भरडधान्यांचे महत्व आणि कृषी महोत्सव

On: February 24, 2023 1:00 AM
आम्हाला फॉलो करा
Bharaddhany

    खाद्यसंस्कृती प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार ज्वारी, बाजरी, तांदुळाची किंवा नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात असे.

    कष्टकरी माणसांचा भाकरी हा हक्काचा आहार होता. नंतर गव्हाचा समावेश झाला. त्यात बेकरी पदार्थ वाढले. केबल टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून निरनिराळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला. चायनीजच्या गाड्या खेडोपाडीही सुरू झाल्या. जंक फूडच्या चटकेपोटी आरोग्य बिघडत असल्याचे दिसू लागले. हे असे असताना पुन्हा एकदा भरडधान्याकडे वळण्याची गरज भासू लागली. त्यामुळेच ज्वारी, बाजरी, नाचणी या भरडधान्यांची पुन्हा मागणी वाढू लागली आहे. पाश्चिमात्य देशांमध्येही भरडधान्यांचा आहारात समावेश होऊ लागला आहे.

    भरडधान्यांची पौष्टिकता उत्कृष्ट आहे. त्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. ती सावकाश व हळुवारपणे पचविली जातात. सहज पचण्याच्या गुणधर्मामुळे मधुमेह व लठ्ठपणा हे विकार असणा-या लोकांना त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. ज्वारी, बाजरीबरोबरच राळा, नाचणी, वरी असे भरडधान्याचे विविध प्रकार आढळतात. त्यात ग्लुटेन नसते व तंतूमय घटक, प्रथिने चांगली असतात. रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ते उपयुक्त आहेत. या गुणांमुळेच लोक पुन्हा भरडधान्याकडे वळू लागले आहेत. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांना अन्नाचा पर्याय बनविणे काळाची गरज आहे.

    हे लक्षात घेऊनच केंद्र शासनाने संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न आणि शेती संस्थेला यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. तो मंजूर होऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले. हाच धागा पकडून जिल्हा प्रशासन व कृषी विभागातर्फे दि. 1 ते 5 मार्चदरम्यान आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात भरडधान्यांचा स्वतंत्र विभागच असणार आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांच्याकडून सर्व विभाग व विविध संस्थांच्या माध्यमातून जय्यत पूर्वतयारी होत आहे.

    भरडधान्ये मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवतात म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते. या पिकांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शुष्क प्रदेशात किंवा कोरडवाहू प्रदेशातही भरडधान्यांची लागवड शक्य आहे.बाजरीत सल्फरयुक्त ॲमिनो ॲसिड असल्याने लहान मुले आणि गर्भवती मातांसाठी उपयुक्त असते. नाचणीमध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत सर्वांत जास्त कॅल्शिअम आहे. त्यामुळे ते वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असते. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने व ग्लुटेन नसल्यामुळे नाचणी आरोग्याला हितकारी असते. वरईमध्ये कमी कॅलरी असतात. स्थूलता कमी करण्यासाठी ते उपयुक्त असते.

    आहार साखळीत मिलेटचे स्थान परत मिळवण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मिलेटचे प्रमाण व पर्यायी मिलेट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे. भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा मुख्य देश आहे. पौष्टिक तृणधान्याची खाद्यसंस्कृती येथील जुनी परंपरा आहे. कमी दरात सहज उपलब्ध होणा-या जंक फूडच्या ठिकाणी मिलेट फूड उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. त्यामुळे तृणधान्याला चांगली बाजारपेठ मिळेल. तृणधान्याच्या उत्पन्न व उत्पादन वाढीमुळे शेतक-यांनाही लाभ होईल. तृणधान्यापासून तयार केलेले पोषक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी देशांतर्गत व परदेशी बाजारातील मागणी वाढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत.

    -हर्षवर्धन पवार,
    जिल्हा माहिती अधिकारी,
    अमरावती
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment