* पवार, ठाकरे.. बोध घेतील का?
’काँग्रेस संपली..काँग्रेस संपली’ असे विरोधक बेंबीच्या देठापासून बोंबलत असले, तरी ती अनपेक्षितपणे वाढल्यास आश्चर्य वाटू नये. मोदी, संघ आणि भाजपाच्या धर्मांधतेविरोधात आजतरी राहूल गांधी यांच्याएवढ्या ताकदीने कोणी लढतांना दिसत नाहीत. मोजके अपवाद आहेत, पण त्यांच्या मर्यादा आहेत. कितीही नाकारलं तरी, राहूल गांधी यांच्या लढाईला देशव्यापी जनाधार आहे. तो आणखी वाढू शकतो. त्यांच्या पदयात्रेला मिळालेला प्रदिसाद ऐतिहासिक होता, हे कुणीही नाकारू शकत नाही.
राहूल गांधी यांच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने जे नीच उद्योग सुरू केलेले आहेत, ते कमालीचे संतापजनक आहेत. थातुर मातुर कारणासाठी त्यांना घाईघाईत दोन वर्षांची शिक्षा ज्या तऱ्हेने ठोठावण्यात आली, तो प्रकार भयंकर आहे. येणाऱ्या काळात लोकशाहीचा मुडदा कशाप्रकारे पाडला जाईल, याची ती रंगीत तालीम आहे. केजरीवाल, केसीआर तसेच अन्य पक्षांनीही या गोष्टीचा निषेध केला आहे, ही चांगली गोष्ट आहे.
महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहूल गांधी यांचा काँग्रेस पक्ष यांची मिळून महाविकास आघाडी आहे. तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकशाहीपेक्षा सावरकर यांचा जास्त कळवळा आलेला दिसतो. राहूल गांधी यांनीही सावरकरसारख्या चिंधी विषयाला जास्त महत्त्व देऊ नये, हेही तेवढंच खरं आहे. पण त्याचं निमित्त करून ठाकरे आणि पवार यांनी राहूल गांधी शिक्षा प्रकरणी जी भूमिका घेतली आहे, ती खरे तर धक्कादायक आहे. त्यामुळे शरद पवार यांचे बेभरवश्याचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांची अपरिपक्व राजकीय समज या दोन्हीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. खरं तर या दोन्ही नेत्यांनी राहूल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
मुळात उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून इतरांच्या तुलनेत सोज्वळ वगैरे वाटतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक सहानुभूती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसली. पण त्यांची राजकीय किंवा सामाजिक भूमिका कधीही आश्वासक अशी वाटली नाही. अचानक बॅट घुमवायची आणि दोन चार चौके, छक्के जायचे, असं त्यांच्या बाबतीत घडून गेलं, एवढंच! अन्यथा… ’आमचं हिंदूत्व शेंडी जानव्याचं हिंदूत्व नाही’ या पलीकडे त्यांच्या पक्षाला काहीही कार्यक्रम सांगता येणार नाही. बरं.. त्यांच्या या घोषणेचा नेमका अर्थ तरी काय आहे? मग यांचं हिंदूत्व नेमकं कोणतं? किमान तुमच्या हिंदुत्वाचा अर्थ तरी काय आहे? हिंदू म्हणजे नेमके कोण? हे तरी शिवसेनेला आजवर कधी ठरवता आलं आहे का?
मोदी यांच्या एकंदरित खुनशी राजकारणामुळे देश आणि लोकशाही पूर्णतः धोक्यात आलेली आहे. विरोधकांना संपवण्यासाठी राहूल गांधी यांच्यावरील केस ही एक ट्रायल केस आहे. हे पवार, ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना समजलं नसेल, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे . पण त्यांना सावरकर महत्त्वाचा वाटतो. खरंच तो विषय एवढा महत्त्वाचा आहे का? की त्याच्या मागून यांची वेगळीच काही खिचडी पकते आहे? देश, लोकशाही, न्याय ह्या गोष्टी या लोकांना महत्त्वाच्या का वाटत नाहीत? आज राहूल गांधीना टार्गेट केलं, उद्या पवार-ठाकरे यांना टार्गेट केलं जाईल. जुन्या भानगडी बाहेर काढल्या जातील. या बाबतीत अनेकदा वावड्या म्हणा, आरोप म्हणा होऊन गेलेले आहेत. गदारोळ उठवला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांची भाषा आणि भूमिका तर वारंवार वादग्रस्त ठरलेली आहे. किंबहुना शिवसेना आणि धार्मिक वाद, उन्माद, दंगे, चिथावणी असल्या गोष्टी यांच्याशी सेनेचा जन्मापासूनच संबंध आहे. किंवा जोडला गेलेला आहे. उद्या, गांधी यांच्या सारखाच सुड उगवायचा ठरला तर..? राहूल गांधीच्या तुलनेत या लोकांच्या संदर्भात हे शंभर टक्के नव्हे हजार पटींनी शक्य आहे. ठाकरे सेनेमधील कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकरणात सरळ सरळ हवी ती शिक्षा करता येईल, अशी पेरणी आधीच कागदोपत्री किंवा मीडियातून झालेली आहे. अशावेळी ठाकरे काय करतील? त्यांना वाचवायला कोणते ’सावरकर’ येतील ? पवारांना वाचवायला सावरकर येतील का? आणि का म्हणून येतील?
