आपल्या विनोदी आणि रंजक कवितेतून गोडी निर्माण करत कवी डी. के. शेख यांनी मुलांच्या मनात शव्दांचा लळा लावणारी बालकविता गमतीच्या गावात या संग्रहात लिहिलेली आहे. डी.के.शेख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील हातोला या गावचे असून मराठी आणि दखनी भाषेतून काव्यलेखन करणारे मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील कवी आहेत.प्रौढ कवितेसोबतच मराठीआणि दखनी भाषेतून बालकविता लिहिल्या आहेत.बालकथा,ललितलेख,तसेच लावण्या आणि गाणीही त्यांनी लिहली असून अनेक गाणी संगीतबद्ध झालेली आहेत.दंगल आणि इतर कविता” हा त्यांचा लक्षवेधी कवितासंग्रह आहे. “दंगल आणि इतर कविता”या संग्रहाचा उर्दू अनुवाद प्रकाशित झाला आहे.सोबतच मंचीय कवितेसाठीही ते प्रसिद्ध आहेत.प्रेमायण,सैतानयुगातील कविता, प्रेमाटिका,पागल पोराच्या भंकसकविता, काळीजकळा,गमतीच्या गावात,दंगल आणि इतर कविता,मेरी कवितांये ” हा 37 दखनी बालकवितांचा विशेषांक प्रकाशित.इत्यादी पुस्तके प्रकाशित तर हस्तांदोलन,दिशा- उसमानाबादच्या कविता,उसमानाबादची कथा,ललितगंध,इत्यादी संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश करण्यात आला आहे. अनेक मानाची पदे भूषविली आहेत. त्यांच्या साहित्य लेखनास अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आकाशवाणी, साहित्यसंमेलनातून कविता वाचन झाले आहे. आपण आपल्या जिभेवर साखर ठेवून शब्दांची सर्व जगाबरोर देवाण घेवाण केली पाहिजे. एकमेकांना गोड बोलले पाहिजे असे कवीला वाटते.
- गोड गोड बोलू
- गोड गोड बोलू
- जगात सा-या
- साखर घोळू
आज स्वच्छतेला खूप महत्त्व आले आहे. आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्रथम हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ केले पाहिजे आणि मन ही स्वच्छ केले पाहिजे. हा गाडगेबाबाचा संदेश मुलांच्या मनात कवी रुजवू पाहतो आहे.
- झाडू घेऊन
- गाव साफ करु
- येरे विल्सन
- ये गं सरु
आपल्या अवतीभोवती असलेल्या दिन दलितांसाठी, गरिबांसाठी राबू या त्यांच्या दुःखात धावून जाऊया असे कवी लिहितो आहे.
- गरिंबासाठी
- आपण राबू
- दुःखात त्यांच्या
- धावून जाऊ
- येरे गौतम, येरे बाबू
बालपणी आपली आई आपण खोड्या करु नये म्हणून भूताची भिती दाखवत असते. रात्री अपरात्री उठू नको भूत येतात. असं रडत बसला की बागुलबुवा येऊन खाऊन जातो. मुळात भूत नसते. पण आपण करत असलेल्या खोडया, रडणे थांबावे हीच अपेक्षा आईची असते. पण हा खट्याळ बाळ आईच्या एक पाऊल पुढे असते. मला त्या भूताची गळाभेट घ्यायची आहे असे तो म्हणतो.
- आई म्हणाली रडू नको
- बागुलबुवा येतो
- मी म्हणालो, कुठे राहतो सांग
- मी त्याला भेटायला जातो
मुलांसमोर आता भिती नावाची गोष्ट राहिली नाही असे कविला वाटते. तर कवी म्हणतो की, माझ्या स्वप्नात एक राणी आली आणि गोड गाणी गाऊ लागली. राजाने ढोल वाजवला. मंत्री आला अन् संत्री खाऊन गेला. स्वप्नात आलेल्या गोष्टी कवी सांगतो आहे.
- स्वप्नात माझ्या
- आली राणी
- गाऊ लागली
- गोड गोड गाणी
- स्वप्नात माझ्या
- आला मंत्री
- खात होता
- नागपुरी संत्री
बालकांना आवडते ती म्हणजे परी. परीसोबत खेळत खेळत तीची विचारपूस करु लागतो. या परीवर जिवापाड प्रेम मुलं करत असतात.
- परी गं परी
- परी गं परी
- तब्येत तुझी
- आहे ना बरी?
जशी जिवापाडाची परी तशी आपली दीदी ही असते. बहिणीविषयीचा जिव्हाळा कवी मुलांसमोर ठेवतो आहे. माझी दीदी खोडकर आहे, हूशार आहे, शहाणी आहे, अन् गोरी पान आहे. दीदी चे वर्णन कवी करतो आहे.
- दीदी आमची छोटी छोटी
- गोष्ट तीची मोठी मोठी
- दीदी आमची शहाणी शहाणी
- बडबड गाते गाणी गाणी
- दीदी आमची छान छान
- गोरी गोरी पान पान
चांदोबावर प्रेम करणारे खूपच असतात. तो दिसतो पण जवळ कुणाच्या येत नाही. तरी तो बालकवींच्या कवितेत फेरफटका मारून जातोच. आईने कितीही चांदोबा दाखविला तर ती आपल्याला कधी देत नाही. चांदोबा असतोच दूर.. कधी ढगांसमोर तर कधी ढगाआड. कवी लिहितो.
