पुणे : देशात चालू वर्षातील ऊस गाळप हंगामाअखेर ते ३१५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. यात महाराष्ट्राने आघाडी मारली असून येथील १८४ साखर कारखान्यांनी सर्वाधिक म्हणजे ३१.९0 लाख टन साखरेचे उत्पादन तयार केले आहे. हंगाम अखेर महाराष्ट्र ४८ लाख टनाचे साखर उत्पादन करून यंदा देशात प्रथम क्रमांकावर राहील असे दिसते. त्या खालोखाल उत्तरप्रदेशाचा क्रमांक असून तेथील ११७ साखर कारखान्यात १८.६0 लाख टनाहुन अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. तर हंगामाअखेर ते १0७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तृतीय क्रमांकावरील कर्नाटक राज्यातील ६९ साखर कारखान्यांतून १७.९0 लाख टन नवे साखर उत्पादन तयार झाले आहे. इथेनॉल पुरवठय़ांतून देशतील साखर कारखान्यांना तब्बल २0 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
देशातील २७५ आसवनी प्रकल्पातून ऑईल कंपन्यांना ३0 नोव्हेंबरअखेर संपलेल्या इथेनॉल वर्ष २0२0-२१ मध्ये ३३३ कोटी लिटर निविदांपैकी विक्रमी ३0२.३0 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात यश आले आहे. त्यातून कारखाने मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. कारण एकाच वर्षात इथेनॉल पुरवठ्याच्या माध्यमातून २0 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न इथेनॉल पुरवठादारांना मिळाले असून ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. तर देशभरात सरासरी ८.१ टक्के मिर्शणाचे प्रमाण गाठले गेले आहे.
आर्थिक वर्ष २0१९-२0 मधील ५९ लाख टन साखर निर्यातीनंतर वर्ष २0२0-२१ मध्येही विक्रमी ७२ लाख टन साखरेची यशस्वी निर्यात झालेली आहे. यंदाच्या वर्षी साखर निर्यातीतदेखील देशभरातील साखर कारखान्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच ३५ लाख टन अनुदानविरहित साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. यामध्ये सहकारी साखर कारखानदारीचा वाटा सुमारे ४0 टक्क्यांइतका असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी कळविले आहे.
दरम्यान, देशातील गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. चांगले पाऊसमान, शास्त्रीय पद्धतीने केलेली उसाची लागवड, संशोधित वाण व हमी दर, यामुळे देशातील ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. देशभरातील ४७१ साखर कारखान्यात आतापयर्ंत (१५ डिसेंबर) ८२0 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्याचा सरासरी साखर उतारा ९.२२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच ७२ लाख टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन तयार झाले आहे.