राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मते फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे १२आमदार हे सोमवारी संध्याकाळी नॉट रिचेबल झाले आहेत. ते सध्या सूरत या भाजपच्या बालेकिल्ल्यात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आजच्या योगदिनाचं औचित्य साधत एकनाथ शिंदेंनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा देताना फोटोच्या बॅकग्राउंडला कमळाच्या फुलाचा वापर केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल होणं आणि त्यांच्या आजच्या पोस्टमध्ये कमळ दिसणं, याचे फार मोठे राजकीय अर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याने शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे,अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. पक्षातील आमदारांचा एक गट उद्धव ठाकरेंच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे, तर दुसरा गट भाजपशी जवळीक साधत आहे. या दोन मतांची सांगड घालणं उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार, हे नक्की.
एकनाथ शिंदे आणि १२ आमदारांनी शिवसेनेत बंड कऱण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल काय, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राज्यसभा निवडणूक आणि सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची मते फुटली, त्यानुसार भाजपने मविआतील तिन्ही पक्षांच्या पोटात गोळा आणण्याचं काम केलं आहे. फुटलेल्या मतांमध्ये शिवसेनेची १२ मतं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जर का ही मतं भाजपकडे गेली तर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या साथीनं भाजप सत्तेचा दावा करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील समर्थक आमदारांना घेऊन राज्यात कुठेही जाऊ शकले असते, मात्र ते सूरतलाच का गेले, असा सवालही सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरात राज्यात आपले आमदार घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला असेल, याचीही चर्चा आहे. सूरत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथे आपले आमदार सुरक्षित राहतील, अशी रणनिती त्यांनी आखल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपने जर आपल्याला १४५ आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आणि तो सिद्ध करून दाखवला, तर मविआ सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागू शकतं. विधान परिषद निवडणुकीतील चित्र पाहता मविआ सरकारला बहुमत सिद्ध कऱणं ही चांगलीच तारेवरची कसरत ठरण्याची शक्यता आहे.
- कमळ ठरतंय चर्चेचा विषय
एकनाथ शिंदे हे सोमवारी विधान परिषदेचं मतदान संपल्यापासून गायब असणं आणि एवढा राजकीय तमाशा झाल्यावरही समोर न येणं यातून शिवसेना फुटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत आता एकनाथ शिंदे काय भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेत तरुण आमदारांची संख्या मोठी आहे. पण त्यांना फारसं महत्व दिलं जात नाही, अशीच त्यांची भावना आहे. या भावनेतूनच शिवसेनेतेला एक गट खदखदतोय. ही खदखद दूर करण्याऐवजी तिला प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे खतपाणी घालण्याचंच काम शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडून होत आहे, असंच या तरुणाईचं मत बनत चाललंय. एकीकडं फक्त म्हाता-यांनाच मानपान आणि मंत्रिमंडळात संधी दिली जात असल्याची बळकट होत चाललेली भावना सेनेतल्या तरुणाईला सतावत आहे.
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास २० मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा शिवसेनेकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आमदार दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.
- -प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल
- ९५६१५९४३०६