- चांदोमामा
- नको तू रडू
- ढगा आड
- नको तू दडू
- येना ये तू
- घे माझी भेट
- देतो तुला मी
- चाँकलेट
ढ मित्रांशी पोरांशी माझी गट्टी जमली खरी पण सगळी मुलं हसायला लागली, टिंगल करु लागली. तेंव्हा मला त्याच्याशी कट्टी करावी लागली. कवी हूशार आणि चांगल्या मित्रांशी संगत, मैत्री करावी. असा सुचक सल्ला कवितेतून देतो आहे.
- जमली होती
- आमची गट्टी
- पण चार दिवसात
- झाली कट्टी
बालपणी बाळाचे हट्ट किती वेगळे असतात. बालक हा हट्टीच असतो. लिहिता येत नसले तरी पेन, वही घेतो, पुस्तक उलटे धरतो आणि वाचत बसल्याचा आनंद त्याला होत असतो.
- काही बाही कागदावर
- गिरवित बसतं
- गालातल्या गालात
- खुदकन हसतं
- पुस्तक डोळ्यापुढे
- असं काही धरतं
- वाटाव शहाणं कुणी
- वाचन करतं
सर रागावतात ही एक विनोदी अंगाची कविता डी. के. शेख यांनी बालकांसाठी खूप मजेदार अशी लिहिली आहे.
- इंग्रजीच्या तासाला
- येऊन बसली चिऊ
- चिव चिव भाषेत
- गाणे लागली गाऊ
- कावळ्याचं पिल्लू शाळेत
- उशीरा बसलं येऊन
- सर रागावताच पळालं
- दप्तर तिथचं ठेवून
बालपणात कल्पना आणि विचार किती भन्नाट असतात.? कुणाला वाटतं मुंगी होऊन दारातून दुकानात जावं पोटभर खाऊ खाऊन बाहेर यावं. पंख लावून आकाशात उडावं, झाडावर जाऊन गोड गोड फळे खावं. चांदोबा सोबत आकाशात सफरं करावी ढगावर बसुन पावसांसोबत खेळ मांडावा. सगळ्यात अगोदर देवबाप्पा पावावा अन् गुरुजीचा मार चुकवावा अशा भन्नाट कल्पना मुलांच्या मनात गिरक्या घालत असतात. अन कधी कधी त्या कल्पना साकारही होतात. कल्पना रंगवत सुंदर स्वप्न मुलांनी पाहिली पाहिजे. जांदूची कांडी या कवितेत जादूचु कांडी आपल्याला मिळावी आणि सर्व सुख आपण भोगावं असे मुलांना वाटत असते. मुलांची भन्नाट कल्पना कवी कवितेतून लिहितो आहे.
- जादूची कांडी
- माझ्या हाती पडली
- आणि किती किती
- मज्जा मज्जा घडली
- जे जे काही आवडतं
- सगळ घेतलं खाऊन
- जे जे वाटतं पहावं
- सगळ घेतलं पाहून
मला पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आई बाबांची धडपड वेगळी असते. पुस्तके वाचल्याने माणसं शहाणे होतात. असं आई बाबा सतत सांगतात आणि मला वाचनाची आवड निर्माण करतात. कवीला या कवितेतून पुस्तके ही माणसांना घडवत असतात. तुम्ही ही पुस्तकांच्या जवळ जा, मैत्री करा असा संदेश देण्याचा प्रयत्न कवी करतो आहे.
- पुस्तक वाचतात दादा ताई
- शहाणं व्हायची त्यांना घाई
- आई सुद्धा पुस्तक वाचते
- शहाणं होतं माणूस म्हणते
गमतीच्या गावात खूप खूप गमती घडत असतात असे कवी म्हणतो. गावच असं आहे की. त्या गावच्या शाळेत ना खडू ना फळा, ना घर ना अंगण, अनेक त-हेची माणसं, आगळेवेगळे नियम अशा गावात गमतीही खूप पहायला मिळतात असे कवी म्हणतो. कवी म्हणतो की, मुलांनी सतत आनंदी असलं पाहिजे. रुसवा फुगवा कशासाठी आणि कुणावर करायचा? आपण हसत हसत या जगालाही आनंदी आणि हसरे ठेवले पाहिजे. मुलांनी आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून या जन्मावर शतदा प्रेम केलं पाहिजे.
- हसा रे हसा
- हसा रे हसा
- रुसून कोप-यात
- कशासाठी बसा?
- असं झालं रुसा
- तसं झालं रुसा
- उगीच का डोक्यात
- भरुन घ्यायचा भुसा
- हसा रे हसा
- हसा रे हसा
- जगालाही वाटा
- हसू पसा पसा
या बालकविता संग्रहातील बम बम बम, ढम ढम ढमाक, अ ब क ड, राजा तुझ्या राजात, गंमत, खुर्चीला फुटले हात पाय आदी कविता वाचनिय आहेत. आतील चित्रे व मुखपृष्ठ सरदार यांनी रेखाटले आहे. डी. के. शेख यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा…!
- -प्रा. रामदास केदार
- उदगीर
- ९८५०३६७१८५
- गमतीच्या गावात
- (बालकविता)
- कवी -डी.के.शेख
- मीरा बुक्स अँड पब्लिकेशन्,स औरंगाबाद
- किंमत : ६० रुपये