नागपूर : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला अंदाजानुसार नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आलेली आहे. सकाळी नागपूरचे तापमान ८.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वार्यांमुळे पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात शीतलहरीचा प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर तापमानाचा पारासुद्धा दोन ते तीन अंशाने खाली येणार असल्यामुळे आणखी हुडहुडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील बहुतांश जिल्हय़ांचे तापमान १0 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरसह विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करावा लागला होता. अनेक दिवस आकाशात ढगांचा मुक्काम राहिल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता. त्याचबरोबर उत्तरेकडून येणार्या वार्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यानेसुद्धा विदर्भात थंडीचा प्रभाव कमी झाला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील आकाश स्वच्छ झाले असून उत्तरेकडून वाहणार्या थंड हवेच्या मार्गातील अडथळा देखील दूर झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्हय़ांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार, पुढील तीन ते चार दिवस विदर्भात थंडीची लाट येणार असून अनेक जिल्हय़ातील तापमान दोन ते तीन अंशाने खाली आले आहे.
- तापमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संपूर्ण विदर्भाच्या तापमानात घट झालेली आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वाशीम मध्ये सर्वाधिक तापमान खाली आले आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान ७ अंशाने खाली आले आहे तर अशीच परिस्थिती नागपुरातसुद्धा बघायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसात नागपूरच्या तापमानात ६ अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली होती.