अंधश्रद्धा हा भारताला लागलेला जुनाट रोग आहे. भल्या-भल्या नास्तिकांचीही यातून सुटका नाही. गंडे, दोरे, काळी बाहुली, ताईत, पेटी, अंगारे, धुपारे, तांत्रिक-मांत्रिक, आसरा, भुताटकी, वारू, अंगात येणे, चालकबाऊ, भानामती, जादूटोणा, मूठ मारणे, सकून बघणे, चेटूक (चेटकीण), गळ टोचून घेणे, नवस फेडणे, प्राणिमात्रांचा बळी देणे आणि नरबळीपर्यंत या अंधश्रद्धेने मजल गाठली आहे. मागील अज्ञानयुगात याची बरीच चलती होती; पण सध्याच्या विज्ञान, संगणकीय युगातही शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्राला तिलांजली देऊन अंधश्रद्धेतील या विकृती माणसाला अज्ञान व अंधारयुगात घेऊन जात आहेत.जादूटोणा करणे, नरबळी देणे, हे असे प्रकार अजूनही २१ व्या शतकात ऐकायला मिळतातच. दोन दिवसापूर्वी ८ मार्चला महिला दिन साजरा केला व त्यानंतर महिलेच्याच बाबतीत एक भीषण प्रकार घडला. दोन दिवसापूर्वी घडलेल्या प्रकाराला अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा विकृतीच म्हणावे. पुण्यातील ग्रामीण भागात घडलेल्या एका प्रकाराने खरंच अंगावर शहारे येतात.
पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. दोन दिवसापूर्वी जागतिक महिला दिन साजरा करत असताना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील विवाहित महिलेचे तिच्या मासिक पाळीतील रक्त कापसाने जमा करून तीच्या सासरच्या मंडळींनी विकल्याचे उघडकीस आले आहे. जादूटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त विकण्याचा प्रकार समोर आला आहे.पुण्यातील घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सासू आणि दिराने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांञिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात २७ वर्षीय तक्रारदार पीडितेनं गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी बीड पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.
- मासिक पाळीचे रक्त मांत्रिकाला विकले
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२२ मधील हा प्रकार घडला आहे. आपण बीडला सासरी गेलो असताना सासू आणि दिराने आपल्यासोबत हा घाणेरडा प्रकार करून हे मासिक पाळीचं रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं. यानंतर हे रक्त मांञिकाला ५० हजारांना विकल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
- दोन वर्षापूर्वी पीडितेचा प्रेमविवाह झाला होता
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर महिला पतीसोबत बीड जिल्ह्यातील आपल्या सासरी रहायला गेली. यानंतर मासिक पाळीनंतर सासरच्या मंडळीनी तिचे हातपाय बांधून पाळीचे रक्त कापसाने टिपून बाटलीत भरले. यानंतर हे रक्त ५० हजारात जादूटोण्यासाठी मांत्रिकाला विकले.यानिमित्ताने मासिक पाळीशी निगडीत अंधश्रद्धा नव्याने पुढे येत आहेत. तसेच पाळीच्या काळात महिलांना चागली वागणूक मिळते का? हा प्रश्न ही पुन्हा उपस्थित होतो. तज्ञाच्या मतानुसार मासिक पाळीतील रक्त हे रक्त व मांसपेशींचे अस्तर असते, जे गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर फेकले जाते. याचा अशुद्धता, अपवित्रता किंवा पवित्रता याच्याशी कसलाही संबंध नसतो. गर्भाशय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाळी येते, मग ती कोणत्याही देशातील, जातीतील, धर्मातील असो. त्याचा संबंध कोणत्याही एका धर्मासोबत जोडणे आणि त्याआधारे कोणतेही धार्मिक विधी करणे किंवा धार्मिक विधी करायला मज्जाव करणे, हे दोन्ही ही धर्माच्या नावाखाली केले जाणारे शोषण आहे.
पाळीच्या रक्ताचा वापर करून जादू्टोणा करणे, ही तर दुहेरी फसवणूक आणि दंडनीय गुन्हा आहे. पाळीच्या काळात महिलेला सकस आहार, पुरेसा आराम, स्वच्छता आणि सकारात्मक वागणूक मिळणे, हा प्रत्येक महिलेचा मानवाधिकार आहे. या चारही बाबींचे उल्लंघण वरील प्रकारात घडलेले आहे. ज्या काळात तिला आराम मिळाला पाहिजे, त्या काळात तिचे हातपाय बांधणे, रक्त जमा करण्यासाठी तिच्या शरीरासोबत छेडछाड करणे, हे विकृत आणि अमानवी वागणे आहे. धर्माच्या नावाने व पैशांच्या प्रलोभनातून घडलेल्या या घटनेचा निषेध करत आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली, तर अशा प्रकरणांना काही प्रमाणात आळा बसेल. अशी भावना आता समाजातून निर्माण होत आहे.
- -प्रा डॉ सुधीर अग्रवाल
- ९५६१५९४३०६
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–