना आपल्या मनावर बिंबवली आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी जीवाचे रान करत पुढील प्रवासाला निघाला आहे ते कधीही न थांबण्यासाठी.ज्यांचे नाव आहे *’समाजाभिमुख शिक्षणयात्री’* एकनाथ विश्वनाथराव पवार होय.
- • सामाजिक बांधिलकी जोपासणारा
शिक्षणाच्या संदर्भात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, ‘The importnce of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with others’. या शिक्षणाच्या परिभाषेला प्रत्यक्ष कृतीत रुजवणारी ही समर्पित बांधिलकी म्हणावी लागेल. मानवी विकास व समाज बांधणीसाठी शिक्षणाच्या व्याप्तीचे समृध्दीकरण करणे हे आजच्या काळाची खरी गरज आहे. वंचितांना संवैधानिक अधिकार मिळाल्याशिवाय त्यांचे प्रगतीचे मार्ग प्रशस्त होणे शक्य नाही. पवार सरांच्या सामाजिक बांधिलकीपर ‘सामाजिक बांधिलकी जोपासणारा शिक्षक : एकनाथ पवार’ या ठळक मथळ्याखाली एक भलेमोठे वृत्तांत दैनिक लोकमतने प्रकाशित केले होते. तेंव्हा पवार सरांच्या सामाजिक बांधिलकी विषयी विस्तृत माहिती वाचण्यात आली होती. आपल्या नवोपक्रमाने शाळा आणि समाज यातील अंतर कमी करीत दुर्गम भागात एक शैक्षणिक वातावरण निर्मितीचे स्तुत्य कार्य केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्ती विषयक अभिनव उपक्रम राबविले. पालक वर्गांना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासाबरोबरच उद्यमशीलतेसाठी सर्वसामान्यांना योग्य समुपदेशन देण्याचा कार्य देखील राहिला आहे.
असा हा हाडाचा शिक्षक मनात ठरवलेले इप्सित साध्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा. दलित पिडित, दिन दुबळे, वंचित आणि अभावग्रस्तांच्या लेकरांना पोटाशी घेऊन कवटाळणारा. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी ठेवणारा.प्रसंगी आपल्या पगाराचा काही हिस्सा या कामासाठी न चुकता राखून ठेवणारा शिक्षक म्हणजे सन्माननीय एकनाथराव पवार.
आजच्या काळात प्रत्येक माणूस हा आत्मकेंद्री झालेला असताना, स्वतःच्याच सुखी संसारात मग्न असताना, समाजातील इतर घटकांच्या सुख दुःखाशी फारसे सोयरसुतक न ठेवणाऱ्या या समाजात उजाड माळरानावर एखादी हिरवी पालवी अंकुरित व्हावी तसला हा प्रकार. कडक उन्हाळ्यात, उन्हाच्या झळा अंगावर घेत घेत तृषार्त पांथस्थाला एखादा वाहत्या पाण्याचा निर्झर दिसावा आणि आज आता आपली तहान भागेल अशी आशा बाळगणारा. त्या प्रशांत निर्झर जसा वाहत़ो त्याप्रमाणे एकनाथराव पवार सर यांच्या बाबतीत म्हणता येईल.
- • लोकचळवळीतला कार्यकर्ता
एकनाथ पवार हे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील तसे एक सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व. पर्यावरण क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा’ सन्मानही त्यांच्या शिरपेचात आहे. शिवाय त्यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल महाराष्ट्राच्या विधीमंडळातील वरिष्ठ सभागृहात दोनदा घेतल्या गेली आहे हे विशेष. सांविधानिक मूल्यांची जाणीवपूर्वक रुजवणूक व्हावी. वंचितांमध्ये शिक्षणाची उपयुक्तता वाढावी. तसेच कृषीप्रधान राष्ट्रात शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावे. आत्महत्येच्या नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळावी. शेतकऱ्यांत आत्मविश्वास व आत्मनिर्भरतेची नवचेतना जागृत व्हावी. शेतकऱ्यांचे पाल्यही आत्मनिर्भर व्हावे. यासाठी त्यांनी सामाजिक समता आणि संविधान जागराचे व्रतही हाती घेतले. सांविधानिक जागृतीसाठी थेट तांडा वाड्या वस्तीत जाऊन ‘संविधान जागर शाळा’ तर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या पाल्यांसाठी समुपदेशनपर थेट बांधावर जाऊन *’शेती शाळा’* नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणारा हा आगळावेगळा शिक्षणयात्री. पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ विचारातूनच नव्हे, तर कृतीतून देणारा निव्वळ बोलका नव्हे तर कर्ता व्यक्ती. याचा अर्थ *आधी केले मग सांगितले* या सुत्रांनुसार आपल्या कामाला अग्रक्रम देणारा.जवळपास विस हजार फळझाडांची मोफत लागवड व वितरण सुद्धा त्यांनी थेट बांधावर केले आहे हे ऐकून कदाचित आपला विश्वास बसणार नाही असे अतर्क्य काम सरांच्या नावावर आहेत. यातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा, ही त्यामागची त्यांची प्रांजळ भूमिका होती, आहे आणि राहणार आहे. काळानुसार भविष्यवेधी शिक्षणाची कालसापेक्ष ज्योत तेवत ठेवण्याचे विधायक कार्य देखील पवार सर गेल्या अनेक वर्षापासून अव्याहत करीत आहे. ‘स्वावलंबी शाळा’ हा त्यांनी राबवीलेला प्रकल्प तर राज्यभर नावाजला. कोरोना काळात त्यांनी राबवीलेला “शाळेबाहेरचा वर्ग” याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनिसेफने घेऊन त्यांच्या कामाची पावती त्यांना दिली आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की, ‘येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे’.
- • राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय मजल
कोविडचा काळ म्हणजे मानवजातीची अग्निपरीक्षा घेणारी घटना. न भूतो न भविष्यती असा आलेला मरणाचा महाप्रलय. सारे जग एका जाग्यावर थांबेल अशी कल्पना सुध्दा आपल्या मनात याआधी आली नव्हती. मानव घरात बंदिस्त आणि पशुपक्षी, जीव जंतू रस्त्यावर असा विचारही आपण कधी केला नव्हता. सुर्य उगवलाच नाही तर…,शाळा बंद झाल्या तर…. असे काल्पनिक निबंध आपण लिहित होतो आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत लिहायला सांगत होतो; पण प्रत्यक्षात महिने दोन महिनेच नाही तर तब्बल दोन अडीच वर्षे शाळा बंद राहिल्या. आणि मानवजात कावरीबावरी झाली. मुले घरात कोंडल्या गेली. काय होईल या मुलांच्या शिक्षणाचं आणि भविष्याचं या द्विधा मनस्थितीत पालक आणि निष्पाप विद्यार्थी असताना एकनाथ पवार सर व्यथित न झाले तरच नवल! कोवीड-१९ च्या संक्रमण काळात शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रचंड शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांचे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्जनशील शिक्षक आणि साहित्यिक असलेले एकनाथ पवार यांनी ‘शाळेबाहेरचा वर्ग’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला. शेतकरी-शेतमजूरांची लेकरे शिक्षणापासून वंचित राहू नये.शिक्षणापासूनची त्यांची नाळ तुटू नये, यासाठी त्यांनी कोरोना काळात केलेली आरोग्यविषयक जनजागृती बरोबरच ‘शाळेबाहेरचा वर्ग’ सुरु केला. या अभिनव कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनिसेफने घेतली. शिवाय बेंगलोर येथील स्कॉलर इन्स्टिट्यूटने ‘नेशनल बेस्ट टीचर अवार्ड’ने त्यांना सन्मानित केले. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक रिसर्च जर्नलमध्ये त्यांचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. यातून विविध प्रश्नांचा चिकीत्सक अभ्यास करुन उपाययोजना सुद्धा सुचविलेल्या आहेत. त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि शिफारशी ही समाजाच्या शाश्वत बदलासाठी हितदायी ठरणारी आहे. यातून त्यांची वैचारिक नाळ अतिशय सशक्तपणे जुळल्याचे दिसून येते. यासह विविध विषयांवरील रचनात्मक लेखन देखील विविध नामांकित दैनिकात प्रकाशित झालेले आहेत. इतकेच नव्हेतर सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी मजल गाठली आहे. ‘श्यामची शाळा’ या लोकप्रिय व महाराष्ट्र शासनाने *टॅक्स फ्री* केलेल्या चित्रपटातील गाण्यामधूनही त्यांनी शिक्षणांचा संदेश दिला आहे. अनेक लघूपटासाठी त्यांनी गीतलेखन करुन आपल्या प्रतिभेची छाप उमटवली आहे. आकाशवाणीवरून अनेकदा कविता सादरीकरण स्वतः केले. शिवाय आपल्या समवेत शालेय बाल चिमुकल्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात सुद्धा पवार सर नेहमीच अग्रेसर असतात.
तसेच कृषीप्रधान राज्यात शेतकऱ्यांना आत्मबळ दिल्याशिवाय त्यांचे मनोबल उंचावणार नाही. त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची शिडी चढता येणार नाही, ही बाब ओळखून संविधाननिष्ठेनी थेट तांड्याला पहिल्यांदाच संविधानाची उपयुक्तता व मूल्यात्मक चौदाखडी पटवून देणारे एकनाथ पवार सर म्हणजेच संविधानाचे खंदे पुरस्कर्ते. वंचितासाठी आणि शेतकऱ्यांच्या पाल्यासाठी एक शिक्षणदूत ठरले आहे. शिक्षणाची ज्योत शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावी. वंचितांच्या आयुष्यातही परिवर्तनाचा *’वसंत’* बहरावा. शिक्षणाच्या ज्योतीने वंचितांच्या पाला-बेडात , तांडा-वाडीत , गावखेड्यात आत्मसन्मानाने जीवन प्रज्वलित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. समाजाभिमुख शिक्षक म्हणजे केवळ चार भिंतीत भूमिका साकारणारा मुळीच नसतो. तर राष्ट्र उभारणीची, नवनिर्मितीची जबाबदारी निष्ठेने पार पाडणारा असतो. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांची *सावित्रीमाई राज्य आदर्श शिक्षक* पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. एक समाजाभिमुख शिक्षणयात्री पर्यंतचा त्यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या विदयार्थीनिष्ठ व समाजाभिमुख कार्यामुळे त्यांनी आपली अमीट छाप शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उमटलेली आहे. या शिक्षणयात्रीला शिक्षणाची क्रांतीज्योत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई येथे मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व अन्य मंत्री,खासदार , सनदी अधिकारी यांच्या तसेच अनेक सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. त्याकरिता सन्माननीय एकनाथराव पवार सर यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा आजच्या या प्रसंगी प्रदान करतो आणि थांबतो.
- -पी. के. पवार(मुख्याध्यापक)
- श्री सोनाजी महाराज हायस्कूल सोनाळा
- ता. संग्रामपूर जि बुलढाणा
- ९४२१४९०७३१
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–