प्रत्येक जीवा जीवाची भावना, आचारविचार आदानप्रदान करण्याची एक शैली असते तिलाच आपण भाषा असे म्हणतो. प्रत्येक पशुपक्षी, प्राण्यांची सुध्दा एक भाषा असते. भलेही त्यांची भाषा आपल्याला कळत नसेल; परंतु त्यांची भाषा त्यांना मात्र कळते कारण त्याद्वारे ते त्यांचा जीवन व्यवहार व्यतित करित असतात.
जगात मानव जात ही सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान गणल्या गेली; याचे कारण म्हणजे मानवाला निसर्गाने प्रदान केलेले बुध्दी चातुर्य होय. मानवाने आपली स्वतःची एक भाषा विकसित केली. त्या माध्यमातून तो विचारांची आदानप्रदान करायला लागला. जगात आज अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकीच एक आगळीवेगळी, स्वतंत्र असलेली भाषा म्हणजे बंजारा समाजाची मातृभाषा होय. पुरातन काळापासून हा समाज आपल्या मायड भाषाला (मातृभाषा) आजतागायत जीवापाड जपत आला आहे. मग भलेही आजपर्यंत कित्येक स्थित्यंतरे झाली असतील. बंजारा भाषा ही भारत देशातील बहुसंख्य राज्यासह जगातील विविध देशांत बोलली जाणारी बंजाराची ‘मायड भाषा’ आहे. त्याला गोरमाटी, ब्रिंजारी असेही म्हणतात. भारतात कोणत्याही राज्यातील कोणत्याही भागात आपण गेलो तरी बंजारा भाषिक आपली मातृभाषा आपसात बोलताना दिसेल; नव्हे तो जगत आला आहे. होळी, दिवाळी, तिज तेवार, लग्न समारंभ, अंत्यविधी आणि इतरही सण सोहळे साजरे करताना गीत,गाणे, लोकगीते आणि रितीरिवाज आजही जसेच्या तसे बंजारा समाज आचरत आला आहे. त्यात काही प्रमाणात थोडा फार बदल झाला असेल; पण पूर्णपणे विस्मृतीत मात्र गेला नाही हे निर्विवाद सत्य आहे. बंजारा समाज गोरमाटी बंजारा भाषा बोलत आहे,वापरत आहे आणि जगतही आहे. भाषा सोडलेली नाही हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. हे स्पष्ट करताना मला माझ्या कवितेतील चार ओळी आठवतात-
एक बोली एक भाषा
रितीरिवाज एक छं
जगे मांयी गोरमाटी
भलेही अनेक छं
अखंड भारत देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात वा जगातील अनेक देशांत वसलेल्या, स्थायिक झालेला जो बंजारा समाज असेल त्याने आपली भाषा जीवापाड जपून ठेवली आहे. हेल ,ठेका ,लकब ,तोल , उच्चार यामध्ये जरी थोडा फार फरक जाणवत असला तरी विचार, भावना सुख दुःख, अडीअडचणी वाटून घेऊन सहकार्य करण्याचा भाषेतील गोडवा यत्किंचितही कमी झालेला नाही हे मी येथे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
बंजारा समाजातील पूर्वजांनी आपल्या जगण्याचा एक भाग बनवून ठेवलेला साहित्याचा ठेवा पुन्हा परत पुस्तक रूपाने समाजासमोर आणण्याचा अनेक कवी, लेखक, साहित्यिक आणि भाषा संशोधकांनी केलेले आहे , काही करत आहेत आणि काही भविष्यात करतील याची मला आशा आहे. त्याचप्रमाणे अनेक गोर शब्द वीरांनी लेखणी हातात घेऊन बंजारा भाषेतून लेखन करायला सुरुवात केली आहे. बंजारा भाषेला जागवण्यासाठी, नव्याने उभारी देण्यासाठी सरसावले आहेत नव्हे सज्ज झालेले आहेत आणि त्या शब्द सैनिकांचा मला मनापासून अभिमान आहे. अलीकडे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा मी येथे मुद्दाम उल्लेख करून सांगतो आहे की मागील पन्नास वर्षांत दोनशे ऐंशी भाषा मृत झाल्यात असा खुलासा भाषा संशोधक डॉ.गणेश देवी यांनी केले होते आणि ते खरेही आहे. आजही अनेक बोली भाषा मृतप्राय होण्याच्या मार्गावर असतानाचा हा प्रयत्न म्हणजे ‘याडी भाषेला’ जीवदान देऊन बळ व ताकद देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. अर्थात गोर शब्द सैनिकांची लेखणी नव्या उमेदीने परजायला लागली आहे. अशा तमाम शब्द सैनिकांना माझा मानाचा मुजरा.
