- लोकसेवेसाठी तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत अमरावतीतील बियाणी चौकात करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, श्री राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागतफलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. सुमधूर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्री राजराजेश्वर माऊली महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पालखीचे पूजन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल, श्री रूक्मिणीमातेची आरती करण्यात आली. प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. बाजूला महिला भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठलरुक्मिणीच्या नामघोषात फेर धरला. पालकमंत्री श्रीमती ठाकूर याही त्यात सहभागी झाल्या. काहींनी फुगड्याही खेळल्या. श्री पांडुरंग व श्री रुक्मिणीमातेचा जयघोष करत भक्तिरसात भाविक दंग झाले होते.
राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. धनधान्य पिकू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना सर्वांनी विठुराय व रुक्माईचरणी यावेळी केली. या स्वागतसोहळ्याला अनेक पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकार्पण झालेल्या तीन रूग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका पालखीसमवेत जाणार आहे. डॉक्टरसमवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील.