विदर्भातील अष्टविनायक

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    गणपती सगळीकडंच बसतात. त्यातील पुुण्याचे गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. कारण त्यांचा गाजावाजा झाला. परंतू विदर्भातही अष्टविनायक आहेत. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होईल. परंतू ते सत्य आहे. विदर्भातही अष्टविनायक आहेत.

    १) नागपूरचा टेकडी गणेश

    महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेलं शहर म्हणून नागपूरची ओळख असून इथे एका टेकडी भागात एक गणपती आहे. त्याला गणेश टेकडी असं नाव दिलंं आहे.हे टेकडी मंदिर नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्टेशनजवळ असून ते नागपूरातील सर्वात मोठे गणपती मंदिर आहे. याला प्राचीन वारसाही लाभलेला आहे. या मंदिराचं बांधकाम अर्वाचीन असून राजे भोसले यांनी अठराव्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. तशी मुुर्ती बरीच प्राचीन आहे. हा गणेश नवसाला पावतो असेही म्हटले जाते.

    २)आदास्याचा विघ्नेश

      आदासा हे नागपूर जिल्ह्यातील व सावनेर तालुक्यातील एक गाव. हे ठिकाण नागपूरपासून अंदाजे चाळीस किमीच्या अंतरावर असून पाटनसावंगी या रेल्वेस्थनकापासून बारा किमी अंतरावर आहे. हे मंदिर उंच टेकडीवर असून ही मुर्ती नृत्यगणेशाची आहे असं मानलं जातं. या गणेशाची एक आख्यायीकाही आहे. म्हटले जाते की ही गणेशमुर्ती उजव्या सोंडेची असून महापाप, संकट, शत्रू याची तारणहार आहे. पुर्वी या तीनही गोष्टींनी जगाला त्राही त्राही करुन सोडले होते. तेव्हा सर्व देवांनी शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रगट झाले. त्याने वरील तीनही दानवाचा नाश केला. ज्या ठिकाणी महागाई, संकट व शत्रू या नावाच्या तीनही दानवाचा नाश झाला, तिथे मुद्दल मुनींनी गणेशाची स्थापना केली. इथे दरवर्षी ममाघ शुद्ध चतुर्थीला मोठी यात्रा भरते. विदर्भातील अष्टविनायकापैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर असून ती महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेशमुर्ती आहे. ही उंची जवळपास सहा मीटर असून हे बांधकाम हेमाडपंथी वाटते.

      ३)कळंबचा चिंतामणी

      विदर्भातील अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथे आहे. ते गाव यवतमाळ पासून अंदाजे तेवीस किमी अंतरावर असून या गणेशाला चिंतामणी असं नाव आहे. हा गणेश पस्तीस फुट खोलात असून मंदिराच्या प्रवेशद्वारातून पाय-या उतरुन खाली जावं लागतं. खाली उतरल्यावर एक कुंड लागते. याला गणेशकुंड म्हणतात. म्हटलं जातं की या कुंडातून दर बारा वर्षांनी आपोआप पाणी बाहेर येतं. हे कुंड अंकुशानं स्वतः गणपतीनं तयार केलं. तसेच याची स्थापना प्रत्यक्ष देवराज इंद्र यांनी केल्याचे वर्णन पुराणात आहेत. यामागं एक लोककथाही आहे. म्हणतात की ब्रम्हदेवानं एक लावण्यवती स्री निर्माण केली. तिला आपली मुलगी मानली. तिचं नाव अहिल्या ठेवलं. ती सुंदर होती. त्यामुळं तिच्यावर देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग, मानव सारे मोहित झाले होते. तिचा विवाह करायचे ब्रम्हदेवानं जाहिर केलं. परंतू एक अट ठेवली. जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करुन पहिला येईल. त्याला ती देण्यात येईल. अटीनुसार सर्व निघाले पृथ्वीप्रदक्षिणा करायला. ही अट महर्षी गौतमाच्या कानी आली. त्यांनी प्रसूत होणा-या गाईलाच प्रदक्षिणा मारली व शास्राप्रमाणे ब्रम्हदेवाला अहिल्येची मागणी घातली. ब्रम्हदेवानं शास्र शिरोधार्य मानून गौतमाला आपली कन्या दिली. पृथ्वीप्रदक्षिणा आटोपून देवराज इंद्र प्रथम परत आला. त्यांना अहिल्या विवाहाची बातमी कळली. परंतू आता विवाह झाला होेता. अहिल्याशी आता विवाह करता येत नव्हता. काय करावे. इंद्र विचार करु लागला. शेवटी त्यानं मुनी गौतमाचं रुप धारण करुन अहिल्येशी समागम केला.

