वंचितांच्या अंतरंगातील आत्मभान जागे करुन जगण्यातील सल अस्सल शब्दात जीवनविषयक सामाजिक अंत:करणातील दाह मांडणारा “वंचिताचे अंतरंग “हा अशोक पवारांचा कविता संग्रह.’वंचितांचे अंतरंग’ अशोक पवार यांचा कविता संग्रह वाचत असतांना वंचित बांधवांचे भिजलेले घोंगडे निष्ठेने वाळवण्याचा प्रयत्न करीत असतांनाचे व वंचिताच्या जीवनाच्या वास्तवतेचा अंगार किती दाहक, वेदनांनी भरलेला आहे हे कमीत कमी शब्दात आपल्या कवितेतून मांडत असताना, कोठेच अनुकरणता दिसत नाही. जे जे त्यांच्या वाट्याला आले ते ते वास्तव जीवन जगासमोर मांडण्यात कवी अशोक पवार यशस्वी झाले आहेत. कवी दगडधोंड्याच्या देवत्वाला मानत नाही. भुकेचा दाह कमी करतांना ज्या अपमानाचा, उपहासाचा, दुःखाचा, गरिबीचा उरातला टाहो फोडत विचार करायला लावणारी कविता. प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांच्या अतिशय आशयगर्भ प्रस्तावना ही कवितासंग्रहासाठी बळ देणारी जमेची बाजू आहे त्यात सर म्हणतात,”कवी अशोक पवार यांच्या ‘वंचितांचे अंतरंग’ या “कवितासंग्रहातील कविता ही आपल्या क्रांतिकारी महापुरूषाच्या विचारावर व भारतीय संविधानावर.”
“अढळ विश्वास दर्शवणारी, मानव मुक्तीचा ध्यास घेणारी, स्वत्वाचं भान ठेवून स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारी, कोणत्याही प्रादेशिक सीमांच्या वर्तुळात अडकून न पडणारी, स्वतःच्या आत्मकोषात न राहता वर्तमान सामाजिक दाहक वास्तवतेचे भान ठेवणारी, आत्मप्रत्ययाचा आशय घेऊन वंचित, उपेक्षित व शोषित” समाज -संस्कृतीचा स्पष्ट आलेख मांडणारी, वैचारिक व गंभीर प्रवृत्तीची कविता असून* “आपली जीवनविषयक मूल्यदृष्टी”
“जोपासणारी आणि आपल्या कवितेचा कुळारंभ प्रदर्शित करणार अशी कविता आहे.” अशा समर्पक शब्दात मांडतात. हे अशोक पवार यांच्या कविता वाचतांना यांची जाणीव होतेच पण कवीच्या मनातील चीड, संताप, पारंपारिक आपमतलबी ,स्वार्थी, शोषिततांच्या अंहमवादी व्यवस्थेला नाकारण्याची कवीची तयारी आहे. शोषितांच्या अंत:रंगातील वेदनेच्या ज्वाला लाव्हारसासारख्या गाभा-यातून उफाळून त्या आपोआप वर येतात. या कवीता म्हणजे केवळ कवीचे दाहक जीवनविषयक निरीक्षण नसून त्या वास्तवातील, जीवन जगण्यातील ह्दयद्रावक वेदना आहेत हे कविता वाचतांना शब्दाशब्दात जाणवते, मन बधीर होते. या बधीरपणाबद्दल प्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार म्हणतात, ” भरजरी दु:खाची किनार लाभलेला हा कवितासंग्रह म्हणजे वंचितांचा शोषितांचा, फिरस्त्यांचा व दु:खाचा आक्रोश आहे .कवी अशोक पवार यांचा हा टाहो सत्तासनांच्या बुडाला जाळ लावणारा ठरावा.”
