अमरावती : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा हे फक्त अमरावती जिल्ह्याचे दैवत नसून संपूर्ण महाराष्ट्राकरिता आदरणीय संत आहेत. गाडगेबाबांनी या महाराष्ट्राला वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक अधिष्ठान दिले असून त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राची भूमी सुपीक बनलेली आहे.लाखो लोक त्यांच्या विचारांनी वैचारिक दृष्ट्या प्रेरित झालेले आहे. त्यामुळे गाडगेबाबांचा अपमान म्हणजे गाडगेबाबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या लाखो अनुयायांचा अपमान आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रेमकुमार बोके यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लावलेली दशसूत्री काढून टाकली आहे.त्यामुळे सध्या महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.गाडगेबाबांनी या महाराष्ट्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.गाडगेबाबांनी दिवसा गाव स्वच्छ करून, रात्री लोकांच्या डोक्यातील अज्ञान आणि अंधश्रद्धा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दूर करण्याचा जीवनभर प्रयत्न केला. त्यांच्या विचारातून या महाराष्ट्राची जडणघडण झाली असून एक मोठी वैचारिक पिढी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारातूनच अमरावतीला संत गाडगेबाबा विद्यापीठ मोठ्या अभिमानाने उभे आहे. त्यांनी दिलेली दशसूत्री ही येथील बहुजन समाजाच्या कल्याणासाठी निर्माण केलेली एक मोठी सनद किंवा विचारसूत्र आहे. भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींचे शिक्षण, बेरोजगारांना रोजगार, निराधारांना आधार अशा प्रकारे गाडगेबाबांनी अतिशय वास्तव आणि दिशादर्शक विचार मांडलेले आहे.इतके समाजमान्य आणि समाजसेवी विचार असलेली क्रांतिकारी दशसूत्री केवळ आकसापोटी मंत्रालयातून हटवणे म्हणजे विकृतीचा कळस होय. त्यामुळे शिंदे सरकार हे गाडगेबाबांच्या विचारांच्या विरोधात असून त्यांना गाडगेबाबांचे विचार मान्य नाही असे दिसते.आम्ही या घृणास्पद कृत्याकरीता शिंदे- फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करत असून संपूर्ण महाराष्ट्रात आज गांधी जयंतीच्या पर्वावर उपवास करून सरकारला जाहीर इशारा देत आहोत.जर सरकारने ताबडतोब ही दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बसवली नाही तर संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करून सरकारला ती दशसूत्री लावण्याकरीता भाग पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रेमकुमार बोके यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.