- गौरव प्रकाशन न्यूज नेटवर्क
अमरावती (प्रतिनिधी) : बौद्ध पौर्णिमा, १६ मे २०२२ रोजी लाखनी (जि. भंडारा) येथे ‘मूकनायक’ या महानाट्याचा भव्यदिव्य प्रयोग संपन्न होत आहे. गेल्या दोन अडीच वर्षपासून या महानाट्याची मांडामांड सुरु होती. मध्येच कोरोनाच्या संकटामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा या कामाने गती घेतली. गेल्या सहा सात महिन्यापासून रात्रंदिवस तालमी सुरु होत्या. या सर्व कष्ट, धडपडीचे मूर्त रूप लाखनी नगरीत समर्थ मैदानावर प्रत्ययाला येणार आहे.
लोकनाट्याच्या स्वरुपात असलेले हे महानाट्य भव्य रंगमंचावर १०० कलावंतांच्या आणि २५ तांत्रिक सहाय्यकांच्या माध्यमातून एखादा चित्रपट पडद्यावर पाहण्याचा आनंद निश्चितपणे देणार आहे. सलग चार तासाचे हे महानाट्य अद्ययावत ध्वनि आणि प्रकाश योजनांच्या दिमाखदार सादरीकरणातून आपणास अनुभवता येईल.
या महानाट्याचे लेखक, निर्मितीप्रमुख आणि संकल्पना प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांची आहे. नरेश इलमकर, सुरेंद्र बनसोड, डॉ. रेवाराम खोब्रागडे, पंकज खांडेकर, दीपक जनबंधू यांचेसह शेकडो कार्यकर्ते, आणि कलावंतानी या महानाट्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. डॉ. सुरेश खोब्रागडे हे कवी, नाटककार, संपादक आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हे महानाट्य ही त्यांचीच संकल्पना. ‘मी आंबेडकर बोलतोय’ ‘मेड इन इंडिया’, ‘मी माझ्या देशाच्या शोधात’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. ‘मी आंबेडकर बोलतोय; या नाटकाचे भारतातील सहा राज्यात एक हजार प्रयोग झाले आहेत. ‘मी माझ्या देशाच्या शोधात’ या नाटकाचे १०७ प्रयोग झाले आहेत. ‘दीक्षाभूमी : एक चिंतनकाव्य’, ‘मोर्चा’, ‘वेळेवर येणारे इतर विषय’ हे डॉ खोब्रागडे यांचे कवितासंग्रह प्रसिद्द्ध आहेत
‘मी आंबेडकर बोलतोय’ या नाटकामुळे डॉ. खोब्रागडे यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. हे नाटक देशभर विलक्षण गाजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतचे काही महत्वाचे प्रसंग, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, कौटुंबिक जीवन, सामाजिक संघर्ष यांचे वर्णन अशा मुलभूत गोष्टीवरील भाष्य यात पाहावयास मिळते. हा वैचारिक प्रयोग असल्यामुळे आणि वास्तव घटनांची त्यात मांडणी असल्यामुळे विनोद व हलक्याफुलक्या, रंजनप्रधान गोष्टीना अजिबात वाव नाही. म्हणून नेपथ्य, संगीत, रंगभूमीवरील अन्य साधनांचा वापर करुन रसिकांना खिळवून ठेवण्यात हे नाटक यशस्वी झाले आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या नाटकाचे प्रयोग डॉ. देवा बोरकर देशभर फिरून करताहेत. कमी साधन सामुग्रीत, कमी संचात, कमी वेळात होत असलेला हा प्रयोग रसिकमान्य झाला ही विलक्षण बाब आहे.
‘मेड इन इंडिया’ हे नाटक म्हणजे देशातील जळजळीत प्रश्नांचे भळभळते आक्रंदन होय. दुख, दैन्य, दारिद्र्य, उपासमार, गरिबी भोगणारा देशातील प्रमुख घटक, ज्याच्या दारात स्वातंत्र्याचा सूर्य अद्याप पोहोचलेला नाही त्या सर्व घटकांचे आक्रंदन या नाटकात आहे. उपरोध आणि उपहासाचा आधार घेऊन समाजातील ज्वलंत प्रश्नावर इथे भाष्य केले जाते. हा एक प्रकारचा ‘लाइव्ह टेलीकास्ट’ असा प्रयोग असून थोर पुरुषांनी राष्ट्रासाठी जे स्वप्न पाहिले त्याची पूर्तता होत नसल्याचे बघून या नाटकाची निर्मिती झाली आहे. जात, पंथ, संप्रदाय आणि धर्मापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्रधर्म मोठा असतो हे या नाटकातून सूचित होते. त्याचप्रमाणे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, त्याचा परिणाम अशा अनेक गोष्टीतून उद्भवणारे ज्वलंत प्रश्न घेऊन त्यावर भाष्य केले आहे. अंधश्रद्धेवरही या नाटकात मुलभूत स्वरूपाचे चिंतन आहे. या नाटकातील कथा, काव्य, नाट्यात्मकता, कलात्मक संवाद अशा संमिश्रणातून विविध विदारक परिस्थितीवर ताशेरे ओढत जवळपास सलग दिड तास रसिकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या नाटकात आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तेजस्वी रुपात लखलखणारी, अंधारयात्रिकांना प्रकाश देणारी ‘दीक्षाभूमी’ हे डॉ. खोब्रागडे यांचे चिंतनकाव्य आहे. दीक्षाभूमीशी मुक्त संवाद साधून दिक्षभूमीचे अनेक कंगोरे त्यांनी या काव्यातून उलगडून दाखविले आहेत. सभोवतालच्या जीवनातील घडामोडी, विषमता, धर्मांतरानंतर झालेली प्रगती, सामाजिक, शैक्षणिक बदल, नेत्यांची लबाडी यावर भाष्य केले आहे. कोट्यावधी बौद्धांचे उर्जाकेंद्र असणाऱ्या दीक्षभूमीशी साधलेल्या संवादातून या चिंतनकाव्यात वैचारिक आंदोलनासह गद्यसदृषता निर्माण झाली असली तरी अंत:करणाला भिडणारे हे चिंतनकाव्य आहे.
‘वेळेवर येणारे इतर विषय’ या संग्रहाच्या शिर्षकाप्रमाणेच यातील कवितेचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. साठ सत्तर वर्षापूर्वी लाचारी आणि गुलामगीरीने त्रस्त असलेला एक समाजसमूह स्वाभिमानी आणि स्वयंप्रज्ञ समाज म्हणून जगाला आपली ओळख देत आहे. अल्पावधीत त्याने आपले सांस्कृतिक विश्व निर्माण केले आहे. माणसाच्या दु:खमुक्तीसाठी बुद्धाची, धम्माची वाट दाखवताना माणसाला आशावादी बनवणारी काव्यसंहिता सुरेश खोब्रागडे यांनी सादर केली आहे.
आज डॉ. सुरेश खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून ‘मूकनायक’ हे महानाट्य आकारास आले आहे. भव्यदिव्य आणि तेवढेच खर्चिक असणारे, शेकडो कलावंतांच्या सहभागातून हे महानाट्य सिद्ध होत आहे. या महानाट्याच्या उभारणीसाठी धडपडणाऱ्या सर्व हातांना अभिवादन! महानाट्याच्या यशस्वीतेसाठी मनपूर्वक शुभेच्छा !!