बंजारा भाषिक अस्मितेला जागवण्यासाठी, नव्याने उभारी देण्यासाठी आज काही प्रज्ञावंत, लेखणीचे शिलेदार सज्ज झालेले आहेत. यापैकीच असलेले एक प्रज्ञावान शिलेदार म्हणजे बंजारा भाषा, साहित्य संस्कृतीचे अभ्यासक, प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार होय. या प्रतिभावंत शिलेदारांनी बंजारा भाषा गौरव गीताची रचना केली आहे. जी रचना अतिशय प्रगल्भ असून लोकप्रिय झालेली आहे. या गौरव गीताची सुरुवातच त्यांनी ‘केसुला’ अर्थात पळस फुलांपासून केली आहे, त्यात ते म्हणतात-
केसुला नै मोरारी
मायड भाषा बंजारा री
चांदा सुर्यासू अमरा री
तू तो जीवेस्यू प्यारी…
बंजारा समाज हा संघर्ष, आनंद, उत्साह आणि सृजनात्मकतेचा प्रतिक म्हणून ज्या वृक्षाला, फुलाला मानतो ते म्हणजे ओसाड माळरानावरही जोमाने बहरणारे, भर उन्हाळ्यात उन्हाचा कडाका सोसत लालभडक, केशरी रंगाची उधळण करणारे पळस फुल होय. ओसाड माळरानावर, कठीण खडकावर तर कुठे शेताच्या बांधावर पाण्याचा थेंबही जिथे मिळणार नाही अशा ठिकाणी कठीण परिस्थितीत आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतो. माती आणि माणसाला सौंदर्याने मोहून टाकतो. संघर्षातही नव्या उमेदीने बहरण्याचा संदेश देतो. अगदी तसंच बंजारा समाजाची ‘मायड भाषा’ ( मातृभाषा), बदलत्या परिस्थितीतही आपले वेगळे अस्तित्व टिकवून ताठ मानेने, स्वाभिमानाने बहरत आलेली आहे. आपल्या लेकरांच्या मनी , हृदयी ती अमृताचे बोल प्रसवत आहे. ज्याप्रमाणे या पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य अजरामर आहे. अनेक ग्रहणाला सामोरे जाऊन त्याची प्रखरता आणि शितलता जशी अबाधित राहते, त्याचप्रमाणे बंजारा भाषा अजरामर आहे. कवी एकनाथ पवार आपल्या मातृभाषेला आई समान मानतो आणि माझी प्रिय मायड भाषा जीवासारखीच प्रिय असल्याचे कृतज्ञताही व्यक्त करतो. बंजारा, गौरमाटी भाषा ही आई समान समुपदेशक असल्याचे कवी म्हणतो. या गौरव गीतातील बंजारा मायड भाषेचे विविध पैलू वाचकाला मंत्रमुग्ध करणारे आहे.
आंधारेमं वाट वतायी
जीवे जीवेनं जुटायी
सायी वेगी तू मुकेनं
हारो भरो किदी तू सुकेनं
सोने पितळ देसेरी
तू तो बोली जीवे जीवेरी..
संघर्ष आणि काळ्याभोर अंधारात जीवनगाडा चालणाऱ्या माणूस नावाच्या तांडयाला वाट दाखवणारी तूच आहेस असे कवी म्हणतो. या मायड भाषेची कारुण्य माया समस्त बंजाराला कवेत घेणारी आहे. विस्थापितांना, बहिण भावंडाना, गणगोताला तू मायेच्या करुणेने एका छताखाली एकत्र आणणारी तूच मायमाऊली आहेस. कोणत्याही अनोळखी प्रदेशात गाठभेट करून गळ्यात गळा घालायला लावणारी तू जीवनवाहिनी आहेस. ज्या जिव्हाला शब्द फुटत नव्हते, त्यास तू अभिव्यक्तीचे शब्दबाण बहाल केलेस. उजाड ओसाड झालेल्या अभिव्यक्ती, भावभावनांच्या प्रदेशात हरितक्रांती घडवून आणणारी वसंतमाऊली तूच आहेस. वैभवशाली इतिहास जपणारी स्वर्णिम समृद्ध राजवीरांच्या देशाची तू एक रणरागिणी असून प्रत्येक जिवाजीवाची बोली आहे असे कवी म्हणतो. या निमित्ताने प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी आपल्या मातृभाषेचे औदार्य आणि महात्म्य प्रत्येक शब्दाशब्दातून प्रकर्षाने अधोरेखित केलेले आहे.
