अमरावती, दि. 03 : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट वन्यजीव विभागातील वान परिक्षेत्रात शनिवारी दि. 2 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान वनवणवा पेटल्याबाबत मेळघाट फायर सेलद्वारे सूचना देण्यात आली. सदर सूचनेची त्वरित दखल घेण्यात येवून वनवणवा नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु झाले. आधुनिक तंत्रज्ञान व वनकर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने सदर वणव्यावर रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण नियंत्रण मिळविण्यात आले.
वान वन्यजीव परिक्षेत्रातील तलई वर्तुळ, प. तलई बिटमध्ये शनिवारी दि. 2 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान एकूण 4 ठिकाणी वनवणवा पेटल्याबाबत मेळघाट फायर सेलद्वारे सूचना प्राप्त होताच जयोती बॅनर्जी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे मार्गदर्शनात श्री. नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, अकोट यांचे नेतृत्वात वणवा नियंत्रणासाठी मोहिम सूरू करण्यात आली. वनव्यावर त्वरीत नियंत्रण मिळविणे करीता लगतच्या वनविभागासोबत समन्वय साधून आवश्यक मनुष्यबळ त्वरीत उपलब्ध करुन घेण्यात आले. वनवणवा नियंत्रित करण्याकरीता अकोट वन्यजीव विभागातील सोमठाण वनपरिक्षेत्र, वान वनपरिक्षेत्र, सोनाळा वनपरिक्षेत, धारगड वनपरिक्षेत्र, मेळघाट वन्यजीव विभागातील धूळघाट वनपरिक्षेत्र, अकोला वन्यजीव विभाग, बुलढाणा व अकोला प्रोदशिक वनविभागातील सुमारे 150 कर्मचारी व अंगारी मजूर सहभागी होते. याचसोबत वनवणवा क्षेत्र पाहणी करीता व त्याद्वारे कार्यान्वीत कर्मचारी यांना सूचना देण्याकरीता ड्रोनचा वापर करण्यात आला. वनवणवा विझविन्याकरीता फायर ब्लोवर मशीनचा वापर करण्यात आला. याकरीता फायर ब्लोवर मशीन वापरण्यात आल्या. वनक्षेत्र हे डोंगदऱ्यांनी व्याप्तअसल्याने अंगारी चमूना वणवास्थळी पोहचण्यास 3 ते 5 किमी अंतर चालून जाणे आवश्यक असल्याने त्यांना वणवा विझविते वेळी डिहायड्रेषण होऊ नये याकरीता एजेर्झाल टेट्रापॅक व ग्लुकोज बिस्कीट पुरविण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 200 हे. क्षेत्रात वणवा पसरला असून यामुळे झालेल्या नुकसानीबाबत मोजणी व पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर क्षेत्रात पुन्हा वणवा पेटू नये याकरीता ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचारी व अंगारी देखील गस्त करीत आहेत. संपूर्ण मोहिमेदरम्यान श्री. नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, अकोट व श्री. कमलेश पाटील, स.व.स. अकोट हे घटनास्थळी उपस्थित असून आवश्यक ते मार्गदर्शन व मदत उपलब्ध करुन देत आहेत.
सदर वणवा हा नैसर्गिक पद्धतीने लागलेला नसून हेतुपुरस्पर लावण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात होणारी अवैध चराई, चोरटी वाहतूक व सालई गोंद तस्करी रोखण्याकरीता करण्यात आलेल्या कारवाहीमुळे सदर वणवा लावण्यात आल्याची शक्यता आहे. याकरीता कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याकरीता पोलीस गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल यांची मतद घेण्यात येत असून आधुनिक पद्धतीचा वापर करुन गुन्हेगारांचा शोध घेणे सुरु आहे. घटनेबाबात अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना माहिती देण्यात आलेली आहे.
वनवणवा बाबत संपूर्ण स्थितीवर श्री. वाय. एल. पी. राव. प्रधान मुख्यवनसंरक्षक (वनबल प्रमुख), श्री.सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य व श्री. एस.पी. यादव, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकार हे लक्ष ठेवून असून मार्गदर्शन करीत आहेत. वनवणव्यामुळे वनांचे नुकसान होऊन त्यामुळे नैसर्गिक साधन संपतीचा ऱ्हास होऊन वन्यजीव अधिवास नष्ट होणे, पाण्याची उपलब्धता कमी होणे आदी परिणाम होतात. तरी कुणीही व्यक्ती वनवणवा लावणे व इतर बेकायदेशीर कृत्य वनक्षेत्रात करतांना आढळून आल्यास अशा व्यक्तीस पकडण्यास वन विभागास कृपया करुन मदत करा. वने व वन्यजीव यांचे संरक्षण करण्यास सहकार्य करा, आपले मेळघाट वाचावा असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. या प्रकारे माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस देण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे विभागीय वनअधिकारी (संशोधन व वन्यजीव) मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी कळविले आहे.