सौ. भारती सावंत साहित्य क्षेत्रातील आणि वृत्तपत्रीय जगतातील एक ठळक नाव! दररोज कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात नित्यनेमाने साहित्य प्रसवणारी लेखिका म्हणून सावंत यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. नुकताच त्यांचा ‘किलबिल’ हा सहासष्ट बालकविता असणारा आकर्षक, वाचनीय असा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. बालकांना खातरीने आकर्षित करेल असे मुखपृष्ठ या संग्रहाला लाभले आहे. ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके, आकर्षक आणि नजर खिळवून ठेणारे तर आहेच परंतु जसे एखादे गुटगुटीत, गोंडस बालक दिसले की त्याला उचलून घेण्याची तीव्र इच्छा होते तसे हे मुखपृष्ठ सुबक, सुरेख झाले आहे. कागद, बांधणी आणि मांडणी खूप छान झाली आहे.
कवितासंग्रहाला लाभलेले शीर्षक हे तसे परिचयाचे असल्यामुळे मुलांना जवळचे वाटते. या शीर्षक गीतातील, ‘किलबिल करुनी पक्षी होती वृक्षांवरती गोळा’ ह्या ओळी सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि अजरामर झालेल्या ‘किलबिल पक्षी बोलती…’ या ओळीची आठवण करुन देतात. त्यामुळे वाचक या कवितेकडे आकर्षित होतात. या पहिल्याच कवितेत रमलेल्या बाल वाचकास हे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही.
बालकांसाठी लिहिताना बालक होऊन लिहावे लागते, बालकांच्या बालविश्वाचा बारकाईने, आपुलकीने अभ्यास करावा लागतो. ज्याला बालकांचे मानसशास्त्र समजले, बालकांचे बालविश्व कागदावर उतरवता आले, ते साहित्य बालकांच्या मनावर अधिराज्य करते हे निश्चित! सौ. भारती सावंत या कुटुंबात रमणाऱ्या त्यातही बालकात रमणाऱ्या असल्यामुळे आणि बालसाहित्याच्या त्या वाचक असल्यामुळे बालकांसाठी त्या अगदी मनापासून लेखन करतात हे त्यांच्या किलबिल संग्रहातील कवितांवरुन लक्षात येते. त्यांच्या कवितांमध्ये फुलपाखरू, चिऊताई, चांदोबा, घड्याळ, सुट्टी, बेडूक, कावळा, शाळा, खारुताई, पोपट, ससोबा, अस्वल, चॉकलेट, मुंगी, मासा, गाढव, शिंगरू, मनीमाऊ, सैनिक, मधमाशी, ढग, आई, बाहुली, गणराय इत्यादी बालकांना आवडणारे घटक पानोपानी विसावले आहेत.
‘चांदोबाची बेकरी’ हे आगळेवेगळे शीर्षक मुलांना आवडेल असेच आहे कारण चांदोबा आणि बेकरी ह्या दोन्ही गोष्टी बालकांसाठी आकर्षक अशा! त्यातच ‘चांदोबा चांदोबा लपलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ हे आवडते गाणे गुणगुणत असणाऱ्या बालकांना चांदोबाची बेकरी कशी असणार आणि तिथे कोणकोणते पदार्थ खायला मिळणार याची उत्सुकता शीर्षक वाचून नक्कीच लागते आणि ते चांदोबाच्या बेकरीत प्रवेश करतील.
आपला हट्ट पुरवणारी सर्वात जवळची कोण तर आई, हे बालकांना पक्के ठाऊक असते. अगदी बाळ प्रभू रामचंद्रही याला अपवाद ठरत नाहीत. म्हणूनच ‘अशक्य ते शक्य करुन दाखवी माझी आई’ याप्रमाणे भारतीताईंचा हट्टाला पेटलेला बालक अशाच अनेक गोष्टी मिळवून देण्यासाठी आईकडे मागणी करतो त्यावेळी बालकाचा भाबडेपणा आणि तो हेरण्याची कवयित्रीची सुक्ष्म दृष्टी आपल्या लक्षात येते.
ससा आणि कासव ही गोष्ट ऐकल्याशिवाय खऱ्या अर्थाने बालकांचा दिवस जात नाही असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरु नये. त्यातच ससा हा बालकांचा आवडता प्राणी! ‘ससा रे ससा दिसतो कसा…’ या गीताने ससा बालकांचा अत्यंत आवडता प्राणी झाला आहे. सावंत यांनीही बाळांचे ससोबावरील प्रेम लक्षात घेऊन ‘ससोबा ससोबा…’ ही कविता केली आहे.
‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ किंवा ‘ये गं ये गं सरी, माझे मडके भरी’ या दोन गीतांची आठवण करून देणारी या संग्रहातील एक कविता म्हणजे ‘माझी शाळा!’ या कवितेतील नायक पावसाला केंव्हा ये आणि केंव्हा येऊ नको हे ज्यावेळी बजावून सांगतो त्यावेळी वाचक खुदकन हसतो. हे सावंत यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.
‘चॉकलेटी कॅडबरी’ ही कविता लेकरांना निश्चितच आवडेल कारण चॉकलेट! चॉकलेट केवळ मुलांनाच आवडतात असे नाही तर ते आईबाबा, आजोबा आजी यांनाही आवडतात म्हणून मुलाला चॉकलेट देताना ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ याप्रमाणे हे चॉकलेट आजोबला दे, हे चॉकलेट आजीला दे असे बजावूनही ते बालक जेंव्हा ते चॉकलेट कुणालाही न देता गपकन स्वतःच्या तोंडात टाकते आणि आनंदाने टाळ्या पिटत नाचू लागते तेव्हा त्याची आई रागावते किंवा रागारागाने पाहते हे लक्षात येताच धावत जाऊन हातात असलेले अर्धे चॉकलेट आईच्या तोंडात टाकते तेंव्हा ती माउली स्वतःचा लटका राग विसरून त्या चिमुकल्याला उचलून पटकन त्याचा पापा घेते.
‘चला जाऊ माकडाच्या दवाखान्यात’ गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या अजरामर लेखणीतून प्रसवलेल्या गीताची आठवण करुन देणारी सावंतांची कविता म्हणजे… ‘गाढवाचे दुकान!’ गाढवाचा लाथा मारण्याचा गुणधर्म लक्षात घेता अनेकांची या दुकानात जाण्याची हिंमत होणार नाही परंतु एकदा जाऊन तर पहा, या दुकानात कोणते पदार्थ आहेत? या दुकानात आलेली गिऱ्हाईकं कोण कोण आहेत? महत्त्वाचे म्हणजे गाढवाला या दुकानात नफा किती मिळाला हे समजून घेण्यासाठी आपणास ‘गाढवाचे दुकान’ पाहायलाच हवे. ‘झुक झुक आगीनगाडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया…’ कितीतरी दशकांपासून आजही आबालवृद्धांच्या ओठावर थिरकणाऱ्या या गीताचे स्मरण करुन देणारा किलबिल या संग्रहातील कविता म्हणजे… ‘माझ्या मामाचा गाव…’ ही होय. सावंतमामींच्या मामाच्या गावात काय काय आहे, कोणत्या गंमती आहेत ते त्या गावी गेल्यावरच समजेल. होय ना? तर मग चला जाऊया… ‘माझ्या मामाचा गाव’ पाहायला!
देश, सैनिक याबद्दलच्या कविता, गाणी याबद्दल बालकांना प्रचंड ओढ, आवड असते हे लक्षात घेऊन किलबिल या संग्रहात ‘मी देशाचा सैनिक होणार…’ ही अत्यंत सुमधुर अशी स्फूर्तीदायक कविता आहे. ही कविता वाचताना बालकांच्या अंगात शौर्य फुलून आले तर नवल वाटणार नाही. ही कविता वाचताना थेट शांता शेळके यांच्या ‘शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती?’ ह्या ओळी ओठांवर आल्याशिवाय राहणार नाहीत.
आईनंतर बालकांचा खरा गुरु म्हणजे शिक्षक! परंतु आजकाल शिक्षकांवर असलेली श्रद्धा, निष्ठा कमी होत चालली आहे की काय अशा शंकास्पद वातावरणात सौ. सावंत ‘गुरूजन’ या कवितेतून शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करताना लिहितात…
‘दिसताच गुरूजन समोर होतोय माथा नतमस्तक…’
एकंदरीत सौ. भारती सावंत यांचा किलबिल हा कविता संग्रह बालकांसोबत पालकांनाही निश्चितच आवडणार आहे. यातील अनेक कविता बालकांच्या ओठांवर रेंगाळणार आहेत. भारतीताईंची भाषा सरळ, सोपी, मधाळ अशी आहे त्यामुळे बालके या कवितांना दिलखुलास दाद देतील यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी सौ. भारती सावंत यांना भरपूर शुभेच्छा देताना एक अपेक्षा जरुर आहे ती म्हणजे बालकांच्या विश्वात रमणाऱ्या, बालकांचे भावविश्व जवळून पाहणाऱ्या सौ. सावंत यांच्या लेखणीतून बालकादंबरीचा जन्म व्हावा.
- किलबिल : बाल कवितासंग्रह
- कवयित्री : सौ. भारती सावंत
- प्रकाशक : ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक
- पृष्ठसंख्या : १००
- किंमत : १५०/-₹
- आस्वादक : नागेश सू. शेवाळकर, पुणे
- ९४२३१३९०७१
—–