- अन्न देतो त्रास घेतो
- रोज दुःखात जगतो ।
- माझा शेतकरी राजा
- साऱ्या जगाला पोसतो ।।
- वाचा चेहऱ्याला त्यांच्या
- हाल जरासे विचारा ।
- पुसा डोळ्यात आलेल्या
- दुःखातल्या अश्रुधारा ।।
- लेकरांच्या तोंडातल्या
- दाणे पेरले शेतात ।
- बघा कास्तकार कसा
- काम करतो उन्हात ।।
- अरे जाणसाल काय
- कधीतरी उपकार? ।
- कोण दुजा आहे सांगा
- इथे आपला दातार? ।।
- नका देऊ त्यांना धन
- फक्त मदतीला धावा ।
- त्यांच्या पिकाला जरासा
- फक्त योग्य भाव द्यावा ।।
- त्यांच्या लेकरांची शाळा
- नको कधी बुडायला ।
- देऊ योग्य शिकवण
- त्यांची स्वप्ने घडायला ।।
- शेतकरी राजा थोर
- चला मिळून म्हणूया ।
- त्यांच्या समान आपण
- काही दिवस जगूया ।।
- करू सत्कार मिळून
- त्यांचे गाऊ गुणगान ।
- कोण्या भूमी सेवकाला
- नका समजू लहान ।।
- नत होऊ मनोभावे
- त्यांच्या झोपडीला पाहू ।
- एक दिवस स्वतःही
- चला झोपडीत राहू ।।
- ©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण तरनोळी
- ता.दारव्हा,जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७