अमरावती : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ‘स्मार्ट’ योजनेत समुदाय आधारित संस्थांकडून (सीबीओ) अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी 31 मार्चपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन ‘स्मार्ट’च्या नोडल अधिकारी तथा ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे.
- अर्जासाठी पात्र संस्था
शेतमाल, शेळ्या (मांस व दूध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मूल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी अर्ज करता येतील. अर्ज सादर करण्यासाठी पात्र संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचालित साधन केंद्र यांचा समावेश होतो.
त्याचप्रमाणे, अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये जिल्ह्यातील कॉर्पोरेटस्, प्रक्रियादार, निर्यातदार, लघु मध्यम उद्योजक, स्टार्टअप, तसेच कोणताही खरेदीदार यांचा समावेश आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांनुसार संस्थांना प्रकल्पाच्या 60 टक्के अनुदान उपलब्ध होईल.
- अर्ज कोठे कराल?
अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहिती http://www.smart-mh.org या संकेतस्थळावर ‘कॉल फॉर प्रपोजल’ या टॅबवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा. त्याची प्रिंट काढून त्यात माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे जोडावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती कार्यालयात, तसेच लोकसंचालित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम यांच्याकडे आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एम.एस.आर.एल.एम यांच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज दि.31 मार्च, 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.