आठवडाभर सकाळी लवकर उठून कामाला जायच्या लगबगीत असलेली व्यक्ती शनिवार-रविवारी छान आराम करते. त्यातही सकाळी उशीरा उठणं हा मुख्य कार्यक्रम असते. उद्या मी उशीरा उठणार, असं ठरवूनच सुटीच्या आदल्या रात्री लोक झोपी जातात. सकाळी ताणून देण्याच्या आनंदाचं वर्णन खरं तर शब्दात करता येणार नाही. मात्र असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सुटीच्या दिवशी सकाळी जास्त वेळ झोपल्याने विविध रोगांना आमंत्रण मिळतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. आपल्याला अतिरिक्त झोपेचा लाभ न होता नुकसानच होतं.
शरीराला पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे हे अगदी खरं. अपुर्या झोपेमुळे अस्वस्थता हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्ट्रोकसारख्या व्याधी जडण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. मात्र सुटीच्या दिवशी जास्त झोपणं आरोग्याला मारक ठरतं. यामुळे स्थूलपणा, हृदयविकाराचा धोका वाढतो, असं हे संशोधन सांगतं. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात याबाबतचं संशोधन पार पडलं. यासाठी निरोगी तरुणांचे तीन गट तयार करण्यात आले होते. अभ्यासाचा भाग म्हणून पहिल्या गटाला पहिले नऊ दिवस नऊ तास झोपायचं होतं. दुसर्या गटाला फक्त पाच तास झोप घ्यायची होती तर तिसर्या गटाला पाच दिवस पाच तास झोपायला सांगण्यात आलं. मात्र सुटीच्या दोन दिवशी सकाळी त्यांना जास्त वेळ झोप घ्यायला सांगितलं गेलं. कमी झोप मिळालेले दोन गट रात्रीच्या जेवणानंतरही जास्तीचं खाऊ लागले. यामुळे त्यांचं वजन वाढायला सुरूवात झाली. नऊ तास झोप घेणार्या गटाने वीकेंडला जास्तीचं फारसं काही खाल्लं नाही. मात्र कमी झोप मिळाल्यावर त्यांचंही चरण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे वीकेंडला सकाळी झोप पूर्ण करण्याचा विचार बाजूला ठेवणं गरजेचं आहे.