सोने सरीख पिवळ
जळे सरीख तू निथळ
भाग्य लाभगो हामेनं
करा तोनं नवंळं
जिनगानीरी चितांळी
लिंबडासू तू लेरारी..
कवीची एकनाथांची मातृभाषा ही गोर पाखरांच्या निरंतर प्रगतीचे स्वप्न रेखाटणारी असून ती सोन्यासारखी मौल्यवान असणारी सौंदर्याची खाण आहे. कवी म्हणतात, प्रत्येक जीवाच्या ओठावर तुझेच अमृततुल्य बोल असतात. सरितेच्या पाण्यासारखी तू निर्मळ आहेस. प्रवाही आहेस. दीनदलित, गरीब श्रीमंत, लहान मोठे, राव रंक, स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता तू सर्वांना आपल्या प्रवाहात सामावून घेतेस. म्हणूनच आम्हा बंजारा भाषिकांना सौभाग्याचे, गोरत्वाचे लेणे प्राप्त झाले आहे. आम्हाला भाग्य लाभले आहे की, तू माझ्यासमवेत पंधरा कोटी जीवाची माऊली आहेस. हे माऊली ! आम्ही सर्व तुझी लेकरे तुझ्या चरणी नतमस्तक होऊन तुला साष्टांग दंडवत करतो आहोत. कडूलिंबाच्या मोहोरा प्रमाणे उंबराच्या झाडाप्रमाणे तू सदैव विस्तारत आहे. गुणकारी आहेस. तू सदोदित आमच्या स्मृतीत रहावीस, हीच आमची मनोकामना आहे. आमच्या करोडो जनांचा वारसा जपणारी, इतिहासाची पवित्र साक्ष तूच आहेस. अतिशय मार्मिक शब्दांत कवीने बंजारा भाषेचे चित्रण केले आहे.
संकट हजार फेरी
थांबी कोनी चाकं थारी
सिर कटे धड लडावे
याडी क्षत्राणी तू प्यारी
काळ आवे काळ जावे
तू तो नंगारा घोरारी
कवी एकनाथांच्या लाघवी आणि हृदयस्पर्शी साहित्यशैलीने या गौरवगीताने कमालीची उंची गाठल्याचे शब्दाशब्दातून दिसून येते. कवी म्हणतो, माझी मातृभाषा ही पुरातन काळापासून आजपर्यंत हजारो संकटावर मात करीत स्वाभिमानाने लढणारी एक क्षत्राणी आहे. जीवनवाहिनी असणारी माझी प्रिय बंजारा मायड भाषा! तुझ्यावर हजारो संकटे कोसळली परंतु तू संकटाबरोबरच मुघल, ब्रिटीश असोत की, इथले सरंजामी शोषक असोत, त्यापुढे तू झुकली नाहीस. वाकली नाहीस आणि पराभूत तर तू झालीच नाहीस. इतक्या कठीण परिस्थितीत प्रवास करताना तुझी चाके कधी थांबली नाहीत. गाळात रुतून बसली नाहीस. समोर आलेल्या संकटावर मात करत करत आजपर्यंतचा तुझा हा खडतर प्रवास अव्याहत चालू आहे. त्यामुळेच कवी एकनाथ आपल्या मातृभाषेचा याडी, माऊली, रणरागिणी, क्षत्राणी या शब्दात वर्णन करतो. म्हणूनच आपल्या ‘मायड भाषेला’ संवर्धित करण्याचा आज विडाही उचलतांना तिचे लेकरे दिसून येतात. जसे क्षत्रियाला त्याचे शस्त्र आणि शुरत्व प्राणप्रिय असतात; त्याप्रमाणे आमची ‘मायड भाषा’ (मातृभाषा) आम्हाला प्राणप्रिय आहे. या निर्व्याज प्रेमातूनच कवी एकनाथांनी एक अप्रत्यक्ष निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला आहे की, आमच्या मातृभाषेला संपविण्याचा कोणी कटकारस्थान रचल्यास तिथे शब्द सुद्धा शस्त्र होऊन लढा पुकारेल. कित्येक संकटे आली गेली. परंतु अनेक आव्हानांना घेरलेल्या रणांगणावरही तू लढण्यास सज्ज होतेस. तू उदघोष केलेल्या तूझ्या क्रांतीचा गगनभेदी नगारा दऱ्याखोऱ्यात, शेत-वनात निनादतोय. अशा स्फुर्तीदायी आणि आपल्या प्राचीन वारसाच्या प्रतिबिंबाबरोबरच भावनिकतेचे एक हृदयस्पर्शी गोंदण सुद्धा कवी एकनाथाने या गौरवगितात समर्पकपणे उमटवीलेले आहे.