प्रत्येक मोठ्या राजकीय नेत्याच्या विरोधात कुठल्या ना कुठल्या प्रकारची तक्रार, आरोप आयुष्यात कधीतरी केलेला/झालेला असतोच. केसेस देखिल घातलेल्या असतात. त्या एकतर पेंडींग तरी असतात किंवा स्थानिक पातळीवर निकालात तरी काढून टाकलेल्या असतात. बरेचदा राजकीय बाबतीत असे खटले सामूहिकपणे सरकार द्वारा मागे घेतले जातात. या खटल्यात हिंसा, मारामारी, दरोडा वगैरे सारखी गंभीर कलमे लावलेली असतात. अर्थात त्यामागे बरेचदा राजकीय हेतू असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कार्यालयावर मोर्चा, निदर्शने केली.. तर धक्काबुक्की, हिंसाचार, सरकारी कार्यात अडथळा निर्माण करणे, सरकारी कागदपत्रे फाडणे, नासधूस करणे, कार्यालयातील रक्कम लुटून नेणे (दरोडा) असली अत्यंत गंभीर कलम लावली जातात. अर्थात् ही कलमे आणि केस केवळ नाममात्र / राजकीय हेतूने केलेली असते हे सर्वांनाच माहित असते. त्यामुळे त्यावर काहीही होत नाही. एखादीच केस गांभीर्याने पुढे नेली जाते.
राहूल गांधीच्या प्रकरणात जर विरोधी पक्ष किंवा जनता शांत राहीली, रस्त्यावर आली नाही, तर २०२४ च्या निवडणुका कदाचित होणारही नाहीत. त्याआधीच बऱ्याच नेत्यांच्या विरोधात राहूल गांधीसारखी कारवाई करून आत टाकले जाईल. जुन्या कसेस अचानक जिवंत केल्या जातील. हवी तशी शिक्षा केली जाईल. काहींना निवडणूक लढविण्याची बंदी केली जाईल. तसे निर्णय न्यायालयातून करून घेतले जातील, आणि तरीही समजा निवडणुका झाल्याच तर अत्यंत दहशतीच्या वातावरणात होतील. राहूल गांधी यांच्यासारख्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षनेत्याला जर, असे किड्या मुंगीसारखे चिरडले जाणार असेल, तर पवार-ठाकरे म्हणजे कोण ? हे ज्याचे त्याने समजून घ्यायला हवे. मला इथे कुणाचाही मानभंग करायचा नाही. फक्त येणाऱ्या भयंकर संकटाची त्यांना खुली जाणिव करून द्यायची आहे. उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पर्यायानं देशात हिरो बनायला गेलेले नेते, पुन्हा व्हीलन बनायला भाजपाला वेळ लागणार नाही.
महिनाभरात कर्नाटकातील विधानसभा निवडणुका होत आहेत. काँग्रेस, भाजपा आणि देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर अशी तिरंगी लढत आहे. या निवडणूकीत भाजपाची हार होणार हे नक्की दिसते आहे. काँग्रेसची सत्ता येईल असेही चित्र आहे. मात्र पवार, ठाकरे यांच्या राहुल गांधी संदर्भातील भूमिकेमुळे प्रादेशिक पातळीवरील विरोधी पक्षाची असलीनसली पत मातीत जायला हातभार लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस देशभरात भाजपाला मजबूत पर्याय म्हणून अनपेक्षितपणे मजबुतीने पुढे येण्याची शक्यता वाढणार आहे. समजा उद्या कर्नाटकात भाजपा आणि जनता दल सेक्युलर हे दोन पक्ष एकत्र आलेच, तरी दोघे मिळूनही सरकार बनवू शकणार नाहीत, एवढी वाईट अवस्था भाजपाची कर्नाटकात झाली, तर आश्चर्य वाटायला नको. शेवटी जनता सर्व काही बघत आहे.
मोदी यांच्या संशयास्पद डिग्री संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनाच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने परवाच घेतला आहे, यावरुन तरी विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते शहाणे होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. राहूल गांधी, अरविंद केजरीवाल.. आणखी पुढचा नंबर कुणाचा लागेल, हे सांगता येणार नाही. पण हे दोन निर्णय म्हणजे येत्या अराजकाची नांदी आहे, एवढं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधी नेते जर ऐनवेळी शेपट्या टाकणार असतील, तर जनतेलाच पुढे येऊन ही लढाई हातात घ्यावी लागेल, यात संशय नाही! बघू या!
तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
9822278988
–
टीप – समाज प्रबोधनाच्या उद्देशाने माझा कुठलाही लेख प्रकाशित/शेअर करण्यासाठी माझी खुली परवानगी आहे. वेगळी परवानगी घेण्याची गरज नाही. (मात्र व्यावसायिक उपयोगासाठी परवानगी आवश्यक आहे – ज्ञानेश वाकुडकर)
–
(दैनिक देशोन्नती | ०२.०४.२०२३ | साभार)
•••
ReplyForward |