अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट गावांतील शेतकरी उत्पादक कंपन्या, संघ, शेतकरी गट, महिला बचत गट यांना विविध कृषी पूरक प्रकल्प उभारणीसाठी 60 टक्के अनुदानाची योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.
काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन, तसेच शेतमाल वृद्धीसाठी हवामान अनुकूल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करणे या हेतूने गटांना प्रकल्प उभारणीसाठी अनुदान दिले जाते.
- खालील बाबींसाठी गटांना अनुदान मिळते
पॅक हाऊस, प्रतवारी व संकलन केंद्र, गोदाम, छोटे वेअरहाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शीतगृह, रायपनिंग चेंबर, कांदा चाळ, शेतमाल वाहतुकीसाठी वाहन, भाडे तत्वावर कृषी अवजार केंद्र सुविधा निर्मिती, भाडे तत्वावर कृषी अवजार केंद्र- शेड निर्मिती, हवामानानुकुल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाणे तयार करणे, बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे, कृषी उत्पादनाचे वर्गीकरण व प्रतवारी युनिट, फळ पिकवणे युनिट, दुग्ध उद्योग, मूरघास निर्मिती, तेल उद्योग, धान्य सुकवणी गृह, शेळी पैदास केंद्र, औषधी व सुगंधी वनस्पती प्रक्रिया केंद्र, व्हेंर्डिंग कार्ड, बियाणे सुकवणी यार्ड, गावाच्या पीक पद्धतीवर निगडित कृषी आधारित उद्योग जसे की संत्रा ग्रेडिंग, पॅकेजिंग आदीबाबत हब आणि प्रक्रिया, डाळ मिल, पापड यंत्र, चिप्स उद्योग, मसाला उद्योग, आटा चक्की, कृषी पूरक उद्योग.
- प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के अनुदान
योजनेत प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के अनुदान देय आहे. त्याची कमाल मर्यादा बांधकाम व यंत्रणेसह 60 लाख रूपये आहे. स्वयंनिधीतून 20 लाख रूपयांपर्यंत प्रकल्प उभारणी शक्य असून, 20 लाख रूपयांवरील प्रकल्पासाठी प्रस्तावाच्या किमान 75 टक्के बँक कर्ज प्रकरणे करणे, तसेच गट किंवा कंपनी स्थापन होऊन किमान एक वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे.
- अधिक माहितीसाठी
तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किंवा www.mahapocra.gov.in येथे संपर्क साधावा.