संत मुनीरे दोहामं
तू तो गुरुरे वाणीमं
चार चांद लगायी
एकनाथारे लखंळीम
गहुली इटली रायबरेली
तू तो च्यारी वडी फेलरी..
बंजारा भाषेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक वलय लाभलेला आहे. साहित्य, संस्कृती विश्वातही आपणास बंजारा दिसून येते. कवी बंजारा भाषेचा गौरव करतांना म्हणतात की संत, महात्मा, ऋषी मुनींच्या कवनामध्ये, दोहात तुझे गुणगान गायीले आहे. तुझ्या या खडतर प्रवासाने, निर्मळ प्रवाही स्वभावाने, मायेच्या करुणेने कवीच्या सृजनशील लेखणीला सुद्धा ‘चार चांद’ लावून यशोशिखरावर पोहचवले आहे; म्हणूनच हे माऊली ! तुझे हे उपकार मी कित्येक जन्म घेतल्यावरही फेडू शकणार नाही. मी आणि हा तुझा बंजारा भाषिक लेकरांचा गोतावळा तुझे अनमोल उपकार कधीच विसरू शकणार नाहीत. परतफेडही करु शकणार नाहीत. तसे पाहिले तर कोणतीच आई लेकरावर परतफेडीचा हिशोब करून जन्म देत नसते, हा जगातील ममतेचा स्वाभाविक गुण आहे.
हरित क्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक यांची जन्मभूमी असलेल्या गहुली गडापासून तर उत्तर प्रदेशातील रायबरेली पर्यंत, इतकेच नव्हेतर तर देशाबाहेरील इटली पर्यंतचा अर्थात आशियाई-युरोपीय देशापर्यंतचा मानवी मूल्यांचे जपणूक करणारा तुझा हा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. स्वाभिमानाने मान उंचावणारा आहे. त्यामुळे आजच्या जागतिकीकरणातही तुझा प्रवास सर्वदूर सदोदित सुरूच राहावा. तुझ्या मानवी मूल्यांच्या सुवासिक सुगंधाने हे साहित्य, संस्कृतीचे गोरगड. तांडा नंघरी, समस्त आसमंत दरवळत राहो; अशी आशा या गौरव गीताच्या निमित्ताने कवी करतो आहे.
देशभरातील बंजारा तांडा नगरीत, गोरगडावर बोलली जाणारी, आचारविचारांचे आदानप्रदान करणारी, मनातील भावनांचे प्रचलन करणारी, करोडो जनांच्या मुखी असणारी, जीवा जीवांना जोडणारी, मायेच्या ममतेने जीव लावून मायेने हृदयाशी कवटाळणारी, सौंदर्याची खाण असणारी ही कवीची मायड भाषा मात्र आज भाषेच्या दर्जा पासून वंचित आहे. संविधानाच्या आठव्या सूचीत लवकरच तिला स्थान मिळो अशी आशा या निमित्ताने करुयात. बंजारा भाषेला वैभव आणि भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी तमाम बंजारा भाषा बोलणाऱ्यातच नव्हे तर, जगणाऱ्या तमाम बंजारामध्ये, भाषाप्रेमीमध्ये अस्मिता जागवणारे हे गौरव गीत नक्कीच साहित्य विश्वात एक अजरामर गीत म्हणून ओळखल्या जाईल.
– पी.के. पवार
सोनाळा बुलढाणा
भ्रमणध्वनी : ९४२१४९०७३१