मुंबई : मुंबईत आज सलग तिसर्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे. पावसामुळे दादरचा रेल्वे रुळ पाण्यात गेला आहे. तर कुर्ला-सायन रेल्वे रुळावर मिठी नदीचे पाणी आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळ जलमय झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईहून कसारा-कर्जतकडे जाणार्या आणि कर्जत-कसार्याहून मुंबईला येणार्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
काल दिवसभर रिमझिम कोसळणार्या पावसाने संध्याकाळनंतर चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आजही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या एक तासापासून पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर मिठी नदीच्या पाण्यामुळे सायन आणि कुर्ल्याचे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. दादरचे रेल्वे रुळावरही पाणीच पाणी झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चुनाभट्टीतही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने हर्बर रेल्वेही अत्यंत धीम्यागतीने सुरू आहेत. त्यामुळे कामावर कामावर जाणार्यांचे हाल होत आहे.
अंधेरी सबवेला पोलिस तैनात
सकाळपासून मुंबईत धुँवाधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरले. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणा?्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. या भागात गुडघ्यापयर्ंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरताना दिसत आहे. अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच बीकेसी कोविड सेंटर येथेही गुडघाभर पाणी साचले आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच लसीकरणासाठी जावं लागत आहे.
नवी मुंबईत महाकाय वृक्ष कोसळला
नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कोपरखैरणे येथील राम सोसायटीत काल रात्री महाकाय झाड पडल्याने ४ ते ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. काल रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
ठाणेकरांना अँलर्ट
पावसाने सलग तीन दिवसापासून ठाण्याला झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरल्याने ठाण्यातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून कोसळणार्या पावसामुळे मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली आहे. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024