      अहिल्येशी असा दुराचार करणे हे मुनी गौतमाला माहित झाले. त्यांनी त्यास महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने त्यावर मुनीवर गौतमाची क्षमा मागीतली. त्यावर गौतमानं माफी देत गणेश षडाक्षर मंत्राचा त्यास जाप करण्यास सांगीतले. तसेच विदर्भात या कळंब जवळ जावून तपश्चर्या करण्यास सांगीतले. इंद्राच्या तपश्चर्येनं गणेश प्रसन्न झाले व ते प्रगट झाले. त्यांनी इंद्राची कैफियत ऐकली व आपल्याजवळच्या अंकुशानं त्यांनी एक कुंड निर्माण केले. तेच गणेश कुंड होय. याच कुंडात स्नान करुन इंद्र रोगमुक्त झाले होते. स्नान झाल्यावर इंद्रानं इथे गणेशमुर्तीची स्थापना केली. गणेश अभिषेकासाठी त्यांनी स्वर्गातून गंगेला पाचारण केले व तिला आदेश दिला की तिनं दर बारा वर्षांनी येवून गणेशाच्या पायाला स्पर्श करावा. त्यानुसार दर बारा वर्षांनी गंगा या कुंडातून बाहेर येते व गणेशाच्या पायाला स्पर्श करुन निघून जाते. इथे गणेशाची एकमात्र दक्षीणाभिमुख मुर्ती असून गणेशाच्या प्रवेशद्वाराजवळील सभामंडपाची निर्मीती प्रत्यक्ष बालगंधर्वानं केलेली असल्याचं मानलं जातं.

      ४)रामटेकचा अष्टदशभुज

      हे मंदिर रामटेकच्या तेलीपु-यात आहे. रामटेक हे नागपूरपासून अंदाजे छेचाळीस किमी अंतरावर असून या मंदिरातील मुर्तीला अठरा हात आहेत. या मुर्तीची उंची एक मीटर असून हातात अंकु, पाश, त्रिशूळ आहे. ही मुर्ती अंदाजे अकरा बाराच्या शतकातील आहे असे मानले जाते.

      ५)वरदविनायक

    हे मंदिर भद्रावतीजवळ असून भद्रावतीहून तीन किमीच्या अंतरावर आहे. हेही मंदिर टेकडीवर असून ह्या टेकडीवर असलेली गणेशाची मुर्ती भव्यदिव्य आहे. ही मुर्ती विहिरीसारख्या खोल गाभा-यात आहे. हेही मंदिर हेमांडपंथी आहे. तसेच मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील वाटते. मुर्ती मात्र त्याहूनही प्राचीन आहे.

    ६)भृशुंड गणपती

    विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मेंढा गावात असलेेलं हे मंदिर. भंडा-यावरुन अवघ्या तीन किमी अंतरावर आहे हे मंदिर. या मंदिरात असलेली मुर्ती ही लाल रंगाच्या दगडात कोरलेली असून ही मुषकारुढ प्रतिमा आहे. हातात पाश, अंकुश व मोदक आहे.

    ७)सिद्धीविनायक

    विदर्भातील सिद्धीविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला केळझरचा गणपती विशेष प्रसिद्ध आहे. येथील गणपतीही उजव्या सोंडेचा असून मुर्ती चार फुट उंच आहे. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा असेही म्हणतात. तसेच या स्थानाला महीभारत कालीन परंपरा लाभलेली आहे असेेही मानले जाते. हा गणेश वर्धा जिल्ह्यात असून विदर्भातील अष्टविननायकात या गणेशाचा तिसरा क्रमांक लागतो.

    ८)सर्वतोभद्र

    पवनीचा सर्वतोभद्र हा गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून पवनी नावाच्या पुरातन शहरात हा गणेश वसलेला आहे. शहराच्या उत्तर दिशेला वैनगंगेचं पात्र आहे. इतर दिशेला दगडी तटबंदी आहे. या गणेशाला गणेशपट्ट असेही म्हणतात. येथे राहणा-या भट यांच्या घरासमोर जे चार स्तंभ आहेत. त्या चारही स्तंभावर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. तर कर्णछेदावर पाचवी प्रतिमा आहे. अशा प्रकारचा सर्वतोभद्र गणपती विलक्षण असा गणपती समजला जावून त्याला विदर्भातील अष्टविनायकात स्थान मिळाले आहे.

      वरील प्रकारचे आठही गणपती विदर्भात असून त्याला अष्टविनायक संबोधतात. त्या त्या भागातील हे गणेश आपआपले स्थान टिकवून आहेत. ते नवसाला पावतात असेही म्हटले जाते. याही स्थानावर देश विदेशातून भरपूर पर्यटक दर्शनासाठी येत असून बाराही महिने या ठिकाणची मंदिरं दर्शनासाठी खुली आहेत.

      अंकुश शिंगाडे
      नागपूर
      ९३७३३५९४५०

Leave a comment