उघड्या नागड्या पालातल्या फाटक्या माणसाचं मनोगतच असावं अशी पाठराखण करायला ते विसरत नाहीत. या कविता संग्रहात एकूण पंच्चाहत्तर कविता आहेत. कवितेचे शीर्षक वाचतानाच कवीच्या अभिव्यक्तीची उंची कळते. क्रांतीसूर्य कवितेत ज्योतिबांविषयी ते म्हणतात, *वादळात मधून ज्वाला अंधार जाळण्याला येऊन जातीच्या विषाचे मुळ त्यांनीच उपटले संविधानाने सुखाच्या सरी बरसल्या असे म्हणून,
- गीता कुराण बायबल
- वाचून व्हायबल झाले
- घेऊन मार्ग शांततेचा
- बुध्द आले युध्द केले
देव,धर्म या दोहोंनी कवीचे जगणे नाकारले याची खंत मनात शिगोशिग भरली आहे. अशा वेळी आक्रोश करण्यापेक्षा लढा देण्यात खरा पुरूषार्थ आहे अशी कवीची धारणा आहे. कवितेतील सहज व्यक्त झालेले, विदारक वास्तव वाचतांना मन उध्वस्त होते. उघडी नागडी पोरं रस्त्यावर हिंडताहेत. त्याची लाज झाकायला चिंध्या नाहीत. भीक मागावी लागते जगण्यासाठी, समाजाची निंदा सहन करावी लागते, छप्पर, पाल झापा वादळी वा-यात उडून जातात अशा वेळी मरताही येत नाही. जगावं लागतं. निराधार कवितेत,
- “ओझं गेलं जात्याचं पण
- कोढं आलं पिठाचं
- आमच्या नशिबी आलं
- भीक मागून जगाचं “
गावोगाव हिंडतांना कधी कोणाची जन्म कोठे होईल सांगता येत नाही. संसाराचं धरण कधी फुटेल सांगता येत नाही.मग नामकरण कोण करणार.उघड्यावरचा संसार बघून डोळे भरून येतात. म्हणून आरक्षणाचं तारण अशोकजी मागत आहेत. माकडवाले यांचे जीवन मांडतांना कवी म्हणतो,
- “वानरसेना सुखा दु:खात आधार सेतू झाले
- जगण्याच्या नावेत बसून नदी पार केली”
खुट्यानाच घराच्या भिंती मानणारा कवी स्वतः च्या मुलखात तो परागंदा होतो. तमाशावाल्यांना गावोगाव संसार घेऊन, पायात चाळ बांधून नाचूनच शिदोरी मिळवताना वासनेच्या विषारी, विखारी शिट्या असह्य करतात, तर मेढपाळांना दिवसभर मेंढरामागं फिरुन पोट भराव लागतं तर कडक लक्ष्मीवाले अंगावरती फटके मारतांना रक्तबंबाळ होतात .वेदना सोसतांना ह्दय गरगरतं, टीचभर पोटासाठी मार खाऊन अंग सुजतं, वेदना सहन करत कुटुंब जोपासावं लागतं. जगण्यासाठी रक्त सांडावं लागतं. वाटणी या कवितेत कवी म्हणतो,
- दाण्या दाण्याचे लिवलंय खाणा-याचं नांव
- दाण्यासाठी उठलं आख्खं माझं गांव “
शापीत जीवन जगतांना निखा-याची धग सोसायचं दगडाला देव मानायचं तर या दगडाविषयी कवी म्हणतो,
- “काही दगडं देवाला
- काही दगडं चुलीला
- काही दगडं येती
- सकाळच्या विधिला”
हे सारं वाचतांना मन सुन्न होतं. जगण्यासाठी रीतीने रिवाज, प्रसंगी विषारी सर्पाशी खेळ, विचित्र लग्न पध्दती, चाकोरीबाहेचे जीणे, व्यवस्थेने मारलेले फटके , माणूसकीचे चटके, जे मिळाले ते सुखाचे मानत ‘जगवा, आणि जगू द्या’ हा मंत्र जणारी जमात, जगण्यासाठी कुत्र सोबतीस घेणारी, जत्रेत दारु पिऊन आनंद माणणारी जमात, पती हाच देव माणणारी स्त्री, अशा समाजाला कवी अशोक समाज झुकवू नका या कवितेत सांगत आहेत,
- “समाजाला एक करुन नेक करा
- पण पाय ओढू नका
- अज्ञान पणा दूर करुन
- अंधश्रद्धेत ओढू नका “
