- * संत ज्ञानेश्वर सभागृहात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सचित्र प्रदर्शनाचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
संत ज्ञानेश्वर सभागृह येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व विकास कामांची माहिती देणाऱ्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार सुलभाताई खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय माहिती कार्यालयाचे प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार, श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली ठाकरे, हरीभाऊ मोहोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सर्वंकष प्रयत्न होत आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्रदिनी एकाचवेळी राज्यभर सर्व विभागीय ठिकाणी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम नागरिकांना योजना व विकास कामांची माहिती मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हास्तरावरील नाविण्यपूर्ण योजना, उपक्रम व संबंधित यंत्रणा आदी माहितीबाबतही याचप्रकारे सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडी शासनातर्फे गेल्या दोन वर्षात कोरोनाकाळातही अनेकविध विकासकामे राबविण्यात आली. या उपक्रमांची माहिती प्रदर्शनातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे आमदार श्रीमती खोडके यांनी सांगितले.
गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, उद्योग विभाग, आरोग्य, महसूल तसेच इतर विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण योजनांची सचित्र माहिती या प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी केले.
प्रदर्शनात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विकास कामांची माहिती सादर करण्यात आली आहे. माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्रसंचालन केले. माहिती सहायक पल्लवी धारव यांनी आभार मानले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, रामेश्वर अभ्यंकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक रवीराज ढोणे, आयआयएमसीचे प्रा. अनिल जाधव, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. कुमार बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर, महिला, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन संत ज्ञानेश्वर सभागृहात दिनांक 5 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या कालावीत सर्वांसाठी खुले आहे.