नवी दिल्ली : कोरोना संकटकाळात योग आशेचा किरण बनला आहे. योगाने जगाचे मनोबल वाढविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सातव्या जागतिक योग दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. सकाळी साडेसहा वाजता मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना दैनंदिन जीवनातील योगासनांचे महत्त्व सांगितले.
गेल्या काही काळात भारतात अथवा जगभरात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम झालेला नाही; पण योग दिवसाबद्दलचा उत्साह कमी झालेला नाही. जगातील बहुतांश देशात योग दिवस हा त्यांचा खूप जुना सांस्कृतिक पर्व नाही. सध्याच्या कठीण आणि त्रासदायक काळात लोक योग दिवसाला विसरू शकले असते. त्याची उपेक्षा करू शकले असते. मात्र त्याच्या उलट लोकांचा योगाप्रतीचा उत्साह वाढला आहे. योगाबद्दलचे प्रेम वाढले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जेव्हा जगाच्या दारावर थाप दिली होती, तेव्हा कोणताही देश साधन-सामुग्री, सार्मथ्य अथवा मानसिकदृष्ट्या त्याच्याशी सामना करण्यासाठी सज्ज नव्हता. अशा कठीण वेळी योग आत्मबल मोठे साधन बनल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारताच्या ऋषी-मुनींनी जेव्हा जेव्हा आरोग्याच्या विषयावर चर्चा केली होती, तेव्हा ते फक्त शारीरिक आरोग्यावर बोलत नसत तर ते मानसिक आरोग्याचाही विचार करत असत. याचमुळे योग विषयात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर भर देण्यात आला आहे. योग आपल्याला तणावात मजबुती आणि नकारात्मकतेत निर्मितीचा रस्ता दाखवते. योग आपणास उदासीनतेमध्ये उमंग निर्माण करते तर प्रमादापासून प्रसादापर्यत नेते, असेही मोदी म्हणाले.
फ्रंटलाइन वॉरियर्स तसेच डॉक्टरांशी जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा योगाला आपण सुरक्षा कवच बनविले असल्याचे ते आवर्जून सांगतात. च्या माध्यमातून डॉक्टर्स स्वत: मजबूत झालेच तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी देखील त्यांनी योगासनांचा उपयोग केला, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्राणायाम, अनुलोम-विलोम यासारख्या श्वासाच्या व्यायामामुळे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमला किती ताकत मिळते, हे आता जगातील विशेषज्ञ स्वत:हून सांगत आहेत. आज जगात योगावर संशोधन होत आहे. जर काही आजार असेल तर त्याच्या मुळापयर्ंत गेले पाहिजे. त्यानंतर त्याच्यावरील इलाज सुनिश्चित केला पाहिजे, असे महान तामिळ संत श्री तिरुवल्लुवर यांनी सांगितले होते. योग हाच रस्ता दाखवतो. आज मेडिकल सायन्ससुद्धा उपचारासोबत हीलिंगवर भर देते, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
अनेक शाळांत ऑनलाईन क्लासेसच्या सुरुवातीला १0 ते १५ मिनिटे मुलांना योग-प्राणायाम शिकवले जाते. कोरोनाचा सामना करण्यासाठी व मुलांना शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी हे अत्यंत उपकारक ठरत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
यंदाच्या योग दिनाची थीम योग फॉर वेलनेस असे ठेवण्यात आले होते. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करणे हा त्याचा अर्थ आहे. कोरोना संकटामुळे जागतिक योग दिवसाचा कार्यक्रम आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आला होता.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024