असा संदेश देऊन या समाजातील लोकांना स्थिर जीवन जगण्याचा मंत्र देतात. आपल्या समाजाच्या वेदनाच ते मांडतात. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचनीय असून कवी मोकळ्या मनाने आपल्या समाजाच्या वेदना सत्य स्वरुपात शब्दबद्ध करतांना कोठेच थबकत, ठेचकाळत नाही. जे जगलो तेच लिहिले. हीच भावना स्पष्टपणे मांडतात म्हणूनच प्रत्येक कविता एक एका जमातीचे आत्मकथन आहे. भाषिक कौशल्याचा वापरामुळेच अस्सल जीवन समोर चित्ररुपात दिसते. यातील रूपके, कल्पनाकौशल्य, यमक, अनेकविध कवितेची रूपके, विषयातील विविधता असून तोच तोचपणा हुशारीने टाळण्यात कवी यशस्वी झाला आहे, कमीतकमी शब्दात मांडणी हेच कवितेतील बलस्थान आहे. कवितेविषयी सांगतांना खुद अशोकजी म्हणतात, *”सर्व स्तरातून जात असतांना ज्या आपल्या मूलभूत हक्कापासून जुन्या चाली, रूढी परंपरेत अडकलेले, अंधश्रद्धेत गुरफटलेले ,भरकटलेले, दबलेले, पोचलेले, मरगळलेले, आपलं जीवन तळहातावर घेऊन जगत असलेले, जगणे म्हणजे काय? का जगायचे? कशासाठी जगायचे? याचं कोडं न समजणारे, दिशाहीन सहनशीलतेच्या बंद कुपीतील हे रंगीबेरंगी जीवनातील अंतरंग माझ्या लेखणीने कागदावर शब्दबद्ध केले. ते काव्यात रूपातंर झाले.”
या संग्रहातील सटवी, परागंदा, अनवाणी, कडकलक्ष्मी, ऐरणीचा देव, विठ्ठला, सुतक, भुक नको, स्त्रीच्या वेदना, लग्न, गुलाम, सुंदर गरिबी, गारूडी, कनात, कलियुग, कोरोना, पक्षी म्हणून जगेन मी, नंदी, स्वातंत्र्याचे जीणे, आभाळ माझे आहे, काय बोलू आयुष्यावर, दगड, तिरंगा, कैद या कविता पुन्हा पुन्हा आस्वाद घेण्यासारख्या असून कवीच्या जगण्यातील सल हलकी करण्या-या कविता आहेत. तसेच ईसवासानं, मढं, चिंधी, कुट्ट, टिटवी, ढुंगणावर, माकडपण, खुंट्या, फड, कुट्यात, काडी, फटके, सुजावं, जलमल, बेड्या, पाँट, वढुन, तवर, झिंजाडलं, उगी, खळं, तवा, मेल्याव, कुसाला, डोरलं, गणलं, गोरीपान, नाटं, गटार, थोडकाच, लेकरासारखे, व्हायबल, गाठंत, आकाडी, लाटेमदी, कात्रत, पाल, आम्मा टम्मा, पांगळी, हाडकं, गुंड, किरड्यावर, औकात, मँड, चड्ड्या, फे-या, दडत, चिमटा, अडका, मुरडणं, राशन पताका, प्वाट, छी-थू, आख्खी अशा अनेक अस्सल गावठी शब्दामुळे कवितासंग्रहास एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. कवीच्या जीवन जगण्यातील शब्दामुळे कवितेचा साहित्यिक मुल्य वाढले आहे. एकंदरीत पुन्हा पुन्हा वाचावा व संग्रही असावा असा कवितासंग्रह आहे.
या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अप्रतिम असून कवितेतील भाव जाणल्याशिवाय राहत नाहीत. या कवितासंग्रहाला अक्षरशिल्प प्रकाशन, वि.ना राऊत अमरावती,यांनी प्रकाशनाचा साज चढवून सजवला आहे. अर्पणपत्रिका आई,वडिल यांनाअर्पण केली आहे. स्वागत मुल्य २००रुपये आहे. प्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार यांची पाठराखण लाभली असून प्रा.डाॅ.रामदास नाईकनवरे,आटपाडी याची लक्षवेधी, अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. अशोक पवार यांना त्याच्या कविता लेखनासाठी हार्दिक शभेच्छा..!
- *वंचितांचे अंतरंग
- *कवी -अशोक पवार
- *स्वागत मुल्य: २०० रुपये
- मो.९४२११३२३६६ व ७८ ८७ ३१ ५३६५.
- आस्वादक
- -मुबारक उमराणी
- सांगली
- ९७६६०८१०९७.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–