कर्वेनगरच्या स्टॉप वरून ती वातानुकूलित पीएमटीची ई-बस वाकडेवाडीकडे निघाली आणि कंडक्टरकडून तिकीट घेऊन मीही त्या स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणच नव्हे तर इंधनविरहीत टापटीप गाडीतल्या सीटवर विसावलो.. आणि त्या आरामदायी बसचा प्रवास सुरू झाला. ड्रायव्हिंग शिवाय प्रवासातला निवांतपणा आज बऱ्याच दिवसांनी अनुभवायला मिळणार होता आणि प्रवासातली विविधरंगी…., इरसाल माणसं सुद्धा…
गाडी थोडी -फार पुढे गेल्यावर एका.., जवळपास चाळीशीतल्या असणाऱ्या, पुणेरी महिलेनं कंडक्टरकडं तिकिटाची मागणी केली.., “अहो, तुम्ही मला तिकीट दिलंच नाही.. मी पैसे दिले.., उरलेले सुटे पैसेही तुम्ही परत दिलेत.., हे पहा विसाची एक नोट आणि ही पाच रुपयांची दोन नाणी ., पण तिकीट मात्र दिलंच नाही. कंडक्टरनं त्याच्या त्या मशीनवर चेक करून पाहिलं , तिकीट तर दिलं गेलं होतं.., तसं त्यांनं सांगितलंही … पण ती ‘अबला’ काही ऐकायलाच तयार नव्हती.., “म्हणजे मीच खोटं बोलते काय ? अहो मला काय करायचंय दोन तिकिटांच..?” असं म्हणून त्या बिचारीने पुन्हा पर्स चाळली…, पण तिकीट नव्हतंच . प्रश्न फक्त २० रुपयांचाच नव्हता, तर दोघांच्यातल्याही इमानदारीचा होता . आता कोणाचातरी एकाचा खोटारडेपणा निश्चितच उघड होणार होता. आणि त्यामुळे त्या घटनेच्या सर्व साक्षीदारांची उत्सुकता सकाळच्या आणि बसच्या त्या प्रसन्न वातावरणात अगदी शिगेला पोहोचली होती.. तिच्याबरोबर आणखीही एक महिला होती , बहुदा ती तिची आई असावी. गाडीतल्या एसीच्या गारव्याने ती मात्र डोळे मिटून शांत पहुडली होती आणि इकडे दोघांचा वाद अगदी टोकाला गेला होता. “तुम्ही पुन्हा एकदा पहा की पर्समध्ये, कशाला सकाळी- सकाळी माझं वीस रुपयांचं नुकसान करताय, मॅडम ?” कंडक्टर बिचारा शांतपणे विनवणी करत होता आणि त्या लक्ष्मीनं मात्र आता जगदंबेचा अवतार घेतला होता. तिचा आवाजही थोडासा चढला होता…, “अहो, दिवसा ढवळ्या चोऱ्या करताय तुम्ही… सभ्य माणसांना बेमालूम लुटता… कसं जगायचं आम्ही सामान्य माणसांनी…? देवा, काय होणारे बाबा या देशाचं….?” हात जोडत बसच्या छताकडे पाहत.., अवघ्या वीस रुपयांच्या बदल्यात तिनं अवघा देश संकटात सापडल्याची जाणीव कंडक्टरसह आम्हालाही करून दिली होती. खरंच महिलांच्या हातात सगळी प्रशासनाची सूत्रं द्यायला काय हरकत आहे ….? असा एक पुसटची विचारही माझ्या मनात त्याक्षणी विनाकारण स्पर्शून गेला . अगदी थेट झाशीच्या राणीपासून अगदी इंदिरांजींपर्यंतच्या सर्वच नीडर महिलांची यशस्वी कारकीर्दही क्षणार्धातच माझ्या डोळ्यापुढून तरळून गेली आणि माझ्यासह समस्त पुरूष जातीच्या कर्तुत्वावर मी शंका घेऊ लागलो…
…….. तिकडं दुसरं तिकीट देण्याच्या तयारीत असलेल्या कंडक्टरला काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि त्यानं शेवटचा पर्याय म्हणून विचारलं, “अहो, तुमच्या सोबत असलेल्या आजींना जरा उठवता का? त्यांना एकदा विचारलं तरी असतं.., त्यांनी ठेवलंय का तिकीट कुठे ते ?”
- “अहो , पण पैसे मी दिले अन आईकडे तिकीट जाईलच कसं ?”
- “अहो, पहा तर एकदा….”
….. जरा नाखुशीनंच आणि समस्त पुणे महानगरपालिकेवर उपकाराचं ओझं टाकल्यागतच तिनं आईला उठवलं. झोपेत विघ्न आल्यामुळं थोड्या फणकार्यातंच तिनंही मुलीला विचारलं.., “काय ग ? काय झालं ???..”
” अगं काही नाही गं, आपलं तिकीट आलं का तुझ्याकडं, हे विचारण्यासाठी उठवलं तुला …”.
.. “थांब.., पाहते ” म्हणत त्या माऊलीने तिची पर्स शोधली आणि तो कागदाचा निर्जीव तुकडा… ज्यानं इतका वेळ, एवढं रामायण घडवलं तो अलगदपणे काढून देत ती म्हणाली…, “अग बाई, खरंच की… कसं काय गेलं तिकीट माझ्या पर्समध्ये.. …,? हां, आत्ता आठवलं.. मघाशी घाईत माझ्याकडंच दिलं होतं बहुतेक त्यांनं … तू सुटे पैसे मोजून घेत होती ना, म्हणून कदाचित तेंव्हा मी ठेवलं असेल बहुतेक पर्समध्ये….
….. कंडक्टर काही न बोलता बिचारा शांतपणे उभा होता. बाकी काही नाही ओ…, पण तिनं फक्त एकदा निदान ‘सॉरी’ तरी म्हणावं अशी त्याच्यासकट सगळ्या बसची आणि माझीही माफक अपेक्षा होती… आणि एकदाची ती देवी उदगारली…, “अहो…., पण पैसे मी दिले म्हणजे माझ्याकडंच द्यायचं ना तिकीट…, उगाचच आईकडं कशाला द्यायचं….एवढं सुद्धा कळत नाही का साधं…..”
…. आता हसावं की रडावं त्यालाही कळलं नाही…, “चला तिकीट.. तिकीट ” म्हणत तो गर्दीतून वाट काढत पुढे निघून गेला… शेवटी , विळा भोपळ्यावर पडला काय किंवा भोपळा विळीवर पडला काय….. , जीव मात्र भोपळ्याचाच जाणार…
- …..’हेच’ अगदी शाश्वत सत्य…, दुसरं काय…..!
- – सतीश भिमाजी शेटे
- मु. पो. वडझिरे, ता. पारनेर , अहमदनगर.
- ७५ ८८० ९४० १९
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
- (छाया : संग्रहित)