- * भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
- * अमरावती येथे भाजपाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षांत विकासाचा पाया मजबूत करणाऱ्या विकास मंडळांना बंद ठेऊन पाप केले होते. आता आपल्या शिंदे-फडणवीस सरकारने ही मंडळे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने विकासाला नवसंजिवनी मिळाली; यामुळे विदर्भाचा बॅकलाग भरून निघेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
गुरुवारी अमरावती दौऱ्यात येथील राजापेठ भागातील भाजपाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मविआ सरकारच्या काळात ओबीसी व मराठा आरक्षण गेले असे सांगून श्री बानकुळे म्हणाले, वैधानिक मंडळाने दिलेल्या अहवालावर कार्यवाही करीत विकासकामांसाठी निधी दिला जातो. विदर्भ वैधानिक विकास मंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुन्हा परत आणले अशी माहिती गावागावातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा, मोठा जल्लोष करा. सरकार आपले काम करेलच यात दुमत नाही. परंतु पक्ष म्हणून आपण काम केले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळ केले. शिंदे-फडणवीस सरकार हे बुलेट ट्रेन असल्याचा उच्चारही त्यांनी केला.
यावेळी खासदार अनिलजी बोंडे, आ. प्रवीणजी पोटे, आ. रणजितजी पाटील, भाजपा संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, भाजपा शहराध्यक्ष किरणजी पातुरकर, जिल्हाध्यक्ष निवेदिताताई दिघडे, प्रदेश प्रवक्ते शिवरायजी कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, राजेश वानखडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
- भाजपाची लढाई अस्तित्वासाठी
भाजपा हा धोरण घेऊन चालणारा पक्ष आहे. सरस्वती मातेच्या अस्तित्वावर मविआतील नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर भाजपाच्या महिला आघाडीने निषेध करायला हवा होता. उद्या हेच लोक दुर्गामाता, अंबा व एकवीरा मातेचेही अस्तित्व नाकारतील. मतांसाठी खालच्या पातळीवर गेलेले लोकच असे करू शकतात. याविरुद्ध जनजागरण केले पाहिजे, धर्माचे व समाजाचे रक्षण करणे, संस्कृती व परंपरा जपून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. भाजपाची लढाई अस्तित्वासाठी असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- २० घरांचे पालकत्व घ्या
भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने २० घराचे पालकत्व घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, २ ऑक्टोंबर गांधी जयंतीपासून प्रदेश भाजपा धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम सुरू करीत असून यात सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा. केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लोकांकडून पंतप्रधान मोदीजींच्या नावे पत्रे लिहून घ्यावी. प्रत्येकांने किमान २५ पत्रे पाठवावी. १५ नोव्हेंबरला ‘धन्यवाद मोदीजी’ ही पत्रे घेऊन जाणाऱ्या बसेसला उपमुख्यमंत्री देवेंद्रजीफडणवीस हिरवी झेंडी दाखविणार आहेत. अमरावती जिल्ह्यात ४० लाख लाभार्थी असून त्यांच्याकडून किमान ५ लाख पत्रे घेण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. घरोघरी जाऊन पत्रे गोळा करण्याचा उपक्रमातून अमरावती शहराचा महापौर व जिल्हा परीषदेचा अध्यक्ष भाजपाचा असेल असे विश्वास व्यक्त केला.
- ‘घडी बंद’चा बारामतीत धसका
बारामतीमध्ये नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ३ दिवसाचा व प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही दौरा झाला. त्यावेळी घडी बंद करू असा निर्धार केला. याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने एवढा धसका घेतला की सुप्रीया सुळे एका दिवसात २२ गावांचा दौरा करीत आहेत, त्यांना आता लोक कोरोना काळात कुठे होता असा उलट प्रश्न सुरू केला आहे. आपण बारामतीतूनच घडी बंद पाडू, असे सांगून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला. एक दिवस असा येईल की मविआला उमेदवारही मिळणार नाही असा विश्वास केला.