- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी अमरावती शहराचे भूतपूर्व महापौर श्री मिलिंद चिमोटे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती करणारे नियुक्ती पत्र त्यांनी नुकतेच श्री मिलिंद चिमोटे यांना पाठविले आहे.
श्री मिलिंद चिमोटे हे विद्यार्थी जीवनापासून स्वर्गीय डॉ.श्रीकांत जिचकार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव द्वय खासदार श्री मुकुलजी वासनिक व माननीय श्री अविनाशजी पांडे तसेच अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या प्रेरणेने काँग्रेसच्या चळवळीत सामील झाले होते. ते १९८६ ते १९९२ पर्यंत अमरावती जिल्हा एन.एस.यु.आय. चे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती.
अमरावती विद्यापीठाच्या संपन्न झालेल्या पहिल्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये ते सर्वात तरुण वयाचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे सलग पंधरा वर्षे अध्यक्ष यासह विद्यापीठाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांवर त्यांनी सलग २२ वर्षे प्रतिनिधित्व करून महत्वपूर्ण कार्य केले आहे.
त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. २००२ मध्ये संपन्न झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये श्रीकृष्ण प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहाचे नेते म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम केले होते. २००५ मध्ये अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची निवड झाली होती. महापौर म्हणून कार्य करीत असताना त्यांनी अनेक उपक्रम व नवीन योजना लागू केल्या आहेत. २००५ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक महापौर परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम यामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी गठित समितीवर सदस्य म्हणून घेतले होते. त्यानंतर २ वेळा अमरावती महानगरपालिकेच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. सभागृहातील अनुभवी, अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.
महाविद्यालयीन जीवनामध्ये क्रिकेट या खेळाचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. क्रिकेट या खेळा मध्ये त्यांनी नागपूर व अमरावती विद्यापीठाचे आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले होते. अनेक क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले यांचे आभार व्यक्त केले असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल विशेषत्वाने प्रयत्न करणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांचे विशेष आभार मानले आहेत. भविष्यात होणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मा. यशोमतीताई ठाकूर, ज्येष्ठ नेते, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात व माजी महापौर विलासभाऊ इंगोले व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या सोबत काम करून महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयास करेल अशी भावना त्यांनी या नियुक्तीचे प्रसंगी व्यक्त केली आहे. श्री मिलिंद चिमोटे यांच्या प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.